द गर्ल इन द स्पायडर्स वेब : फक्त एकदाच बघण्यासारखा

‘मीटू’ मुळे बदललेल्या सध्याच्या वातावरणात या सिनेमाचं प्रदर्शित होणं योगायोग म्हणावा का? कारण याची नायिका ‘लिझबेथ सलँडर’ स्त्रियांवर अनन्वित अत्याचार करणार्‍या पुरूषांना तिच्या शैलीत शिक्षा देत असते. एका अर्थाने कायदा हातात घेऊन काम करण्याच्या पद्धतीमुळे कित्येक स्त्रिया, मुली यांचे आशीर्वाद तिच्या पाठीशी असतात. त्यामुळे ती स्टॉकहोमची व्हिजिलांती बनलेली. अत्याचारग्रस्त स्त्रियांनी ही फिल्म किंवा या आधीची डेव्हिड फिंचरने दिग्दर्शित केलेली ‘द गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू’ बघितली तर त्यांना अशी लिझबेथ आपल्या इथे पण असावी असं वाटल्याशिवाय राहणार नाही. सात वर्षांनंतर त्याच मुख्य पात्राला घेऊन केलेला हा सिनेमा एका अर्थाने सिक्वेल म्हणवणारा कामगिरी मात्र समाधानकारक करतो.

एका श्रीमंत व्यक्तीला त्याच्या बायकोवर अत्याचार करताना रंगेहात पकडणारी लिझबेथ सलँडर (क्लेयर फोय) सध्या स्टॉकहोममध्ये फेमस झालीय. तिच्या एका हाती कायदा घेऊन स्त्रियांना अत्याचार मुक्त करण्याचा कार्यक्रम प्रसारमाध्यमात खूप प्रसिद्ध झालाय. एकीकडे ती हे करत असतानाच तिच्या हॅकिंग करण्याच्या कौशल्याचा वापर एक कम्प्युटर प्रोग्रामर करण्याचं ठरवतो. तिला फायरफॉल हा प्रोग्राम अमेरिकेतल्या सुरक्षित ठिकाणाहून हॅक करून आणावा असं सुचवतो. ती तिच्या कौशल्याने ते एका फटक्यात पूर्ण करते पण तिला माहिती नसतं की हा प्रोग्राम मिळवण्यासाठी अजून बरीच लोकं मागे असतात. हे जेव्हा कळतं तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो.

याची कथा पहिल्यांदा स्टीग लार्सन लिखीत मिलेनियम मालिकत आलेल्या कथेतील लिझबेथच्याच आयुष्याला पुढे नेते. तरीही पटकथाकार-दिग्दर्शक फेडे अल्वारेज व त्यांचे सहकारी जे बसू आणि स्टिवन राईट यांनी ती डेव्हिड लॉगरकॅरँत्झनी लिहीलेल्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित ठेवली आहे. त्यामुळे कथेचा काळ कुठला सांगता येत नाही. कारण मिलेनियम मालिकेतल्या ‘द गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू’वर सिनेमा आल्यावर उरलेल्या दोन कादंबर्‍यांवर सिनेमे आले नव्हते. डेव्हिड फिंचरने दिग्दर्शित केलेल्या व समीक्षकांनी कौतुक केलेल्या त्या सिनेमाला प्रेक्षकांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नव्हता. त्याचं कारण नंतर फिंचरने एके ठिकाणी सांगितलं. सिनेमा प्रदर्शित झाला त्यावेळीच मार्व्हलच्या सिनेमॅटिक युनिव्हर्सची सुरुवात आर्यन मॅनच्या दणदणीत यशाने झाली होती.

फिंचरला ही मालिका प्रौढ प्रेक्षकांसाठी करायची होती. ‘लिझबेथ’ हे कुठल्याही सुपरहिरोपेक्षा कमी नसणारं पात्र पण सिनेमाला मिळालेल्या कमी प्रतिसादामुळे सिक्वेल रहित करण्यात आले. आता जेव्हा सात वर्षांनी तिला पुनरुज्जीवित करण्यात आलय तेव्हा त्यातले मुख्य पात्र लिझबेथ सलँडर व मिलेनियम मासिकाचा पत्रकार-लेखक मिखेल ब्लोमक्विस्ट यांचे अभिनेते बदलण्यात आले. याचा परिणाम अर्थात सिनेमाच्या नरेशन व एकूणच पात्रांच्या प्रभावावर झाला आहे. ‘रुनी मारा’ व ‘डॅनिअल क्रेग’ यांची अनुक्रमे सलँडर व ब्लोमक्विस्ट यांची केमिस्ट्री अतिशय प्रभावी होती. इथे क्लेयर फोय व Sverrir Gudnason असले तरी त्यांच्यात केमिस्ट्रीच नाही. पटकथेत सलँडरला केंद्रस्थानी ठेवून व तिच्या भूतकाळाचा अर्ध्या भागानंतर केलेला वापर ब्लोमक्विस्टला पूर्णतः बाजूला करतो. त्याचं एक कारण दिलं जातं पण ते तार्किकता असावी म्हणून वाटतं. कथेच्या नैसर्गिक वाढीला पोषक नसणारं. त्याला म्हणावं तितकं काम नसणं हे सुद्धा सिनेमाच्या समाधानकारक होण्याला कारणीभूत ठरलय.

