माझं लेखकपण

थर्टी फर्स्टच्या रात्री आम्ही एका मित्राच्या रूमवर सेलेब्रेशन करत होतो. माझा एक मित्र टुन्न होता. बोलता-बोलता तो मित्राच्या रूम पार्टनरला म्हणाला," हा माझ्यावर कादंबरी लिहितोय. याने एक कादंबरीसुद्धा लिहिलीय." मी मात्र विचित्र मनस्थितीत होतो. त्याला काय बोलावं हे सुचलं नाही. मी शांतच राहिलो.

परवा दिवशी दै. सकाळचा ८१ वा वर्धापनदिन होता. मी नेहमीप्रमाणे अप्पा बळवंत चौकात गेलो होतो. आलोच आहे तर भेटावं म्हणून तिथे साप्ताहिक सकाळमधे काम करणाऱ्या मित्राला फोन लावला. त्याने कार्यालयातच बोलावून घेतले. मी गेलो तर तिथे वर्धापनदिनाची जय्यत तयारी करून ठेवलेली. त्याने उत्सुकतेने मला सगळे दाखवले. सोबत त्याच्या बॉसशी, ज्या की एक महिला आहेत, भेट घालून दिली. ओळख करून देताना म्हणाला हा लेखक आहे. याने एका महत्वाच्या विषयावर कादंबरी लिहिली आहे. त्या बाईंनी स्मित केलं. मला विचारलं फक्त कादंबरीच लिहिता की हलकं-फुलकं काही लिहिता. मी नाही म्हणालो. त्यांना वाटलं मी अधिक काही बोलेन कादंबरीबद्दल कारण त्यांच्या बरोबर माझ्या मित्राचे अजून दोन सहकारी होते. मी नेहमीप्रमाणे चहा पिता-पिता काहीच बोललो नाही फक्त त्या माझ्या मित्राशी बोलत राहिलो. 

नंतर आम्ही सकाळच्या कार्यालयात आलो. तो पर्यंत बरेच लोक येत होते. त्यात उत्तम कांबळे, मोहन धारिया आणि नीलम गोऱ्हे पण होत्या. तेव्हढ्यात माझ्या मित्राने मला परत एका माणसाशी ओळख करून दिली. ते सकाळच्या सप्तरंग पुरवणीचं काम बघतात. माझ्या मित्राने त्यांना पण मी लेखक आहे असं सांगितलं. त्यांनी आस्तेवाईकपणे चौकशी केली. स्वतः एक लेखक असून बारा पुस्तके छापलीत असं सांगितलं. त्यांच्या सोबत एक नवीनच कामाला लागलेली एक सहाय्यिका होती. ती लगेच म्हणाली माझी कादंबरी परीक्षणासाठी सकाळमधे आलीय. मला मनातून हसू फुटत होतं. मी मित्राला बाजूला घेऊन विचारलं की ती खोटं बोलतीय ना! तो हो म्हणाला. मला याचं आश्चर्य वाटलं नाही.

मी दोन्ही वेळी आणि पुन्हा काहीही बोललो नाही. 

माझ्या मित्रांना मी लेखक असल्याचं खूपच अप्रूप वाटतं. त्यांना वाटतं मी एक कादंबरी लिहून काहीतरी जगावेगळा पराक्रम केलाय. मी कोणीतरी प्रतिभेचं वरदान घेऊन या पृथ्वीतलावर मंगळावरनं अवतरलोय असं त्यांना कदाचित वाटत असेल. कादंबरी प्रकाशित झाल्यापासून त्यांच्यात चमत्कारिक बदल घडलंय. ते आवर्जून माझ्या मताची वाट बघतात किंवा माझ्या मताचा, आवडत नसेल तरी, आदर करतात. खरं तर त्या कादंबरीला या वर्षी दोन वर्ष पूर्ण होतील. ती अजून खूप लोकांपर्यंत पोचलीच नाही. मागे साहित्य संमेलनाधक्ष्य नागनाथ कोत्तापल्लेंना भेटण्यात आलं. त्यांनासुद्धा आश्चर्य वाटलं की एक कादंबरी प्रकाशित होते अन पुण्यातल्या पुण्यात ती खूपशी पोचत नाही. जर ती अजून लोकांपर्यंत पोचलीच नाही तर मी त्याचा टेंभा का मिरवायचा? इथे टेंभा त्या अर्थाने नाही वापरला तर मी लेखक आहे असं जगभर का सांगत सुटायचं?

मला माहित नाही मराठीत लेखक नवीन आणि जे साहित्याबद्दल अप्रूप बाळगून आहेत अश्या लोकांना कसं तोंड देत असतील. अश्या अनुभवांबद्दल मी वाचलेलं नाही. खूप दिवसांपूर्वी ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहरांना भेटायला गेलो होतो. त्यांना कौतुकानं सांगितलं मी पण एक कादंबरी लिहिलीय. त्यांना कौतुक वाटलं. त्यांनी कुठल्याही मराठी लेखकासारखं काळजीच्या सुरात विचारलं कादंबरी खपली का? मी म्हणालो म्हणावी तितकी नाही. मी त्यांना असे अनुभव सांगू शकलो नाही. मुळात मला स्वतःची जाहिरात करता येत नाही. त्यामुळे अश्यावेळी अवघडल्यासारखं होतं. 
  • काय बोलावं सुचत नाही. 
  • समोरच्याला कुठल्या विषयावर बोलावं? काय सांगावं? 
  • मराठी साहित्यातल्या बुजुर्ग अन् जुन्या मंडळींना शिव्या देऊन मतं मांडावीत का ? 
  • मी कसा पारंपारिक साहित्यापेक्षा वेगळा आहे हे ठसवावं का? 
  • आपल्याच कादंबरीत कशी रुपबंधाबद्दल प्रयोग केलाय हे सांगावं नाहीतर आपला विषय कसा गंभीर अन् महत्वाचा आहे.
  • आपल्या इथे नवोदित लेखकांना कसे अनुल्लेखानं मारले जाते या विषयी आगपाखड करावी? 
  • माझा विषय कसा हटके आहे हे ठासून द्यावं? 
यातली एकही गोष्ट बोलावी अशी माझी मानसिकता नसते. मी जेव्हा एखाद्याला भेटतो तेव्हा मी कदाचित ट्रान्समधे जात असेल म्हणूनच मला काय बोलावे ते सुचत नसावे. माझी अजून तयारीच झाली नाही सर्व साधारणपणे लोकांना तोंड द्यायची. अजून बर्याच कादंबर्या लिहायच्या आहेत पण सुरुवातीलाच मी असा वागत असेन तर पुढे माझं कसं होईल.

या वर काही उपाय आहे का?

Comments