लातूर पॅटर्न पहिला वर्धापन दिन
आज लातूर पॅटर्नच्या प्रकाशन सोहळ्याचा पहिला वर्धापन दिन. कादंबरी प्रकाशित झाल्यावर मला बऱ्याच प्रमाणात त्याच्याकडून अपेक्षा होती की कादंबरी चर्चिली जाईल, परीक्षणं येतील, चर्चा घडेल, टीका होईल किंवा या पैकी काहीही होणार नाही. काहीही होणार नाही हे जास्त अपेक्षित होतं. असं का झालं याचा विचार करत होतो तेव्हा काही शक्यता लक्षात आल्या. १) मी जेव्हा हे लिहिलंय किंवा छापतोय असं मित्रांना सांगितलं तेव्हा त्यांची प्रतिक्रिया फारच थंड होती. असं का झालं! मला जाणवलेलं कारण म्हणजे माझे जवळपास सगळे मित्र हे मराठी किंवा इंग्रजी साहित्याचे वाचक नाहीत. यातले बरेच जण दररोजचा वर्तमानपत्रसुद्धा वाचत नाहीत. जे काही थोडेफार वाचक आहेत त्यांच्यापर्यंत कादंबरी पोचली नाही. २) माझ्या घरात कथा, कादंबरी, कविता किंवा एकूणच साहित्याविषयी कसलंही सोयरसुतक नाही. त्यामुळे घरातूनसुद्धा मला म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. घरी मी एकटाच असा आहे ज्याला यात प्रचंड आवड आहे. ३) ज्या-ज्या लोकांनी कादंबरी वाचली ते सर्वजण पदवीधर आहेत ही बाब विचार केल्या नंतर लक्षात आली. त्यामुळे तिला दुर्लक्षित कर...