आमच्या पिढीचं दुखणं

गेल्या काही महिन्यात व वर्षात माझ्या वयाच्या तसेच तिशी ओलांडलेल्या मित्र-भावांच्या तोंडी आई-वडिलांच्या वागण्याबद्दल बरचसं ऐकण्यात येतंय. खासकरून आई-वडिलांचं नको इतकं त्यांच्या व्यवहारात, राहणीमानात, मुलांच्या शिक्षणाबद्दल, बायकोच्या वागण्याबद्दल किंवा तत्सम छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष घालणं. याचे परिणाम विसंवाद, नैराश्य ते क्वचित मानसिक असंतुलन इतपत बघायला मिळतंय. पूर्वीही या गोष्टींबद्दल चर्चा व्हायची किंवा घरगुती बाब म्हणून सोडून द्यायचो. पण काही गोष्टी सामाईक दिसत आहेत. तसेच आता विचार करता आमच्या घरात बघितलेली काही उदाहरणं ही सुद्धा यातच येतात असं वाटतं. मी ही यातल्या एका फेजमधून गेलोय. याची कारणं लक्षात घेण्याआधी आमची परीस्थिती काय आहे हे समजून घेऊयात.
आमच्या पिढीच्या आई-वडिलांचं वय साधारण ५० ते ७० च्या दरम्यान आहे. स्वातंत्र्योत्तर भारतात १९५० नंतर जी पिढी जन्माला आली ती म्हणजे आमचे आई-वडील. सर्वसाधारण त्या काळाच्या परिस्थितीनुसार निम्न मध्यमवर्गीय किंवा गरीब घरातली ही मंडळी होती. शिक्षणाची दारे उघडलेली होती. त्यामुळे घरातील किमान पुरूष मंडळी शिकायची. स्त्रियांपैकी शिक्षण घेणाऱ्या कमीच होत्या. तरीही अक्षर ओळख असणाऱ्या बऱ्याच जणी आहेत. भाषानिहाय राज्यांची निर्मिती व्हायला लागली होती. ६० साली महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा मराठवाडा विना अट महाराष्ट्रात सामील झाला. ही पिढी तेव्हा दहा वर्षांची होती. पुढे ७५ साली आणीबाणी झाली तेव्हा ही लोकं पंचविशीला आली होती. नेहरूंच्या स्वप्नातील भारत तेव्हा कुठे होता माहिती नाही पण आणीबाणीने बरेच प्रश्न निर्माण केले असतील. आमच्या वडिलांची पिढी तेव्हा काय करत होती तर शिक्षण संपवून बसली होती. डिम्पल-ऋषीच्या बॉबीचा प्रभाव होता. अमिताभचे सिनेमे समाजावरील राग ओकत होते. माझ्या अल्प ज्ञानानुसार जयप्रकाश नारायणांनी भ्रष्टाचार मुक्तीची व दुसऱ्या स्वातंत्र्याची हाक दिली होती. तेव्हा आमच्या वडिलांची पिढी नोकरीच्या जंजाळात गुंतायला निघाली होती. कधी एकदा नोकरी मिळते याकडे त्यांचे डोळे चातकासारखे लागले होते. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी होती. त्यांच्या नशिबानुसार त्यांना नोकऱ्या मिळाल्या. गरीब, निम्न मध्यमवर्गातून वरच्या वर्गात स्थलांतरित होण्याची वाटचाल सुरू झाली.
