लोकी : थॅनॉसपेक्षाही मोठ्या खलनायकाची नांदी

२००८ मध्ये मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्समधील पहिला ‘आयर्न मॅन’ सिनेमा रिलीज झाला. मार्व्हलच्या इंटरगॅलॅक्टिक पसाऱ्याला सुरूवात झाली. पृथ्वीसहीत सुदूर प्रांतातील मंडळी एका कॉमन उद्देशासाठी झगडतात. पण जोपर्यंत या मंडळींना आपला मुख्य शत्रू कोण आहे हे लक्षात येत नाही तोपर्यंत ते छोट्या छोट्या संकटांवर मात करण्याचा प्रयत्न करत असतात. थॅनॉसचं अस्तित्व समोर यायला लागतं तसं एकेक करून सर्व सुपरहिरोज एकत्र येतात आणि त्याचा खात्मा करतात. मात्र यासाठी मार्व्हल स्टुडिओजनी अकरा वर्ष घेतली. या सर्व सुपरहिरोजच्या कथा, पार्श्वभूमी, टाइमलाईन, अस्तित्वाचा उद्देश अशा बऱ्याच गोष्टींनी भरलेल्या होत्या. त्यामुळे मार्व्हलच्या पसाऱ्याची आंतरबाह्य ओळख प्रेक्षकांना झाली. पण या सर्व फिल्म्स व सिरीज हे मार्व्हलच्या फेज एक ते तीनमध्ये घडणारे होते. प्रश्न असा होता अॅव्हेन्जर्स एंडगेम नंतर मार्व्हलच्या पसाऱ्यात पुढे काय वाढून ठेवलंय. त्याचं उत्तर ‘द फाल्कन अँड द विंटर सोल्जर’, ‘वांडाव्हिजन’ आणि ‘लोकी’ सिरीजमध्ये बघायला मिळतं.

अॅव्हेन्जर्स एंडगेममध्ये कॅप्टन अमेरिका, अँट मॅन आणि आयर्न मॅन भूतकाळात अव्हेन्जर्सच्या (२०१२) घटना घडतात तिथे टेसेरॅक्ट घेण्यासाठी जातात पण हल्कच्या चुकीमुळे टेसेरॅक्ट लोकीला (टॉम हिडल्सटन) मिळतो. तो तिथनं पोबारा करतो. तो कुठे जातो ते कुणालाच सांगता येत नाही. तो असा कुठेही गायब होऊ शकतो हे त्याने याआधी सुद्धा दाखवलेलं होतं. पण यावेळी तो पकडला जातो. टीव्हीए अर्थात द टाइम व्हॅरिअन्स ऑथॉरिटीचे लोक त्याला पकडून टीव्हीएच्या न्यायालयात सादर करतात.

‘द फाल्कन अँड द विंटर सोल्जर’, ‘वांडाव्हिजन’ आणि ‘लोकी’ या सिरीजमध्ये मुख्य फरक काळाशी निगडीत आहे. ‘द फाल्कन अँड द विंटर सोल्जर’ आणि ‘वांडाव्हिजन’ एंडगेम झाल्या नंतरच्या काळात घडतात. वर म्हटल्याप्रमाणे ‘लोकी’ अव्हेन्जर्सच्या काळात घडतो. त्यामुळे त्याची टाइमलाईन मार्व्हलच्या टाइमलाईनशी निगडीत नाही. तर एक वेगळ्याच टाइमलाईनवर कथानक घडतं. इथे लोकी हा इतर व्हॅरिएंट्ससारखा एक व्हॅरिएंट आहे. पण तो मूळ लोकी असल्या कारणाने त्याचा उपयोग इतर लोकी व्हॅरिएंट्स शोधण्यासाठी करतात खासकरून एक असा लोकी ज्याने त्यांच्या नाकीनऊ आणलंय. तो कोण आहे, टीव्हीएच्या हंटर्सना का पकडतोय, त्याचा उद्देश काय आहे असे प्रश्न उपस्थित झाल्यामुळे त्याला पकडणे त्यांचा एकमेव उद्देश असतो. लोकी त्यांची मदत नाईलाजानेच करतो. पण ज्या लोकीला ते शोधत असतात त्याचा शोध लागल्यावर मात्र त्याचं मन बदलतं. तो व्हॅरिएंट एक स्त्री असते. तो तिच्यासोबत टीव्हीए हे काय गौडबंगाल आहे हे शोधायचं ठरवतो.


सिरीज दिग्दर्शक केट हेरन व पटकथाकार यांनी एक छान गोष्ट इथे केलीय ती म्हणजे त्यांनी टीव्हीए हे एक विश्व मुळातूनच निर्माण केलंय. त्याचा या पूर्वीच्या थॅनॉसशी संबंध असला तरी तो उल्लेख करण्या पुरताच ठेवलाय. लोकीला टीव्हीएमध्ये आणलं जातं तेव्हा मिस मिनट्स त्याला व प्रेक्षकांना तो कुठे आहे, टीव्हीए काय आहे, तीन टाइम कीपर्स ते कसं सांभाळतायत अशी उपयुक्त माहिती देते. त्यामुळे एकदा ही पार्श्वभूमी कळली की लोकीसोबत जे जे घडेल त्यातनं नवनवीन विश्वाची ओळख होत जाते. तसेच ज्या टाइमलाईनचा इथे नेहमी उल्लेख होतो किंवा त्याशिवाय त्यांचे संवाद पूर्ण होत नसतात ती टाइमलाईन कशी काम करते ते दिसून येतं. हंटर्स किंवा मोबियससारखे एजंट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ज्याचा वापर करतात ते मुळातूनच बघण्यासारखं आहे.

