हिंदीतील आश्वासक कथानके

‘आर्टिकल १५’ च्या पोस्टरवर ‘फर्क बहुत कर लिया, अब फर्क लायेंगे’ किंवा ‘स्त्री’ सिनेमाची टॅगलाईन ‘मर्द को दर्द होगा’ त्यांच्या विषयवस्तूचा वेगळेपणा चटकन जाणवून देतात. तसेच हे दोन्ही सिनेमे वेगवेगळ्या सिनेप्रकारांचं प्रतिनिधीत्व करतात. ‘आर्टिकल १५’ समकालीन भारतीय जातव्यवस्थेचं चित्रण करतो तर ‘स्त्री’ विनोदी-भयपटाच्या साच्यात भारतीय मानसिकतेवर भाष्य करतो पण त्याचं मनोरंजन मूल्य कमी होऊ देत नाही. ‘स्त्री’ सिनेमाचं यशस्वी होणं हिंदी सिनेमातल्या बदलत्या ट्रेंड्सचा भाग म्हणावा का? की फक्त एक चांगली कथा, चांगलं दिग्दर्शन व ओळखीचे अभिनेता-अभिनेत्री असल्यामुळे प्रेक्षकांना तो आवडला असेल. गेल्या काही वर्षात हिंदी व्यावसायिक सिनेमांनी एकाचवेळी चांगल्या कथा उत्तम पटकथेद्वारे मांडायचा सपाटा लावलाय त्याचाच हा परिपाक म्हणावा का? म्हटलं तर हो म्हटलं तर नाही.

हिंदी व्यावसायिक सिनेमात पटकथेला नेहमीच दुय्यम स्थान राहिलं आहे. खासकरून अमिताभच्या सिनेमांमध्ये पटकथेपेक्षा संवादांना महत्त्व जास्त देण्यात आलं. सलीम-जावेदनी संवादांना इतर गोष्टींपेक्षा सिनेमाच्या अग्रभागी ठेवलं. त्यामुळे अमिताभ व त्यानंतरच्या काळात आलेले सिनेमे संवादांना खूप महत्त्व देतात असं दिसून येतं. ऐंशीच्या दशकात हिंदी सिनेमा म्हणजे हाणामारी, असंबंध कथा-पटकथा, टप्प्या टप्प्यांवर येणारी गाणी, साचेबद्ध नायक-नायिका असा मामला झाला. नव्वदच्या दशकात डेव्हिड धवनचे सिनेमे व करण जोहर, सुरज बडजात्याचे सिनेमे असा उघड मामला होता. पटकथेपेक्षा मनोरंजन मुल्यांवर भर दिला जायचा. ह्या भाऊगर्दीत दोन सिनेमे वेगळे ठरले पहिला राम गोपाल वर्माचा ‘सत्या’ व जॉन मथ्यू मठानचा ‘सरफरोश’. ‘सत्या’ ने पटकथेचं महत्त्व अधोरेखित केलं ते विषयवस्तूकडे वास्तववादी पद्धतीने बघितल्यामुळे. तसेच दिग्दर्शक अनुराग कश्यपचं लेखन ही त्याला कारणीभूत आहे. ‘सरफरोश’ पटकथेसाठी दिग्दर्शक-पटकथाकाराने प्रसंगी फिल्ड वर्क करणं गरजेचं आहे हे दाखवून दिलं. भारतातील दहशतवाद इतक्या चांगल्या पद्धतीने चित्रीत झालेलं हिंदी व्यावसायिक सिनेमातील ते एकमेव उदारहण म्हणता येईल.