ऐंशीच्या दशकात इंदिरा गांधी जाऊन राजीव गांधी आले. याचवेळी आमच्या पिढीचा जन्म झाला. राजीव गांधीनी कॅम्प्युटर, टेलिफोन क्रांती केली ज्यातून संपर्क मोठ्या प्रमाणात वाढला. मारूती कारने मध्यमवर्गीयांना कार घेता येऊ शकते हे दाखवून दिलं. पण सर्व काही सुरळीत असताना भारताची अवस्था गरिबीकडे व्हायला लागली होती. जुन्या पद्धतीच्या आर्थिक धोरणांमुळे भारताच्या तिजोरीत गंगाजळी उरली नव्हती. तिचा ओघ वाढावा म्हणून नरसिंहराव सरकारने आर्थिक उदारीकरणाची दारे खुली केली. बाबरी मशीद पाडली गेली. हिंदुत्ववादी लोकांची जमावाजमव वाढायला लागली. मुंबईतील बॉम्बस्फोट व नंतरच्या दंगली यांनी बघितल्या. बदलाचे संकेत सरकारने जरी दिले असले तरी त्याचे परिणाम व्हायला वेळ लागणार होता. याचवेळी ह्यांच्या पिढीला चौथ्या वेतन आयोगापासून वेतनवाढ मिळायला लागली. सहाव्या वेतन आयोगाने वेतनवाढ केली तेव्हा ही पिढी निवृत्तीला आली होती.
लातुरात पर्यायाने मराठवाड्यात २००० सालानंतर परदेशस्थ होण्याचे स्वप्न आमच्या पिढीत वाढू लागले. आयटी सेक्टर आल्यामुळे आमच्या पिढीची मुले/मुली शिक्षण संपल्या संपल्या मोठ्या पगाराच्या नोकरीला लागली. बाकीचे डॉक्टरकी नाही तर एमबीए करायला लागली. लातुरातली आयटी मंडळींना कंपन्यांनी पर्फोर्मंसेस बघून त्यांना परदेशात कामासाठी पाठवायला सुरूवात केली. त्यामुळे काही वर्षातच लातुरात पासपोर्टसाठी अर्ज करण्याचं प्रमाण वाढलं. मग मंडळी तिथे कमावलेला पैसा इथे पाठवल्यामुळे रिकामे प्लॉट्स, पत्र्याची किंवा गिलावा नसलेली निव्वळ विटांचं बांधकाम असणारी घरं एकदम आलिशान, पॉश दिसायला लागली. आर्थिक उदारीकरणाची फळं आमच्या पिढीला व आमच्या वडिलांच्या पिढीला एकदमच मिळायला लागली. त्यामुळे एक प्रकारे मुलगा आणि वडील आर्थिक उत्पन्नाच्या बाबतीत एकाच पातळीवर आले होते. त्याचं ठळक उदाहरण म्हणजे कार. वडिलांच्या पिढीने त्यांच्या रिटायरमेंटच्या काही वर्ष आधी घेतली होती तर मुलाने करिअरच्या/नोकरीच्या सुरूवातीच्या काही वर्षातच. तर दुसरीकडे नोकरीसाठी वणवण फिरणारे सुद्धा होते. नोकरीतील स्थिरता मिळत नव्हती त्यामुळे घरात भांडणे नित्याची. शैक्षणिक अर्हते नुसारच नोकरी मिळणार. व्यवसाय करणे हे मध्यमवर्गीय घरासाठी रिस्क असल्यामुळे त्याकडे फारसं लक्ष दिलं जात नव्हतं, नाही.
पण घरात खऱ्या अर्थाने बदल घडायला लागला जेव्हा मुलांचं लग्न व्हायला लागलं. घरात सून आली. सून आल्यामुळे एका विशिष्ठ पद्धतीने वागायच्या, जगायच्या पद्धतीत बदल व्हायला लागला. नवीन गोष्टींचा चंचुप्रवेश व्हायला लागला. आमच्या आई-वडिलांच्या पिढीचे सासू-सासरे झालेले काळानुरूप आपण बदलायला हवं हे सुनेकडे बघून म्हणायला लागले. पण सर्वच गोष्टी सुरळीतपणे कुठे चालू राहतात. हळूहळू बदल घडायला लागतो. मुलगा-सून काळानुरूप बदललेले असायचे तर सासू-सासरे फक्त तोंडाने बदल घडणं गरजेचं आहे फक्त म्हणत असायचे. छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद व्हायला लागले. त्यामुळे मुलगा-सून व सासू-सासरे यांच्यात विसंवाद वाढायला लागला. आमच्या पिढीचं त्यांच्या आई-वडिलांशी संवाद कमी होत चाललाय याची कारणे सांगण्यासाठी वरील पार्श्वभूमी थोडक्यात दिलीय.