‘द फाल्कन...’, ‘वांडा...’ आणि ‘लोकी’ सिरीजच्या स्वरूपात आल्यामुळे एक मोठा फायदा झालाय. तो म्हणजे एमसीयूच्या पहिल्या तीन फेजमध्ये प्रामुख्याने सिनेमांवर त्यांची कथानके सांगण्याची जबाबदारी होती. काही सिरीज अधनंमधनं येत होत्या पण त्या सिनेमातील मुख्य पात्रांच्या नव्हत्या. इथे वांडा, व्हिजन, फाल्कन, विंटर सोल्जर, कॅप्टन अमेरिका आणि लोकी ही पात्रे एमसीयूमध्ये मुख्य कथानकात महत्त्वाची भूमिका निभावलेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर स्वतंत्र सिरीज येतेय म्हणजे कथानकाचे विविध धागे मोठ्या प्रमाणात व तपशिलात येणं अपेक्षित होतं. झालंही तसंच. पण लोकीचा वेगळेपण हे येत्या फेजमधील सिनेमांशी निगडीत असावं. कारण शेवटच्या एपिसोडमध्ये लोकी व सिल्व्ही (स्त्री लोकी व्हॅरिएंट) टीव्हीए तयार करणाऱ्याला भेटतात. तेव्हा तो त्यांना त्याच्याबद्दल सर्व काही सांगतो. पण याचा शेवट मात्र पूर्णपणे क्लीफहँगरसारखा आहे. मुद्दामहून अर्धवट सोडलेला. मार्व्हलने चौथ्या व पाचव्या फेजमधील सिनेमा व सिरीजची घोषणा आधीच केलेली आहे. त्यामुळे ही सिरीज पुढे येणाऱ्या विविध पात्रांच्या खासकरून थॅनॉसपेक्षा मोठ्या खलनायकाची नांदी ठरेल असं वाटतं. ज्यांना डॉक्टर स्ट्रेंजमधील द एन्शियंट वनने स्ट्रेंजला हे जग मल्टीव्हर्सने बनलेलं आहे असं सांगितलेलं आठवत असेल. त्याचं एक मोठं स्पष्टीकरण म्हणजे ही सिरीज. अजून एक कारण म्हणजे येऊ घातलेले ‘अँटमॅन अँड द व्हास्प : क्वांटमेनिया’ आणि ‘डॉ. स्ट्रेंज इन द मल्टीव्हर्स ऑफ मॅडनेस’ चा संबंध टीव्हीएच्या निर्मात्याशी असावा असा कयास आहे. जर त्यात या सर्व गोष्टी एकत्र आल्या तर पहिल्या तीन फेजपेक्षा खूपच मोठं विश्व यात बघायला मिळेल.

लोकी हे मुळातच खोडसाळ पात्र. थोर, अॅसगार्डशी सतत खेळत राहणे, थॅनॉससारख्या कर्दनकाळ खलनायकाला मदत करणे व इतर उचापती करणे त्याचा मूळ स्वभाव. टॉम हिडल्सटनने ती भूमिका किती प्रभावीपणे केली आहे हे सांगायची गरज नाही. रूढार्थाने नायक नसताना, खलनायकी गुण अंगात असताना देखील तो इतर सुपरहिरोज इतकाच लोकप्रिय असणं हीच त्याची पावती आहे. तरीही यात अनुक्रमे सिल्व्ही व रवोना रेन्स्लेअरची भूमिका करणाऱ्या सोफिया डी मार्टिनो व गुगू एमबाथा-रॉ यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे. येत्या काळात यांची पात्रे महत्त्वाची भूमिका बजावणार असं दिसतं. दोघींचं काम त्यामुळेच प्रशंसनीय. जोनाथन मेजर्स, ओव्हेन विल्सन व इतर अभिनेते उत्तम साथ देणारे.

‘वांडाव्हिजन’ आणि ‘लोकी’ चं प्रोडक्शन डिझाईन व व्हीएफएक्स मार्व्हलच्या इतर सिनेमांच्या तोडीचे. खासकरून प्रोडक्शन डिझाईन बघण्यासारखं. टीव्हीएचे रंग, तिथली कार्यालये, विविध ठिकाणीचे लोकीज, तिथलं वातावरण मुळातूनच बघण्यासारखं.

जर मार्व्हलचे कट्टर फॅन असाल तर या तिन्ही सिरीज एकदा बघून घेणं उर्वरित फेज कळण्यासाठी गृहपाठ ठरेल.

Comments

Lavkesh Landge said…
It's a superb movie review. True analysis of the plot, action and diction. Mr. Vivek Kulkarni's strength of critical thinking can be viewed in the article. I feel that he is the best of the critics of movies.
Atul Ausekar said…
खुपच छान परिक्षण. विवेकजींनी सोप्या भाषेत ‘लोकी’ ला समजाऊनसुद्धा कुठेही रंगतदारपणा कमी होऊ दिलेला नाही. धन्यवाद!
Vivek Kulkarni said…
Thank you Atul Ausekar.