दोन हजारोत्तर व्यावसयिक सिनेमा त्याच्या ठरलेल्या मार्गाने जात होता. रोहित शेट्टीने २००३ साली ‘जमीन’ द्वारे केलेलं पदार्पण येऊ घातलेल्या वेगळ्या व्यावसायिक सिनेमांची नांदी ठरली. तर दुसरीकडे दिग्दर्शक अनुराग कश्यप व विशाल भारद्वाज त्यांना भावतील असे सिनेमे काढत होते. त्यात ‘देव डी’ व ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ हे ट्रेंड सेटर ठरले. तसेच दिबाकर बॅनर्जीच्या ‘खोसला का घोसला’ ने मध्यमवर्गाला कथेच्या केंद्रस्थानी आणलं. आज दिसणारा सिनेमा काही प्रमाणात बॅनर्जीला प्रमाण मानणारा आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कारण छोट्या शहरात किंवा दिल्लीसारख्या मुंबई केंद्रित कथानकाच्या बाहेर ही चांगले सिनेमे बनवता येऊ शकतात हे ‘खोसला का घोसला’ ने दाखवून दिलं होतं. आज छोट्या शहरात सिनेमा घडतायत त्याला वरील बाब कारणीभूत आहे. सोबतच नव्या दमाच्या दिग्दर्शकांना पटकथेचं महत्त्व कळलेलं आहे. अजून एक कारण यात दिसून येतं ते जागतिक सिनेमांचं या पिढीला असणारं ज्ञान. तसेच निव्वळ ज्ञान असून कमी नाही तर त्याचा उपयोग चांगल्या कथा मांडण्यासाठी करण्याचा कल दिसून येतो. उदा. ‘बदला’ हा स्पॅनिश फिल्म ‘द इनव्हिजिबल गेस्ट’चा अधिकृत रिमेक. निव्वळ कुठल्यातरी सिनेमाची चोरी किंवा इन्स्पायर्ड असण्यापेक्षा अधिकृत रिमेक कधीही सेफ गेम असतो. सोबत दिग्दर्शकाला काय सांगायचय याचा एक आराखडा निश्चित रूपात त्याच्यासमोर असतो. हा एक चांगला पायंडा या सिनेमाने घालून दिला आहे.

सध्या वेगळी कथानके बघायला मिळतायत याचं श्रेय दिग्दर्शकांना व निर्मात्यांना द्यावं लागेल. मागच्या वर्षी आलेले ‘राझी’, ‘बधाई हो’, ‘वीरे दी वेडिंग’, ‘अंधाधून’, ‘मुल्क’, ‘मंटो’, ‘मनमर्जियां’, ‘पॅड मॅन’, ‘रेड’, ‘पटाखा’, ‘तुंबाड’, ‘भावेश जोशी’, ‘मोहल्ला अस्सी’, ‘गोल्ड’, ‘सुई धागा’, आणि ‘ऑक्टोबर’ हे सिनेमे कमी अधिक प्रमाणात प्रेक्षक पसंतीस उतरलेत. याचं कारण यांनी निव्वळ प्रेक्षकांना रिझवण्यापेक्षा काही एक सांगणे महत्त्वाचे आहे या गोष्टीला महत्त्व दिलंय. तसेच विषयाचं वैविध्य असलं तरी सर्वच्या सर्व वेगळेपणासाठी किंवा आशयघन आहेत असं नाही. पण एकूण चित्र पाहता निर्माते-दिग्दर्शक नेहमीच्या कथानकांना फाटा देऊन त्यांना जे भावेल त्याला पसंती देत आहेत असं दिसतंय. यात वैशिष्ट्यपूर्ण म्हणता येईल असा ‘बधाई हो’ हा सिनेमा आहे. सिनेमाची पटकथा कशी असावी याचा वस्तुपाठ नसला तरी चांगली पटकथा कशी असावी याचं उत्तम उदाहरण. अचूक व्यक्तिरेखाटन हे याचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. टिपिकल भारतीय मध्यमवर्गीय नोकरदार कुटुंब पडद्यावर कसं दिसावं हे त्यात दिसून येतं. चांगल्या पटकथेचा फायदा असा की अभिनेते जीव ओतून काम करतात. त्याचा अंतिमतः फायदा सिनेमालाच होतो. प्रेक्षक सुद्धा तपशीलात पटकथा असेल तर कथेशी चटकन रिलेट होतो. त्याला त्याच्या आयुष्याचा तुकडा बघायला मिळतो. सिनेमाची लोकप्रियता वाढायला लागते.

