आमच्या पिढीचं दुखणं
गेल्या काही महिन्यात व वर्षात माझ्या वयाच्या तसेच तिशी ओलांडलेल्या मित्र-भावांच्या तोंडी आई-वडिलांच्या वागण्याबद्दल बरचसं ऐकण्यात येतंय. खासकरून आई-वडिलांचं नको इतकं त्यांच्या व्यवहारात , राहणीमानात , मुलांच्या शिक्षणाबद्दल , बायकोच्या वागण्याबद्दल किंवा तत्सम छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष घालणं. याचे परिणाम विसंवाद , नैराश्य ते क्वचित मानसिक असंतुलन इतपत बघायला मिळतंय. पूर्वीही या गोष्टींबद्दल चर्चा व्हायची किंवा घरगुती बाब म्हणून सोडून द्यायचो. पण काही गोष्टी सामाईक दिसत आहेत. तसेच आता विचार करता आमच्या घरात बघितलेली काही उदाहरणं ही सुद्धा यातच येतात असं वाटतं. मी ही यातल्या एका फेजमधून गेलोय. याची कारणं लक्षात घेण्याआधी आमची परीस्थिती काय आहे हे समजून घेऊयात. आमच्या पिढीच्या आई-वडिलांचं वय साधारण ५० ते ७० च्या दरम्यान आहे. स्वातंत्र्योत्तर भारतात १९५० नंतर जी पिढी जन्माला आली ती म्हणजे आमचे आई-वडील. सर्वसाधारण त्या काळाच्या परिस्थितीनुसार निम्न मध्यमवर्गीय किंवा गरीब घरातली ही मंडळी होती. शिक्षणाची दारे उघडलेली होती. त्यामुळे घरातील किमान पुरूष मंडळी शिकायची. स्त्रियांपैकी शिक्ष...