तसेच लिझबेथच्या भूतकाळाचा वापर कथेला खलनायक असायलाच हवा या अट्टहासाने केलाय का असं वाटतं. सिनेमाच्या सुरूवातीला येणारा उपोद्घातासारखा भाग पुढे त्यातला रहस्य उलगडवतं तेव्हा ते अरे, इतकं सोपं कारण होतं का असा प्रश्न निर्माण करणारं ठरतं. त्याचं एक कारण ह्या खलनायकाचं नायिकेशी असणारं नातं सिनेमाच्या अर्ध्या भागानंतर स्पष्ट केलं जातं. त्यामुळे नायिका संकटांना सामना देत जातेय असं त्याचं स्वरूप होऊन बसतं. तसेच ब्लोमक्विस्टचा धागा हा पहिल्या भागात मुख्य होता इथे तो बाजूला पडल्यामुळे कथेची एक बाजू लंगडी पडलीय असं सतत दिसत राहतं. नायिकेचं द्विमिती असणं सिनेमाला घातक ठरलय. एकदा तिला कळलं की तिने केलेल्या कामामुळे एकूणच मोठी आपत्ती ओढवणारे तेव्हा तिला त्याचा माग काढणे इतकच हातात उरतं.

या दोषामुळे व अल्वारेजच्या सपक दिग्दर्शनामुळे सिनेमाचा तोल शेवटाकडे ढळायला लागतो. त्यांना कथेवर दुहेरी कसरत करायची आहे एकीकडे थ्रिलर म्हणून पेश करायचं आहे तर फिंचरचा ठसा पुसून काढायचा आहे. त्यांनी थ्रिलरवर लक्ष केन्द्रित करून इतर गोष्टींकडे दुर्लक्ष केलय. त्याचा परिणाम स्वरूप लिझबेथचं पात्र द्विमिती झालय. काही प्रसंगात ती ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देते ते गोंधळलेले वाटतात. हा गोंधळ पात्राचा न वाटता दिग्दर्शकाचा वाटतो. तसेच नायिका सोडली तर इतरांना असणारं दुय्यम स्थान हे सुद्धा एक कारण आहे. ‘कॅमिलीया सलँडर’चं पात्र लिझबेथला तुल्यबळ झालं असतं पण तिलाही त्यांनी योग्य न्याय दिला नाही. तिचं व लिझबेथचं असणारं नातं शेवटाकडे उलगडलं जातं. तसेच तिच्या व्हिजिलांती असल्याचा त्यांच्या नात्यात असणारा दुरावा निर्माण करणारं ठरतं. त्याचं उत्तर अगदी शेवटाकडे दिलं जातं. कथेतला मुख्य भागच शेवटाकडे रहस्योद्घाटन करण्यासाठी ठेवल्यामुळे प्रेक्षकांना तिथपर्यंतची दमछाक सहन करावी लागते.

सिनेमाचं पार्श्वसंगीत हे बर्‍याच वेळा प्रसंगांना उठावदार बनवण्याऐवजी वरचढ ठरलय. तसेच अल्वारेज थ्रिलिंग मोमेंट तयार करण्यात कमी पडलेत. अर्थात पटकथेत एकमिती पात्रांचा भरणा असल्यामुळे व नायिका सोडली तर इतरांना कामही कमी असल्यामुळे एकूणच परिणामात समाधानकारक झालाय.

क्लेयर फोयचा चांगला अभिनय हीच काय ती जमेची बाजू. ब्लोमक्विस्ट हे या मालिकेतलं अजून एका महत्वाचं पात्र पण त्याला लिझबेथचा मदतनीस इतकीच भूमिका दिल्यामुळे त्याच्यावर प्रचंड अन्याय झाला आहे. तसेच नवीन अभिनेते घेतल्यामुळे ‘मारा’ व ‘क्रेग’ यांचा प्रभाव पुसणं त्यांच्यावरची जबाबदारी वाढवतं. फोयने ते काम बर्‍यापैकी केलय पण पटकथाच भक्कम नसल्यामुळे तिचा इलाज नाही. माराच्या ऑस्कर नामांकनात पटकथा व फिंचरचा मोठा हात होता. तसेच तिने भूमिकेसाठी स्वतःत पात्राला मिसळून टाकलं होतं. दुर्दैवाने फोयच्या नशिबात हे नाही.

लिझबेथ सलँडर व बॅटमॅन या सुपरहिरोत साम्य आहे. त्याला व्यवस्थेतील अन्यायी गोष्टींची चीड आहे तसच सलँडरला पुरुष अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रियांना मुक्त करण्यात इंटरेस्ट आहे. यासाठी गैर मार्ग वापरण्याला दोघांनाही चुकीचं काही आहे असं वाटत नाही. यामुळे समाजाची कीड कमी होत असेल तर त्या मार्गाने जाणेच योग्य आहे असं त्यांना वाटतं. तिचं असं एकाचवेळी एक व्यक्ति व व्हिजिलांती असणं तिला सुपरहिरो पदाला नेऊन बसवतं. त्यामुळेच फिंचरनी तिला प्रौढांचा सुपरहिरो संबोधलं होतं. दुर्दैवाने ‘डोन्ट ब्रीद’ या प्रचंड यशस्वी झालेल्या दिग्दर्शकाकडून काहीशी अशीच अपेक्षा होती पण ती त्यांचा फक्त थ्रिलर करण्याच्या नादात वाया गेली असच म्हणावं लागतं. याचा परिणाम मालिकेला प्रेक्षक प्रतिसाद परत एकदा कमी मिळाला तर पुढील भाग येण्यावर होईल. कारण सध्याच्या वातावरणात सलँडरची नितांत गरज आहे असं वाटतं.

रेटिंग : २.५/५

Comments