राझी : एक चांगला गुप्तहेरपट

गैरों पे करम, अपनो पे सितम या लताच्या आवाजातील गाण्यात माला सिन्हा तिच्या मनातील भावना धर्मेंद्रला गाऊन दाखवते. सिनेमा आँखें. साल १९६८. धर्मेंद्र जरी ते ऐकत असला तरी व त्याला तिच्या भावना समजत असल्या तरी त्याच्यासाठी त्याचं काम, कर्तव्य अधिक महत्वाचं असतं. कारण तो एक गुप्तहेर असतो. आँखें काही भारतातील पहिला गुप्तहेरपट नव्हता. जेम्स बॉंडच्या डॉ. नोने प्रेरित झालेला तेलगु सिनेमा गुडाचारी ११६ (१९६६) हा पहिला गुप्तहेरपट होता. ज्याचा रिमेक हिंदीत लगेच फर्ज नावाने बनवला गेला. त्यातलं हम तो तेरे आशिक है, सदियों पुराने हे जितेंद्र-बबितावर चित्रित झालेलं गाणं जितेंद्रच्या खास नृत्याच्या शैलीमुळे व लता-मुकेशच्या आवाजामुळे प्रचंड प्रसिद्ध पावलेलं. त्यामुळे हिंदी सिनेमाला गुप्तहेरपटाचं नाविन्य नाही. या दोन्ही सिनेमांच्या पटकथा अशा होत्या की नायकाला किंवा नायिकेला त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवण्यासाठी गाण्याचा व नृत्याचा आधार घ्यावा लागावा. अर्थात गाणेविरहित हिंदी सिनेमा हा प्रकारच तेव्हा अस्तित्वात नव्हता. त्यामुळे त्यांच्या सिनेमाच्या तार्किकतेत ते योग्यच होतं.

आज प्रदर्शित झालेला राजी हा आलिया भट अभिनित व मेघना गुलजार दिग्दर्शित सिनेमा त्यावेळच्या सिनेमांपासून खूप पुढे आलेला आहे. पण त्यामुळे तो उत्कृष्ट किंवा आजपर्यंतचा सर्वोत्कृष्ट गुप्तहेरपट आहे असं तडकाफडकी शिक्का मारणं योग्य नाही. अशा पद्धतीचे अजून किमान चार तुल्यबळ सिनेमे आले तर त्यांची तुलना याच्याशी करून याचं श्रेष्ठत्व तपासावं लागेल.

कथानकानुसार सेह्मतचा (आलिया भट) विवाह इक्बालशी (विकी कौशल) लावला जातो. वडील हिदायत (रजित कपूर) यांनी भारतासाठी जे काम केलंय ते सेह्मतने पुढे न्यावं असं त्यांना वाटतं. देशासाठी त्यांनी आयुष्यपणाला लावलेलं असतं तेच काम तिने करावं अशी रास्त अपेक्षा त्यांची असते. त्यासाठी तिला गुप्तहेराचं प्रशिक्षण दिलं जातं. ती त्या प्रशिक्षणाचा वापर करून बरीच माहिती भारताकडे पाठवते. पण एके क्षणी तिच्या एकूणच कामाची परीक्षा पाहिली जाते. ती परीक्षा पास होते का ते मात्र पडद्यावरच बघावं लागेल. कथानकाचा काळ १९७१ चा आहे.

विषयानुसार पटकथेत तपशील असणं आवश्यक असते हे नुकत्याच आलेल्या ऑक्टोबर सिनेमाने दाखवून दिले होते. त्यामुळे कथेला वास्तववादी आकार येतो. पात्र जिवंत वाटायला लागतात. कथानकात विश्वसनीयता येते. हे तपशील मुळातच वापरायचे नाहीत किंवा काहीतरी काल्पनिक प्रसंग रचून कथानकाची उभारणी करायची असे याधीच्या गुप्तहेरपटाच्या नावाखाली हिंदी सिनेमाने केले आहे. 

पटकथाकार भवानी अय्यर-मेघना गुलजार कॉलिंग सेह्मत या हरिंदर सिक्का लिखित कादंबरीचं रुपांतर करताना गुप्तहेरांच्या कामाला केंद्रस्थानी ठेवून पटकथेची रचना करतात. त्यामुळे सेह्मतचं प्रशिक्षण व तिने त्याचा केलेला वापर याला कथानकात जास्त महत्व मिळतं. तर इक्बाल-सेह्मतच्या वाढत्या नात्याला तुलनेने कमी महत्व दिलं जातं. त्यांच्यात जवळीकता येते पण त्याला भारत-पाकिस्तान संबंधांची किनार असल्यामुळे ते संबंध म्हणावे तसे तपशीलात उभे केले जात नाहीत तर काही भावूक प्रसंगात त्यांचं जवळ येणं यात उरकले जातात. सेह्मत गुप्तहेर असल्यामुळे तिने तिचं विहित कर्तव्य पार पाडणं हे जसं अपेक्षित आहे तसं तिची दोलायमान अवस्थाही दाखवणं आवश्यक आहे. तिची ही अवस्था कुठेही दिसून येत नाही. मग तिच्या हाती उरतं ते फक्त कर्तव्य पार पाडणे.

मेघना गुलजारांचं दिग्दर्शन सफाईदार असलं तरी कथानकात वाढता तणाव त्या आणत नाहीत जे की इथे अपेक्षित आहे. तणावपूर्ण असणारा एकच प्रसंग आहे जो कथेत सर्वात योग्य ठिकाणी येतो. जिथे खरंच तणाव तयार होतो तोपर्यंत कथा चढत्या क्रमाने सरळसोटपणे मार्गक्रमणा करते.

गुप्तहेरपट तसा जुना चित्रपट प्रकार. अगदी हॉलीवूडच्या मूकपटांनी सुद्धा त्यात सिनेमे केले आहेत. आपल्या इथे हा प्रकार म्हणावा तसा फुलला नाही. जे काही गुप्तहेरपट आहेत ते हिंदी सिनेमांची वैशिष्टे असणाऱ्या इतर गोष्टींचा वापर मनमोकळेपणाने करतात त्यामुळे खास गुप्तहेराला केंद्रस्थानी ठेवून तपशीलात सिनेमे केलेले आढळत नाहीत. राजी अशांना एक चांगलं उदाहरण ठरावा व असे सिनेमे येत रहावेत.

रेटिंग: ३.५/५

Comments