उच्चशिक्षण एक फसवी संकल्पना
उच्चशिक्षणाचा आयचा घो! (मूळ शीर्षक)
पहिले : साक्षर,
दुसरे : निरक्षर.

पूर्व प्रसिद्धी: उच्चशिक्षण विशेषांक १४ एप्रिल २०१०
(दयाश्री सोपानदेव एज्युकेशन सोसायटी, लातूर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त...)
[हा लेख दोन वर्षापूर्वी लिहिला असल्यामुळे त्या काळातले संदर्भ आलेले आहेत. मला यात काहीही बदल करावासा वाटला नाही. त्यामुळे काही मुद्दे खटकण्याची शक्यता आहे. वाचकांनी आजच्या संदर्भात यातील विचार ताडून बघावेत.]
![]() |
आपण जर आजूबाजूला पहिले तर आपल्या लक्षात येईल की सध्या दोन प्रकारचे लोक आपल्या आसपास वावरत आहेत.
दुसरे : निरक्षर.
दुसऱ्या गटातल्या लोकांचं प्रमाण साधारण वीस ते चाळीस वर्षांपूर्वी खूप होतं. पण त्यांचं झपाट्यानं पहिल्या गटात रुपांतर होत चाललय. आज साक्षरतेच प्रमाण प्रचंड वाढलय पण साक्षर झाले म्हणजे सर्वच क्षेत्रात आपण अग्रेसर राहू असा गैरसमज पसरलाय. पहिल्या गटात आता अनेक उपगट तयार झाले आहेत. उदा. दहावी-बारावी पास, पदवीधर, पदविकाधारक, किमान कौशल्यावर आधारित सर्टीफिकेट घेतलेले पण या सर्वात एक चमत्कारिक बदल दिसतो. तो म्हणजे पदवीधर आणि विना पदवीधर. म्हणजे भारतात असणाऱ्या जातीसारखी आता नवीन 'जात' तयार होतेय.
पदवीधर या वर्गाला नोकरीच्या प्रचंड संधी व डोळे पांढरे करणाऱ्या वेतनामुळे प्रतिष्ठीतपणा आलाय. त्यामुळे झटपट पदवी मिळविण्याकडे सर्वांचा कल दिसून येतो. त्यासाठी खाजगी व राष्ट्रीयकृत बँकांमधून अव्वाच्या सव्वा व्याजदरानं कर्ज काढण्यात येतं. पण आपल्याला कशात रस आहे? आपली क्षमता काय आहे? आपल्यात एखादी कला आहे का? एखाद्या खेळात आपल्याला प्रावीण्य मिळवून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवायचं आहे का? आपल्याला गावात शेती करायचीय की एखादं किराणा जनरल स्टोअर्सचं दुकान टाकून उत्तम व्यावसायिक व्हायचं आहे? याचा विचार न करता कुठल्यातरी खाजगी, राष्ट्रीय किंवा अभिमत विद्यापीठात भरमसाठ फी भरून पदवी घेतली जाते. पण पुढे नोकरी मिळेलच का नाही याची खात्री नाही. तसेच पदवीची तीन-चार वर्षे मजेत घालवल्यावर लक्षात येतं की बाहेर पडल्यावर नुसत्या पदवीचा उपयोग नाही. त्याची किंमत राहिलेली नाही. मग पुढे पदव्युत्तर पदवीसाठी दोन वर्षे वाया घालवायची किंवा एखादी तांत्रिक कौशल्यावर आधारित पदविका घ्यायची. एवढी वर्षे दिल्यावरसुद्धा समाधानकारक करियर होईल की नाही याची शाश्वती नाही. ही झाली पदवीधरांची गोष्ट. पण जे विद्यार्थी/विद्यार्थींनी दहावी-बारावी, पदवीला नापास होतात. त्यांचा विचार आपल्या मनात येतो का? शंका आहे. ही मुलं कुठं जातात याचा विचारच केला जात नाही. कारण नापास होणे आपल्याकडे शाप मानला जातो. त्याच्या/तिच्या क्षमतेवर विश्वास दाखवला जात नाही. मुळात आपली शिक्षणपध्दती ही परीक्षाकेंद्रित असल्यामुळे परीक्षेत नापास म्हणजे सर्वस्व असं चित्र उभारलं जात आहे. जे अगदी खरं आहे. पण प्रश्न असा आहे परीक्षेत नापास होणं ही एखाद्याला जोखायची फुटपट्टी होऊ शकत नाही. उदा. एखादा मुलगा शाळेत असल्यापासून कबड्डी खेळत आहे. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर पण तिथे त्याच्या गुणाची कदर केली जात नाही किंवा कबड्डी खेळण्यासाठी महाविद्यालय स्तरावर प्रोत्साहन दिलं जात नाही. त्यामुळे त्याला/तिला मजबूरीने पदवी घेण्यासाठी झगडावं लागतं. हीच व्यथा थोड्याफार फरकाने इतर सर्वच क्षेत्रांना लागू आहे. त्यामुळे पालकांच्या अपेक्षांना पूर्ण करता-करता त्यांना स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रांना तिलांजली द्यावी लागते व कुठंतरी पाच-दहा हजारांवर समाधान मानावं लागतं. त्यामुळे सध्या नापासांच व शिक्षण अर्धवट सोडू देणाऱ्याचं प्रमाण पदवीधर होणाऱ्या इतपत आहे.
