शॉन कॉनरी : जेम्स बॉंडच्या पलीकडे जाणारा अभिनेता


इयान फ्लेमिंगच्या बॉंड या पात्राला साकारायला शॉन कॉनरीनी सुरूवात केली तेव्हा अमेरिका आणि रशियातील टेन्शन जीवघेणी झाली होती. शीतयुद्ध, व्हिएतनाम युद्धामुळे जग काळवंडलं होतं. त्यामुळे असेल कदाचित किंवा एकूणच कॉनरीच्या अभिनयाची जादू असेल जेम्स बॉंड हे पात्र सिने इतिहासातील सर्वाधिक परिचीत पात्र झालं. पण डॉ. नो (१९६२) मुळे जगात सुप्रसिद्ध झालेले कॉनरी त्याच्या यशाने वैतागून गेले होते. इतके वैतागले होते की त्यांचे मित्र व अभिनेता मायकल केन म्हणतात कॉनरींना बॉंडविषयी बोलणं आवडायचं नाही. रस्त्यातून जाताना देखील लोकं ‘तो बघ जेम्स बॉंड’ म्हणायचे. त्यांना त्या पात्रामुळे मिळालेल्या प्रसिद्धीचा इतका राग यायचा की ते म्हणायचे ‘जेम्स बॉंड हे पात्रच मला आवडेनासं झालंय. याचा कधीतरी खून करीन मी.’

निव्वळ बॉंड साकारणे हेच त्यांच्या आयुष्याचं उद्दिष्ट नव्हतं. एक अभिनेता म्हणून आपल्या कौशल्याला पैलू पाडणे हा मुख्य उद्देश होता. स्कॉटलंडची राजधानी एडिनबर्ग शहरातील फाऊंटेनब्रिज येथे जन्मलेले शॉन यांनी एडिनबर्गमधील एका कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये मिल्कमॅन म्हणून काम केलं. सोळाव्या वर्षी ते रॉयल नेव्हीमध्ये रूजू झाले. परत आल्यावर त्यांनी विविध ठिकाणी कामे केली. कॉफिन पॉलीशर, लॉरी ड्रायव्हर, लाईफगार्ड, मजूर, एडिनबर्ग आर्टस स्कूलमध्ये आर्टिस्ट मॉडेल म्हणून काम केलं.

५० च्या दशकाच्या सुरूवातीला त्यांनी नाटकात बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरूवात केली. सोबतच सिनेमात एक्स्ट्रा म्हणून काम करायला लागले. पण दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होत होती म्हणून एका पत्रकाराच्या घरी बेबीसीटर म्हणून पार्ट-टाइम काम करायला लागले. टीव्ही, थिएटर आणि सिनेमात ते छोट्या मोठ्या भूमिका करत होतेच. त्यातच १९६२ मध्ये डॉ. नोमध्ये त्यांना जेम्स बॉंड साकारायला मिळाला. सिने इतिहासात हे पहिलच असं पात्र असेल जो स्वतःची ओळख करून देताना पहिल्यांदा आडनावाचा उच्चार करतो मग एक छोटासा पॉज घेऊन परत स्वतःच नाव व आडनाव उच्चारतो. बॉंड... जेम्स बॉंड. शॉन कॉनरींनी एकूण सात वेळा बॉंड साकारला. डॉ. नो नंतर फ्रॉम रशिया विथ लव्ह (१९६३), गोल्डफिंगर (१९६४), थंडरबॉल (१९६५), यू ओन्ली लिव्ह ट्वईस (१९६७), डायमंड्स आर फॉरेव्हर (१९७१) आणि नेव्हर से नेव्हर अगेन (१९८३).




दुर्दैवाने त्यांची ओळख जेम्स बॉंड साकारणारा अभिनेता अशी जनमानसात राहिली. पण अभिनेता म्हणून त्यांनी २००६ मध्ये निवृत्ती जाहीर करेपर्यंत काम केलं. अभिनेत्याला विविधांगी भूमिका मिळत गेल्या किंवा त्याने त्याच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन भूमिका स्वीकारल्या तर त्याच्या अभिनयाचे विविध पैलू बघायला मिळतात. एकाच भूमिकेत विविधता अंगीकारता येत नाही. तसेच एखादी भूमिका प्रमाणाबाहेर प्रसिद्ध पावली की अभिनेता संपला अशी ओरड व्हायला लागते. सुदैवाने कॉनरींनी स्वतःला कधीच बांधून ठेवलं नाही. त्यामुळे अभिनेता म्हणून ते विविधांगी भूमिकेत दिसून येतात. आल्फ्रेड हिचकॉकचा मार्नी (१९६४) व सिडने लुमेटचा द हिल (१९६५) त्यांनी यासाठीच स्वीकारला. पुढे कारकीर्दीच्या नंतरच्या टप्प्यात त्यांनी बॉंड प्रतिमेला मागे टाकत बऱ्याच भूमिका केल्या. मर्डर ऑन द ओरिएंट एक्प्रेस (१९७४), द मॅन हू वुड बी किंग (१९७५), अ ब्रिज टू फार (१९७७), हायलॅण्डर (१९८६)द नेम ऑफ द रोज (१९८६), द अनटचेबल्स (१९८७), इंडियाना जोन्स अँड द लास्ट क्रुसेड (१९८९), द हंट फॉर रेड ऑक्टोबर (१९९०), ड्रॅगनहार्ट (१९९६), द रॉक (१९९६) आणि फाईंडिंग फॉरेस्टर (२०००) यातील भूमिका प्रेक्षक तसेच समीक्षकांच्या पसंतीस पडल्या. त्यांना एकदा ऑस्कर, दोन वेळा बाफ्ता आणि तीन वेळा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले आहेत.

त्यांच्या मृत्यू पश्चात जेम्स बॉंडचे निर्माते मायकेल विल्सन आणि बार्बरा ब्रोकोली यांनी त्यांच्याबद्दल बोलताना म्हटलं, “सिक्रेट एजंट म्हणून भूमिका करताना त्यांनी त्यात क्रांती घडवून आणली. त्यामुळेच जेम्स बॉंड या मालिकेला न भूतो न भविष्यति अशी प्रसिद्धी मिळाली. यासाठी आम्ही त्यांचे कायमचे ऋणी आहोत.”

एका दैनिकासाठी हा लेख लिहिला होता पण त्यांनी छापलाच नाही.

Comments