पार्श्वभूमीवरून असं वाटेल नेमका प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम आहे भारतीय कुटुंबव्यवस्थेच्या रचनेत. आमच्या आई-वडिलांची पिढी कौतुकास्पद आहे का हा प्रश्न संभवतो. तर नाही. आमच्या आई-वडिलांच्या पिढीची वैचारिक बैठक ही अजूनही १९५०-६० किंवा फार फार तर ७० च्या दशकातली. ज्या काळात आजच्यासारखं भौतिक गोष्टींची वानवा होती. पण खास कर्मठ भारतीय संस्कार, अति देवभोळेपणा, कट्टर जातीय-धार्मिक निष्ठा ह्या कसोशीने पाळल्या जायच्या. स्त्री-पुरूष यांच्यातील भेद स्पष्ट होता. स्त्रियांनी शिक्षण घेतलं असलं तरी त्यांनी नोकरी करू नये, चार पैसे खनवटीला बांधून घ्यावं, निवृत्तीची सोय करण्यासाठी तरतूद करून ठेवावी वगैरे भानगडी नव्हत्या. काही स्त्रिया नोकरी करायच्या पण त्यांची संख्या बोटांवर मोजण्या इतपत होती. तसेच घराची ओढगस्ती कमी करावी म्हणून त्या नोकरी करायच्या. आजच्यासारख्या करीअर करायचं नव्हतं. त्यामुळे घरातील कर्ते पुरुषच सर्व निर्णय घ्यायचे. त्यामुळे झालंय काय की आज जेव्हा चहुबाजूने पैसा, समृद्धी यायला लागलीय तेव्हा नेमकं वागायचं कसं याचं आकलन त्यांना होत नाहीये.
उदाहरणच द्यायचं झालं तर हॉटेलिंगचं देता येईल. आमच्या लहानपणी हॉटेलला जाणे, तिथला चहा घेणे, इडली-वडा-दोसा खाणे, पंजाबी डिशेश किंवा रात्रीचं जेवण घेणे एकतर निषिद्ध मानलं जायचं किंवा चैनीची गोष्ट म्हणून मनावर ठसवली जायची. ज्या कुठल्या गावाला जायचं ते गाव नातेवाईकाचं असायचं त्यामुळे रहायची-खायची सोय असायची. नाही तर सहकुटुंब देवदर्शनाला गेलं तरच हॉटेलात जेवण करायचं. एखाद्या पर्यटनस्थळाला नेलेलं आठवत नाही कारण देवदर्शन म्हणजेच पर्यटनस्थळ असं समीकरण होतं. त्यामुळे लातुरात किती हॉटेल्स आहेत व तिथे कोणते पदार्थ खायला देतात हे माहिती नसायचं. जी गोष्ट हॉटेल्सची तीच गोष्ट ढाब्याची. ढाब्यावर कधी जेवायला घेऊन गेलेत हा प्रकार कधी झालाच नाही. ढाबे फक्त वडीलधारी मंडळींच्या दारू पिण्याची व नॉन-व्हेज खाण्याची सोय असते इतकंच अनुभवांती कळलेलं (ते ही दबक्या, भेदरट अवस्थेत कारण थेट विचारण्याची सोय नसायची. वडीलधारे कुठे जातात हे कधी विचारायचं नसतं असंच लहानपणापासून हॅमर करण्यात आलंय.). त्यामुळे त्याचंही आकर्षण मनात राहिलेलं. कुठल्या हॉटेलात नाही तरी किमान ढाब्यावर घेऊन जा म्हटल्यावर हो ही म्हणायचं नाही आणि नाही ही म्हणायचं नाही. मुळात आपल्या मुलांना सुद्धा हॉटेलात कधीतरी न्यावं ही भावनाच आमच्या आई-वडिलांच्या पिढीच्या मनात यायची नाही. त्यामुळे आज जेव्हा आम्ही हॉटेलिंग अगदी सहज करतो तेव्हा यांना ते नको असतं. वरवर आम्ही उगाच वायफळ खर्च करतो असं म्हटलं जातं पण मुळात मुलाने-सुनेने आलेला पैसा आम्हाला न विचारता का खर्च केला हे मूळ दुखणं असतं.
