लातूर पॅटर्न पहिला वर्धापन दिन

आज लातूर पॅटर्नच्या प्रकाशन सोहळ्याचा पहिला वर्धापन दिन. कादंबरी प्रकाशित झाल्यावर मला बऱ्याच प्रमाणात त्याच्याकडून अपेक्षा होती की कादंबरी चर्चिली जाईल, परीक्षणं येतील, चर्चा घडेल, टीका होईल किंवा या पैकी काहीही होणार नाही. काहीही होणार नाही हे जास्त अपेक्षित होतं. असं का झालं याचा विचार करत होतो तेव्हा काही शक्यता लक्षात आल्या.

१) मी जेव्हा हे लिहिलंय किंवा छापतोय असं मित्रांना सांगितलं तेव्हा त्यांची प्रतिक्रिया फारच थंड होती. असं का झालं! मला जाणवलेलं कारण म्हणजे माझे जवळपास सगळे मित्र हे मराठी किंवा इंग्रजी साहित्याचे वाचक नाहीत. यातले बरेच जण दररोजचा वर्तमानपत्रसुद्धा वाचत नाहीत. जे काही थोडेफार वाचक आहेत त्यांच्यापर्यंत कादंबरी पोचली नाही.

२) माझ्या घरात कथा, कादंबरी, कविता किंवा एकूणच साहित्याविषयी कसलंही सोयरसुतक नाही. त्यामुळे घरातूनसुद्धा मला म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. घरी मी एकटाच असा आहे ज्याला यात प्रचंड आवड आहे.

३) ज्या-ज्या लोकांनी कादंबरी वाचली ते सर्वजण पदवीधर आहेत ही बाब विचार केल्या नंतर लक्षात आली. त्यामुळे तिला दुर्लक्षित करता येत नाही. माझ्या निरीक्षणानुसार आपल्या इथला वाचक हा मुख्यतः शिकलेला किंवा पदवीधर आहे. भारतात एकूण पदवीधरांची संख्या फक्त तीन ते चार टक्क्यांच्या आसपास आहे. माझ्या दहा वर्षांच्या कॉलेज अनुभवावरून एक गोष्ट ठळकपणे  जाणवली ती म्हणजे पदवीधर होणे हे प्रतिष्ठेचे अन् यशस्वितेचे लक्षण समजले जाते. भारतात आणि महाराष्ट्रात १९६४-६६ च्या कोठारी कमिशनचा १०+२+३ हा शैक्षणिक फॉर्म्युला वापरण्यात येतो.

कादंबरीचं प्रकाशन झालं त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांच्या समवेत. 
आज २०१२ सालचा विचार केला तर महाराष्ट्रात खेडोपाडी शाळा-कॉलेजेस चालू झाले आहेत. शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोचलीय असं सर्वत्र चित्र दिसून येतं पण किती मुलांना/मुलींना यात खरच रस आहे किंवा जे शिक्षण घेत आहेत त्यांना ते भविष्यात उपयोगाचं आहे,  हे विचारायला हवं. माझं उत्तर पूर्णपणे नकारात्मक आहे. याचे असंख्य कारणं आहेत. मला यात महत्वाचं कारण वाटतं ते म्हणजे आपल्या मानसिकतेत झालेला बदल.

गेल्या सेहेचाळीस वर्षात आपल्या समाजात खूपच बदल घडलाय ही बाब एकही समाजशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, शिक्षक किंवा कोणीही मान्य करत नाहीत. त्यांना फक्त दरवर्षी एकूण ६४-६६ टक्के येणारा निकाल तेवढा दिसतो. यात दहावी, बारावी अन विद्यापीठ निकाल गृहीत धरला आहे. उरलेल्या टक्केवारीतले मुले/मुली कोठे जातात याचा जरासुद्धा विचार केला जात नाही. फार तर चारदोन लेख छापून येतात. व्यासपीठावर भाषणं ठोकली जातात, पास झालेल्यांचा उदोउदो केला जातो.

मुळात आपली समाजव्यवस्था ही नोकरी करणे, प्रतिष्ठा मिळवणे या एकाच उद्देशाभोवती घुटमळणारी आहे. त्यामुळे एखाद्या मुलाला/मुलीला नोकरी कुठे करावे याचे बाळकडू लहानपणापासून दिले जाते. याला मी कंडीशनिंग म्हणतो. पद्धतशीरपणे आपलं शिरकाण केलं जातंय. एमएला असताना पाव्लोवियन कंडीशनिंगचा अभ्यास केला होता. ते आता आठवल्यावर आपण किती भयंकर चक्रात अडकलोय याची जाणीव सुन्न करून सोडते. हे म्हणजे अतिरेकी घडवल्यापेक्षा खतरनाक आहे. बरं गेल्या काही वर्षातला महाराष्ट्रातल्या शिक्षणाच्या प्रसाराचा वेग बघितला की येत्या वीस वर्षात निरक्षर बघायलाच मिळणार नाहीत अशी परिस्थिती तयार होईल. मग त्यावेळी एखाद्या घराण्यात किती अशिक्षित लोक होते ही चर्चा रंगेल तसेच किती जण शाळा-कोलेजात किती वेळा नापास झाले यावर हमरीतुमरी होईल. हे विचित्र आहे. 

४) डिग्री ही प्रतिष्ठीतपणाच लक्षण झालाय अस जेव्हा मी म्हणतो तेव्हा मला आपल्या चातुर्वर्ण्य समाजाचा विसर पडत नाही. आपण कितीही म्हणत असू की आम्ही जातपात मानत नाही तरी मनात मात्र त्याबद्दल अभिमान बाळगत असतो हे लपून राहिलेलं नाही. आपण फक्त आपल्या जातीच्या प्रतिष्ठेला शिक्षणाननं चारचांद लावतो एवढंच. त्यामुळे होतं काय की आपला ढोंगीपणा उघडा पडतो. याचं अजून एक कारण म्हणजे आपण विशिष्ठ पद्धतीने वाढवले गेलेले आहोत. तुम्ही कोणत्या जातीत किंवा धर्मात जन्मलात हे ईतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त महत्वाचं आहे. येथे सुद्धा पावलोवियान कंडीशनिंगचा संदर्भ लावता येतो. आपण या पद्धतीचे बळी आहोत याचेच मला जास्त वाईट वाटते. तसेच भारतात जन्मल्यामुळे कितीही नाही म्हटलं तरी येथील संस्कार सोडता येत नाहीत खासकरून जसे जसे आपण मोठे होत जातो तसंतसे त्याचा विळखा हा वाढत जातो. माझी कादंबरी या विळख्यात बळी ठरलेल्यांची शोकांतिका दर्शवते. काही जणांना या वर उपाय असेल असे वाटते. पण मला यात उपाय न सुचवता प्रश्न मांडायचा होता.

५) शेवटचं कारण मी माझ्या अनुभवावरून काढलेला निष्कर्ष. या निष्कर्षामूळेच बऱ्याच जणांचं पित्त खवळलं असेल. याची कारणमीमांसा वरील दोन कारणात आहे.

दुर्दैव असे की ज्यांनी ज्यांनी कादंबरी वाचली त्यांनी यावर खोलवर विचार केला नाही. त्यामुळे तर अधिकच वाईट वाटतं.

ज्यांना ही कादंबरी वाचवायची आहे त्यांनी खालील लिंक वरून मागवावी :
http://www.bookganga.com/eBooks/Book/5191685504302736179.htm?Book=Latur-Pattern

Comments