| D. S. Kothari |
या सर्व गोष्टींची सुरुवात झाली कोठारी आयोगाने संपूर्ण भारतात एकच पध्दत चालू केल्यामुळे. ती पध्दत म्हणजे १०+२+३ ही शैक्षणिक रचना; जी पदवी घेण्यासाठी कुठल्याही विद्यापीठाला वापरावी लागते. त्यामुळे आपल्या इथे झालं काय की झेरॉक्स कॉपीसारखे फक्त पदवीधर तयार झाले. सर्वगुणसंपन्न विद्यार्थांपेक्षा पदवीच्या छापील कागदाला महत्त्व आलं आणि यात भारताच्या 'खाउजा' खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण यांनी आगीत तेल ओतण्याचं काम केलं. आज सर्वांना झटपट नोकरी व पटकन पाच-सहा लाखांचं प्याकेज किंवा परदेशात नोकरी पाहिजे. त्यामुळे झाले काय की ज्यांच्यात खरंच कलागुण आहेत किंवा ज्यांना स्वतःवर व स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास आहे असे मुलं/मुली स्पर्धेत मागे पडत आहेत किंवा स्वतःला स्पर्धेत झोकून द्यायला बघतायत. सरकारने जर लवकरात लवकर यात बदल केला नाही तर ज्या तरुण पिढीबद्दल आपण अभिमानाने बोलतोय ती उद्या रस्त्यावर उतरली तर मला आश्चर्य वाटणार नाही.
पदवी अभ्यासक्रमाचा विचार केला तर विद्यार्थांच्या नुकसानीसाठीच त्यांची आखणी केलीय असा भास होतो. प्रत्येक विद्यापीठाचा एककलमी कार्यक्रम असतो तो म्हणजे विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान द्यायचं. त्याला व्यावहारिकतेची जोड द्यायची नाही. त्यामुळे इंजिनियरींग/मेडिकल/विज्ञान किंवा कॉमर्समधले पदवीधर पोपटपंची केल्यासारखे बोलतात. एखादा प्रश्न विचारला तर पुस्तकी उत्तरं देतात. व्यवहारात त्याचा किती उपयोग केला हे एकालापण सांगता येत नाही. याच्या उलट विधी शाखेच्या वकिलीची पदवी घेणाऱ्याला पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रमानंतर न्यायालयात प्रक्टीससाठी परत चार ते पाच वर्षे द्यावी लागतात. एवढं करूनसुद्धा बऱ्याच जणांना त्यांच्या क्षेत्रातलं ज्ञान कमी असतं. फक्त पैसे मिळवण्यासाठीचे मार्ग तेव्हढे माहित असतात.
कला शाखा सोडली तर बाकीच्या शाखांना समाजात व्यवहार उपयोगी म्हणून मान्यता आहे. महाराष्ट्रातल्या बऱ्याच विद्यापीठांचा विचार चालू आहे कला शाखा बंद करण्याचा; ही दुर्दैवी बाब आहे. मुळात आपल्याकडे पैसा या गोष्टीला इतकं महत्त्व आहे की जी विद्याशाखा पैसा मिळवून देईल व समाजात प्रतिष्ठा वाढवेल तिकडे जाण्याचा कल आहे. त्यामुळे कला शाखा ही ज्यांना काहीही करता आलं नाही किंवा ज्याची बुद्धी व मार्क्स बेतासबात आहेत अशांसाठी उरलेली आहे. यामुळे प्राध्यापक विद्यार्थांच्या बुद्धीकडे बोट दाखवून त्यांच्याबद्दल तक्रारी करत असतात. कला शाखेत सध्या तेजीत आहे ती इंग्रजी भाषा. त्यामुळे इंग्रजी घेऊन एम. ए. करायचं आणि लगेच कुठेतरी उच्च पगाराची नोकरी मिळवायची असा प्रकार चालू आहे. हे बरोबर नाही.
