दि अटॅक्स ऑफ २६ /११ : समकालीन विषय आणि चित्रपट

बऱ्याचदा असं होतं की एखादी हिंसक घटना ही ज्याप्रमाणे सामान्य माणसांना हादरवून सोडते, तशी फिल्ममेकर्सनादेखील. मग ही घटना घडल्यावर नजीकच्या काळात तिच्याकडे एक विषय म्हणून पाहण्यापेक्षा ते ती विसरून जाण्याच्या मागे लागतात. याला प्रामुख्यानं दोन कारणं संभवतात. पहिलं म्हणजे त्या घटनेची प्रॉक्झीमिटी, या घटनेच्या, त्या स्थलकालाच्या संबंधित व्यक्तींच्या ते इतके जवळ असतात, की चित्रपट बांधण्यासाठी जो त्रयस्थपणा लागतो, तो त्यांना मिळू शकत नाही. दुसरं कारण असतं ते या माध्यमांचं व्यावसायिक स्वरुप. चित्रपट चालायचा तर प्रेक्षकांचा प्रतिसाद आवश्यक आहे आणि बहुधा अशा घटनेनंतर प्रेक्षकांचं घटनेशी भावनिकदृष्ट्या जोडलेले असणं त्याला त्या विषयावरच्या चित्रपटाकडे आणणार नाही, तर बरोबर विरुद्ध घेऊन जाईल, अशी शक्यता असते. या दोन्ही कारणांमुळे घटनांना प्रामाणिक स्वरुपात मोठ्या पडद्यावर येण्यासाठी काही एक काळ जावा लागतो. आश्चर्य म्हणजे युद्धासारख्या घटना या अधिक मोठ्या प्रमाणात हिंसेशी संबंधित असूनही त्या सामान्य प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर घडत नसल्यानं पडद्यावर लवकर जाऊ शकतात; मात्र रोजच्या आयुष्यात असं काही घडलं तर मात्र ते पडद्यावर पाहणं सोपं ठरत नाही. -- गणेश मतकरी (शहरी समाज आणि दहशत हॉलीवूड-बॉलीवूड सा. सकाळ १३ सप्टेंबर २००८)

गणेश मतकरींनी म्हटल्याप्रमाणे आपल्या इथे पलायनवादी चित्रपट निर्मिती संस्था असल्यामुळे एखाद्या महत्वाच्या सामाजिक घटनेकडे कानाडोळा करण्याचाच जास्त करून कल असतो. परंतु राम गोपाल वर्मा दिग्दर्शित दि अटॅक्स ऑफ २६ /११ हा चित्रपट सव्वीस अकराच्या भयानक घटनेकडे त्या तीन दिवसात नेमकं काय घडलं अशा पद्धतीने पाहतो. चित्रपटाची सुरुवात मुंबईचे त्या वेळचे जॉइन्ट कमिशनर राकेश मारिया यांनी चौकशी आयोगापुढे त्या दिवशी काय काय अन् कसं कसं घडलं याच्या कथनानं होते. सुरुवातीला लिओपॉल्ड कॅफेवरचा हल्ला, ताज व सीएसटीमधील अंदाधुंद गोळीबार, कामा हॉस्पिटलमधील घुसखोरी अन् शेवटाकडे कसाबचं पकडलं जाणं. त्याची फाशी अशा अनुक्रमाने कथानक घडतं. यात दिग्दर्शक चित्रपटीय स्वातंत्र्य घेतो त्यामुळे राकेश मारियाचं (नाना पाटेकर) कसाबला (संजय जैस्वाल) शिव्या घालत लेक्चरबाजी करणं सुद्धा प्रेक्षक सहन करतो. 


