अनुराधा आपटे आणि आमची पिढी
[ सूचना: त्रिभंग सिनेमातील काही महत्त्वाच्या प्लॉट पॉईंट्सची सविस्तर चर्चा लेखात होणार आहे. त्यामुळे ज्यांनी सिनेमा बघितला नसेल त्यांनी लेख वाचू नये, ही नम्र विनंती.] रेणुका शहाणे लिखीत-दिग्दर्शित त्रिभंग सिनेमा तीन स्त्रिया व पिढ्यांची कहाणी सांगतो. नयनतारा आपटे, अनुराधा आपटे व अनुराधाची मुलगी माशा या अनुक्रमे आजी, आई व मुलगी यांची कथा आहे. पैकी नयनतारा आपटे या साहित्य अकादमी विजेत्या लेखिका. अनुराधा आपटे ही ओडिसी नृत्यांगणा व बॉलीवूड अभिनेत्री, तर माशा ही सर्वसामान्य घरातील सून. तिघींची विश्वे वेगळी. त्यांच्यात म्हटला तर संवाद आहे म्हटला तर नाही. नयनतारा ब्रेन स्ट्रोक झाल्यामुळे कोमात जातात इथनं सिनेमाची सुरूवात होते. तत्पूर्वी अनुराधा आपटे कशी आहे याची चुणूक तिच्या ओडिसी नृत्याच्या कार्यक्रमा आधी मेकअप रूममधील छोटेखानी प्रसंगात दिसून येतं. तिला सिगरेट ओढण्याची सवय असते. ती पाकिटातून सिगरेट काढून पेटवणार असते की तिची मुलगी व तिचा बॉयफ्रेंड तिला नको ओढूस म्हणतात. ती लगेच प्रतिक्रिया देते की तू मॉरल पोलीस होऊ नकोस. मी ओढणारच म्हणते. पुढच्याच प्रसंगात आईला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलंय म्...