शिक्षणासारख्या चांगल्या व ज्ञानाधिष्ठीत क्षेत्राला आपणच काळिमा फासतोय. याची थोडीशी कारणं बघितली तर आपल्याला लक्षात येईल की आपली समाजव्यवस्था ज्या जात प्रकारावर आधारित आहे त्यात याची मुळं खोलवर रुजलेली आहेत. जातीधारित समाजव्यवस्था असल्यामुळं प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीची प्रतिष्ठा केली जाते. तसेच प्रतिष्ठेतसुद्धा जातीयता आहे. उच्चवर्णीयांना आपण उच्चवर्णीय आहोत असल्याचा पिढ्यानपिढ्याचा अभिमान आहे तर आरक्षितांना वाटतं जर आपण आरक्षित नसू तर हा समाज परत आपणास गावकुसाबाहेर टाकेल. त्यामुळे वेळ मिळेल तिथे ते एकमेकाविरूद्ध आगपाखड करत असतात. दुसरी बाब म्हणजे समाजातल्या या दोन्ही स्तरात प्रचंड न्यूनगंड आहे पण प्रतिष्ठितपणामूळे तो दिसून येत नाही. शाळा-महाविद्यालय किंवा विद्यापीठांच्या परिसरात चक्कर टाकली हे लक्षात येतं. या प्रतिष्ठितपणामूळे जातीनिहाय गट तयार झालेत. प्रत्येकाची उठबस त्या-त्या गटात होते. त्याच गटात अभ्यास, चर्चा, उपक्रम, पार्ट्या तसेच मुला-मुलीत प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात. एखादा मुलगा परजातीतल्या मुलीवर प्रेम करत असेल तर त्या-त्या गटातल्या मुलांकडनं चोप दिला जातो. सांगितलं जातं, त्या जातीतल्या मुली कशा वाईट चालीच्या आहेत. ही बाब पचायला जड वाटेल पण हे वास्तव आहे.
पदवीधर नसल्याचे तोटे पण आहेत.
पहिला तोटा: लग्नाच्या बाजारात मुलाला किंवा मुलीला किंमत कमी. तसेच आपल्याकडे रीतसर मुलगी दाखवून, हुंडा देऊन लग्न केलं जातं.
दुसरा तोटा: किती पदव्या घेतल्या यावर त्याची हुशारी मोजली जाते. समजा एकच पदवी असेल तर तितकी किंमत येत नाही जितकी तीन ते चार असणाऱ्याला येते.
तिसरी बाब पदवीधर असेल व पगार पंचवीस ते तीस हजार असेल व त्याच्याकडे जमीनजुमला, शेतीवाडी असेल तर सोन्याहून पिवळं. मुलींनासुद्धा असा श्रीमंत नवरा पाहिजेच असतो. चौथी बाब बाप ह्या प्राण्याकडून येते. त्यांच्या इभ्रतीला धक्का न लावता समाजात प्रतिष्ठा मिळवून देणारा जावई पाहिजे असतो. आपसूक ही वाट इंजिनीयर-डॉक्टर नंतर वकील मग बाकीच्यांची वर्णी. अशात एमपीएससी-यूपीएससी करून उच्चपदावरची जागा घेणारेसुद्धा आहेत. पण प्रथम प्राधान्य इंजिनियर-डॉक्टरला.
या प्रतिष्ठेमुळे बऱ्याच मुलींना विनाकारण आपल्या करियरवर पाणी सोडावं लागत आहे. कारण त्यांना पुढे परदेशात स्थायिक व्हायला मिळतं. इंजिनियर-डॉक्टर या पदव्या पूर्वी भारतात सहाशे संस्थानं होती. त्यात राजाच्या मागेपुढे करणारे सरदार, उमराव, वतनदार होते. त्यांची स्वतःची मिजास व ऐट रहायची. तोच प्रकार इंजिनियर-डॉक्टर या पदव्यांना आला आहे. विशेष म्हणजे आपण ह्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही आहोत. त्यामुळे पदवीधर नसण्याला किंमत नाही. कारण आपसूक तुमच्यावर अशिक्षितपणा किंवा काहीही करू शकणार नाही याचा शिक्का बसतो. तसेच घरात, मित्र परिवारात, आप्तेष्ठात किंमत केली जात नाही. यामुळे त्यांच्यात न्यूनगंड वाढायला लागतो. मग दिवस काढण्यासाठी किंवा काहीतरी पैसे कमवायचेत म्हणून कुठेतरी नोकरी केली जाते किंवा कर्ज काढून व्यापार केला जातो. व्यापार करण्याचा अनुभव नसल्यामुळे ते बुडीतखाती जायला वेळ लागत नाही. खेड्यापाड्यात, तालुक्यात, जिल्ह्याच्या ठिकाणी हे चित्र सर्रास दिसून येतं. ही बाब आशादायक नाही कारण आपल्याकडे मुंबई, पुणे या दोन शहरातच रोजगाराचं विकेंद्रीकरण झाल्यामुळे पदवीधर व अशिक्षितांचा (यात मी पदवी नसणाऱ्यांना, दहावी-बारावी पास तसेच निव्वळ मुंबई-पुण्यात नशीब आजमावायला आलेल्यांना गृहीत धरलं आहे.) ओढा वाढला आहे.