पैशांचा विनियोग कसा करायचा याचे आमच्या पिढीचे आडाखे वेगळे आहेत. यांच्या पिढीला पैसा जमवून ठेवायची, वायफळ खर्च न करायची सवय होती. स्वतःवर बंधनं घालून घेऊन त्याला काटकसर ह्या गोंडस नावाखाली जगायची सवय होती. पैशांची कमतरता हा प्रॉब्लेम न राहता त्याला कवटाळून बसायची सवय होती (पैसा वृद्धिंगत करावा अशी पुसटशी ही कल्पना त्यांच्या मनात यायची नाही.). तसेच आवश्यक खर्च व चैन यातला फरक असा कधी यांनी ठेवलाच नव्हता. पैसा खर्चणे म्हणजेच चैन करणे असा सरळ साधा हिशोब असायचा. त्यामुळे आज जेव्हा आम्ही ते करतो तेव्हा यांना पैशांची वैशिष्ट्यपूर्ण फिलॉसॉफी सुचते. पैसे कष्टाने कमावलेले असतात, ते जपून खर्च करायचे असतात असे प्रतिवाद करणारे खतरनाक लॉजिकल मुद्दे मांडून वाद घातला जातो. त्यामुळे घरात अनावश्यक वाद निर्माण होतोय याचं काहीही यांना वाटत नाही. हॉटेलिंग केलेल्या आनंदावर विरजण घातलं जातं.
आपण जगत असताना गेल्या वीस-तीस वर्षात आजूबाजूचं वातावरण बदललय त्यानुसार आपण बदलायला हवं याची गंधवार्ता आमच्या आई-वडिलांच्या पिढीला नसणे हे आमच्या विसंवादाचं मुख्य कारण आहे. त्यामुळे एखादी गोष्ट समजावून सांगायची म्हणजे डोक्याला शॉट लावून घेणं असतं. नसता ताप झालेला असतो. यातनं होणाऱ्या वादांना जनरेशन गॅपसंबोधून आम्ही गप्प बसतो. नाही तर त्यांच्याकडूनच जनरेशन गॅपम्हणून तुच्छतेनं हिणवलं जातं. त्यांच्याकडून जनरेशन गॅपही संकल्पना ढालीसारखी वापरली जाते. एखाद्या मुद्द्याला रीतसर तार्किकपणे उत्तर देता आलं नाही की जनरेशन गॅपआहे म्हणून गप्प बसवलं जातं (मुळात तार्किकपणे विचार करायचा असतो हेच यांना माहिती नाही. कारण विचार केल्यावर त्यातनं तार्किकता उद्भवते. जिथे विचार करणे ही क्रियाच संभवत नाही तिथे अशी अपेक्षा ठेवणं ही चुकय.). त्यामुळे मूळ मुद्दा बाजूलाच राहतो. जर एका घरात वडील कमावणारे असतील व त्यांच्या नंतर मुलगा कमावणारा असेल तर त्यात जनरेशन गॅप कुठून आली? मुळात भारतीय समाजात पुरुषांनी कमवायचं हे वर्षानुवर्षाची वहिवाट जशीच्या तशी असेल तर त्यात असा कितीसा फरक असणारे. त्यामुळे जनरेशन गॅपही इंटलेक्च्युअल लोकांनी (ती ही आमच्याच आई-वडिलांच्या सो कॉल्ड विचारीपिढीने) बिंबवलेली थोतांड संकल्पना मात्र उगाच यात लुडबुड करत असते.