मला चित्रपट संपल्यावर एक प्रश्न पडला. आपले निर्माते-दिग्दर्शक गंभीर सामाजिक विषयावर चित्रपट बनवत नाहीत आणि बनवले तर ते बघावेत इतक्या दर्जाचे नसतात. काही अपवाद: मुंबई मेरी जान, फिराक व परझानिया. मग या दिग्दर्शकाला एवढी घाई काय लागली होती की त्याने तडकाफडकी इतक्या संवेदनशील विषयावर चित्रपट बनवावा. थोडा विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं आपण एखाद्या घटनेकडे कसं बघतो अन् त्या विषयाचं गांभीर्य आकलन करायची किती क्षमता आहे यावर ते अवलंबून आहे. मुळात आपण भारतीय अतिशय कुपमंडूक वृत्तीने जगतो. त्यामुळे कोणत्याही गोष्टीकडे त्या कथेतल्या बेडकासारखं आपल्या मर्यादेच्या पलीकडे स्वतःला फुगवतो अन् सरतेशेवटी फाटकन फुटून जातो. हा चित्रपट या अशाच कुपमंडूक वृत्तीचा बळी आहे. 

राम गोपाल वर्मा किंवा तत्सम मंडळी काय करतात इंग्रजी वर्तमानपत्रातील फुटकळ, त्रोटक लेख व इंग्रजी न्यूज वाहिन्यांच्या तथाकथित चर्चा यावर स्वतःची मतं ठरवतात. यांचं वाचन अन् चित्रपटासाठी रिसर्च किती तोकडा असतो हे चित्रपट बघून लगेच लक्षात येतं. यांची कुठलीही सामाजिक, राजकीय, धार्मिक वैचारिक भूमिका नसते. जे काही असतं ते वर्तमानपत्रीय लेखनाच्या पातळीचं. त्यामुळं विषयवस्तूचं गांभीर्य निघून जाऊन त्यातून निर्माण होणारी कलाकृती न राहता फक्त वेळखाऊपणा राहतो. दि अटॅक्स ऑफ २६/११ हा असा वेळखाऊ चित्रपट झालाय. ज्यात समकालीन भूतकाळात घडलेल्या घटनेचं कुठल्याही पातळीवर खरंखुरं चित्रण नाही. त्यामुळे प्रेक्षक जेव्हा खूप मोठ्या अपेक्षा घेऊन जातो तेव्हा  त्याच्या वाट्याला दारूण अपेक्षाभंग येतो. 

राम गोपाल वर्मा हा कधीकाळी सर्वांचा आवडता दिग्दर्शक होता. परंतु गेल्या बऱ्याच वर्षातलं त्याचं काम बघितलं की वाटतं या माणसानं शिवा, सत्या, कंपनी सारखी चित्रत्रयी दिली तो हाच का!!! की ते चुकून बनवले गेलेले चित्रपट होते. गमतीदार विरोधाभास असा वरील चित्रत्रयी संपूर्णपणे काल्पनिक कथांवर आधारित होती तरी त्याला त्या काळाची भक्कम पार्श्वभूमी होत. विषयवस्तू गंभीर असल्यामुळे दिग्दर्शकसुद्धा गांभीर्याने व संवेदनशीलतेने याकडे बघायचा. आताचा विषयच घडलेल्या घटनेचं चित्रपटीयकरण असल्यामुळे आपसूक त्यात गंभीरता आली. परंतु दिग्दर्शक अतिशय बाळबोधपणे याकडे बघतो. फक्त एका नंतर एक फ्रेम्स मांडायच्यात या उद्देशाने चित्रीकरण करतो. त्याला कानाचे पडदे फाटतील अशा प्रकारच्या पार्श्वसंगीताची जोड देतो. इतकी दिग्दर्शकीय अधोगती भारतीय सिनेमात कधी आढळली नाही. 

एड वूड नावाच्या जगातील सर्वात वाईट चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शकाबद्दल वाचलं होतं. राम गोपाल वर्माचे कंपनी नंतरचे सर्व चित्रपट बघितल्यावर वाटतं एड वूडला असं तडकाफडकी वाईट ठरवलं जाणं हे घाईचं होतं.

Comments