यामुळे पारंपारिक शेतीपासून फारकत घेतली जात आहे. ज्या कृषीप्रधान संस्कृतीचे आपण गोडवे गातो तिथेच तिला मरणपंथाला आलेली बघून मनाला यातना होतात. शेतीमालाला भाव नसल्यामुळे तसेच निसर्गाकडून सातत्यानं दुर्लक्षित केल्यामुळे व कमीत कमी कष्टात नोकरी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा आपल्या मुलांना उच्चशिक्षित करायचं याकडे कल वाढला आहे. तसेच वर्षभरात शेतात घाम गळून, काबाडकष्ट करून मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशात घरदार चालविण्यापेक्षा थोडसं कर्ज काढून एखाद्या कमी दर्जाच्या शाळा-कॉलेज किंवा विद्यापीठातून पदवी घेऊन नोकरीत पंधरा-वीस हजार मिळवणं फार सोप्पय. तसेच शेतात शारीरिक मेहनत करावी लागते व बरेच दिवस मिळकतीकडे वाट पहावी लागते. त्यापेक्षा कॉलेजातली बौद्धिक मेहनत बरी. चार-पाच तास आयत्या नोट्सचा अभ्यास केला की परीक्षेत सत्तर टक्क्याच्या वर मार्क; मग आरक्षणाचा फायदा घेऊन महिन्याकाठी मिळणाऱ्या पगाराकडं डोळा लावून बसायचं. दिवसाचे सात-आठ तास ऐटीत बसून काम केल्याचा फायदा. अशा प्रकारे पदवी, पदवीधर, अशिक्षित, अर्ध-शिक्षित, अडाणी यांची चमत्कारिक परिस्थिती झाली आहे.

जानेवारी महिन्यात पासष्ठ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात. सर्वजण वेगवेगळ्या आर्थिक स्तरातून आले होते. पण त्यांचं एकच ध्येय होतं शिक्षण घेणे. त्यांच्या आत्महत्येची कारणं तपासली तर एक बाब प्रकर्षानं जाणवते ती म्हणजे पालकांच्या भरमसाठ अपेक्षा. ही अपेक्षा मोठी गमतीशीर चीज आहे. लहान असेतोवर याची आठवण कुणालाही येत नाही पण परीक्षेत थोडीशी हुशारी दाखवली की ती डोकं वर काढायला लागते. मग एकदा का तिच्या कचाट्यात अडकलं की त्यातून सुटका होत नाही किंवा आत्महत्या करण्याशिवाय गत्यंतर उरत नाही. त्यामुळं हुशार असणं किंवा नसणं यात फार काही फरक पडत नाही. फक्त पालकांच्या मारुतीच्या शेपटासारख्या वाढत जाणाऱ्या अपेक्षा थांबत नाहीत.
आपण इतके कसे निर्लज्ज झालो आहोत कळायला मार्ग नाही. शेकडो विद्यार्थी दरवर्षी आत्महत्या करतात तरी आपल्याला जाग येत नाहीये. दरवर्षी फक्त आत्महत्यांचा अभ्यास केला जातो आणि आकडेवारी सांगितली जाते. आपल्या वागण्याबोलण्यात, सामाजिक आंतरसंबंधात याची मुळं खोलवर रोवली गेली आहेत किंवा त्यांना मुळासकट उपटून काढायचा विचार केला जात नाही. फक्त समाजसुधारणेबाबत बाष्कळ बडबड केली जाते. हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे. नाहीतर याचे परिणाम येणाऱ्या काळात खूप भयावह असतील.
मी त्या दिवसाची वाट बघतोय ज्या दिवशी दहावीचा निकाल लागल्यावर एखादा मुलगा/मुलगी आत्मविश्वासाने आपल्या आई-वडिलांना म्हणेल की तो/ती कबड्डीत करियर करणार आहे व त्यासाठी कबड्डी महाविद्यालयात प्रवेश घेणार आहे.
पूर्व प्रसिद्धी: उच्चशिक्षण विशेषांक १४ एप्रिल २०१०
(दयाश्री सोपानदेव एज्युकेशन सोसायटी, लातूर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त...)






Comments
Highly appreciated......