यातील मूळ मुद्दा आहे आमच्या आई-वडिलांच्या पिढीची पुरूषी वर्चस्ववादी वृत्ती. ही पुरूषी वर्चस्ववादी वृत्ती घराघरात होणाऱ्या भांडणांच्या, वादांच्या मुळाशी आहे. ही वृत्ती काही काही घरात हिटलरी वृत्ती धारण करताना दिसतेय. लहानपणापासून आपण मुलाला धाकात ठेवलंय, त्यानं नेहमी आपलं ऐकलंय तेव्हा मोठा झाल्यावर, स्वतः वडील झाल्यावरही आमचंच ऐकायला पाहिजे असं अट्टहास त्यांचा असतो. तो ऐकत नाही म्हटल्यावर आपलं घरातलं वर्चस्व कमी होत चाललंय अशी भीती त्यांना वाटायला लागते. त्यामुळे सुनेने घातलेला साधा पंजाबी ड्रेस सुद्धा त्यांना खटकायला लागतो. तर काही घरात होणारं मुल हे आपल्या मुलाचं नाहीच आहे असं बिनदिक्कत सुनेवर संशय घेतला जातो. यात आपण काही वावगं वागलोय, आपल्याच सुनेवर संशय वगैरे घेतोय हेच यांच्या गावी नसतं. मग क्षुल्लक गोष्टींवरून वाद व्हायला चालू होतं. या वादाची परिणती म्हणजे मुलाने-सुनेने बोलणं बंद करणे, वेगळं राहणे, प्रॉपर्टीत हिस्सा मागणे व्हायला लागतं. मग आमच्या पिढीच्या आई-वडिलांना सुनेने घर तोडलं किंवा मुलाने तोंडात शेण घातलं म्हणायला मोकळं मैदानच मिळतं. आपल्यामुळे सुद्धा घरातलं वातावरण बिघडलंय याची कसलीही जाणीव ह्या पिढीला नसते. आपल्या वागण्यात चुकय हे यांना मान्यच नसतं, चूक नेहमी मुलाची किंवा सुनेचीच असते असं इतकं बिनधास्त व ठामपणे सर्वांना सांगत सुटतात की आपणच आपल्या तोंडात बोटं घालावीत.
अशावेळी मुलगा वेगळा राहायला लागला तर मला ते आता योग्य वाटायला लागलंय. यात कायदा सुद्धा आई-वडिलांच्या बाजूने आहे. मुलाला आपल्या प्रॉपर्टीत हिस्सा द्यायचा का नाही याचा अधिकार कायद्यानुसार वडिलांना दिला आहे. तसेच आई-वडिलांपासून रीतसर कायद्याद्वारे वेगळं किंवा बाजूला राहायची तरतूद आपल्या कायद्यातच नाही. का तर कायदा माणूसकी पाहतो. आणि सामाजिक वहिवाट मोडायची नाही हा उदात्त हेतू. मुलांनी म्हातारपणी आई-वडिलांची काठी व्हायला हवं ना! भलेही आई-वडील कौतुकानं खांद्यावर घेतल्यावर कान बधीर होईपर्यंत मुतायला लागले तरी.