यावर्षी आलेल्या सिनेमांवर एक नजर टाकली तर आश्वासक कथानके बरीच आहेत असं दिसतं. ‘मनकर्णिका’, ‘उरी’, ‘सुपर ३०’, ‘गेम ओव्हर’, ‘केसरी’, ‘फोटोग्राफ’, ‘रोमिओ अकबर वॉल्टर’, ‘कबीर सिंग’, ‘बदला’, ‘ठाकरे’, ‘दि अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’, ‘पीएम नरेंद्र मोदी’, ‘गली बॉय’, ‘जजमेंटल है क्या’ आणि ‘आर्टिकल १५’ यांनी वेगळी कथानके घेऊन यायचा चंग बांधलाय असं दिसतंय. ही हिंदी सिनेमाच्या वृद्धीसाठी आश्वासक बाब आहे. ‘आर्टिकल १५’ सारख्या व्यावसायिक अभिनेत्यांना घेऊन केलेले सिनेमे हिंदी सिनेमांची वाटचाल कुठल्या दिशेने चाललीय हे दाखवून देतायत. ऐंशीच्या दशकात समांतर सिनेमात असे विषय हाताळले जात होते पण त्यांचा प्रेक्षकवर्ग हा अभ्यासू सिनेमे बघणारा होता. नाच-गाणी बघणारा प्रेक्षक त्यांच्या वाऱ्यालाही उभा राहायचा नाही. त्यामुळे ते सिनेमे सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहचायचे नाहीत. पण अनुभव सिन्हासारख्या व्यावसायिक पठडीत काम केलेला दिग्दर्शक जेव्हा संवेदनशील विषय हाताळतो तेव्हा प्रेक्षकही त्याला प्रतिसाद देतात. त्यांच्यासाठी जसा ‘बाहुबली’ आहे तसाच ‘आर्टिकल १५’. उलट त्यांना कोणत्या सिनेमाला झुकतं माप द्यायचं आहे याचा चॉईस आहे. तसेच गेल्या काही वर्षात नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईमसारख्या स्ट्रिमिंग सर्व्हिसेसमुळे घरबसल्या जागतिक दर्जाचे सिनेमे व वेब सिरीज बघायला मिळतायत. प्रेक्षकांची मनोरंजनाची व सकस कलाकृती पाहण्याची भूक त्यामुळे भागवली जातेय. जर हिंदी सिनेमे त्यांच्या तोडीच्या कलाकृती बनवत असतील तर येणारा काळ हिंदी सिनेमाच्या व्यावसायिक व आशयघन वृद्धीचा असेल यात शंका नाही.

याच बरोबर दोन महिन्यांखाली एक बातमी आली की निर्माता रितेश सिधवानी यांनी ‘स्क्रीन रायटर्स असोसिएशन’च्या पटकथाकाराला द्यावयाच्या निश्चित मानधनाचा प्रस्ताव स्वीकारला आहे. त्यामुळे आता पटकथाकाराला निश्चिंतपणे त्याच्या मेहनतीचे चीज झालेले दिसून येईल. पूर्वी पटकथाकाराचं मानधन किती असावं हे निर्माताच्या मर्जीनुसार राहायचं. त्यामुळे त्याला योग्य ते मानधन मिळत नसे. तसेच पडद्यावर श्रेयनामावलीत नामोल्लेख न करण्यासारखी अपमानस्पद गोष्ट सहन करावी लागायची. पुनरुज्जीवित झालेल्या ‘स्क्रीन रायटर्स असोसिएशन’ने मानधनाचे जे दर ठरवून दिले आहेत व करार करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावयाची आहे याची रूपरेषा आखून दिल्यामुळे पटकथाकार बिनधास्तपणे लिहू शकतात. मानधन व कायदेशीर सुरक्षितता मिळाल्यामुळे त्यांची मानधन न मिळण्यासारख्या टांगत्या तलवारीपासून सुटका होईल. याचा उघड फायदा म्हणजे पटकथाकार उत्तम दर्जाचं लेखन करू शकतील. तसेच दिग्दर्शकांना वैविध्यपूर्ण विषय हाताळायला मिळतील. अभिनेत्यांना विविधांगी भूमिका साकारायला मिळतील. सरतेशेवटी प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद वाढायला मदतच होईल.

कंटेंट इज किंग असं म्हणतात. वरील सिनेमांची चर्चा करताना त्यातील किमान दहा सिनेमे असे आहेत जे आशयाला महत्त्व देतात. निव्वळ व्यावसायिक यश हवं म्हणून ‘कलंक’ किंवा ‘ठग्ज ऑफ हिंदोस्थान’ सारखे सिनेमे आशयाला महत्त्व द्यायचं नाकारतात. तसेच कल्पनेच्या भराऱ्या मारताना काल्पनिक कथा सुद्धा विश्वसनीय वाटणे गरजेचे आहे हे विसरतात. त्यामुळे प्रेक्षक त्यांना प्रतिसाद देत नाहीत. विश्वसनीय कथा असतील तरच सिनेमा चालेल हे ‘स्त्री’ ने दाखवून दिले आहे. हा ट्रेंड असाच राहिला तर हिंदी सिनेमा अजून वेगळ्या पातळीवर पोचेल.

पूर्वप्रसिद्धी : वास्तव रूपवाणी जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर २०१९ 

Comments