या पिढीचं वरील विश्लेषण हे यांच्या वागणुकीच्या अगदी विरुद्ध आहे. बोलायला सामाजिक विश्लेषण करण्यासाठी त्यांची राजकीय पार्श्वभूमीवरील घटना सांगितल्या पण यांची पिढी कधीच सार्वजनिक जीवनात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घडामोडीत भाग घेणारी नव्हती. गल्ली किंवा कॉलनीतल्या गणेश उत्सवात जी मंडळी कधी भाग घ्यायची नाहीत ती समाजातल्या मोठ्या बदलात स्वतःला कसं झोकून घेतील. आपण भलं व आपलं काम भलं ही आत्मकेंद्री, अल्पसंतुष्ट, मध्यमवर्गीय कातडीबचाऊ वृत्तीत जगणारी ही माणसं. सतत पाटीलकीच्या रूबाबात राहणारी. टॅक्स भरण्यात आयुष्याची इतिकर्तव्यता आहे मानणारी. नोकरीतली गुलामी कपाळावर गंध लावावा तसं घेऊन ऐटीत मिरवणारी. खोट्या प्रतिष्ठेला मानणारी. ती प्रतिष्ठा जपण्यासाठी वाट्टेल ते करणारी. कोणत्याही थराला जाणारी. भ्रष्टाचार करणारी. ढोंगीपणा, दांभिकता डीएनएमध्ये असावं इतपत ते अंगावर वागवणारी. साहित्यसंगीतकलेबद्दल औरंगजेबी वृत्ती. काव्यशास्त्रविनोदावर विश्वास नसणारी. त्यामुळे ही पिढी आज साठी-सत्तरीत यायला लागल्यावर आमच्या पिढीला अनुभवी शहाणपणा शिकवायला लागते तेव्हा यांचा दांभिकपणाच उघडा पडतो. कारण यांनी इमानेइतबारे भारतातील जातीय, धार्मिक संस्कार आमच्यावर बिम्बवलेले व आम्ही त्यांच्या इतकंच कट्टरपणे ते फॉलो करावेत अशी यांची अपेक्षा असते. समाज बदलायला हवा असं पोकळ, तोंडी चऱ्हाट ही मंडळी नेहमीच लावत आली आहेत. पण हे सर्व कधी तर यांच्या दोन वेळच्या जेवणाची, बँक बॅलन्सची व पोस्टातल्या एफडींची भक्कम सोय झाल्यावर.
पूर्वी मी मुलांना व त्यांच्या बायकांना दोष द्यायचो. आई-वडिल ह्या संकल्पनेबद्दल असणारं माझं अतीव आंधळं प्रेम मला त्यांची बाजू कधीच दाखवायचं नाही. आता थोडं सजगपणे, साकल्याने विचार केल्यावर लक्षात येतंय जितकी चूक आमच्या बाजूने आहे तितकीच चूक त्यांच्या बाजूने आहे किंवा त्यांच्याच बाजूने जास्त आहे. इथे मी उघड उघड आमची बाजू कशी योग्य आहे ठसवतोय कारण आम्हाला जगायचं आहे. आम्ही तिशी, चाळीशीला येत आहोत. साठी-सत्तरीपर्यंतचा काळ आम्हाला घालवायचा आहे. मुलांचं संगोपन करून त्यांना योग्य मार्गाला लावायचं आहे. अजून पंधरा वीस वर्षात आम्हाला निवृत्तीचे वेध लागतील तेव्हा त्याची तजवीज आत्तापासूनच करावी लागणार आहे. आमच्या आई-वडिलांच्या काय अर्ध्या गवऱ्या मसणात जाऊन बराच काळ लोटलाय. त्या वाट बघतायत कधी एकदा ही मंडळी स्मशानाची वाट धरतात म्हणून. या उपर ही ते वर्चस्ववादी भूमिकेतून वागणार असतील तर त्यांना एक तर घरा बाहेरचा किंवा वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवणं मला तरी अपरिहार्य वाटतं. त्यामुळेच आता मी स्वतःहून माझ्या मित्रांना, भावांना सल्ला देत आहे शांत आयुष्य जगायचं असेल तर वेगळे रहा.

Comments

Unknown said…
एकदम खर आहे तू लिहीलेले फक्त मला वाटते त्याना हव तिथे राहू दयाव.