शाश्वत सचदेवचं चिरकाळ स्मरणात राहणारं पार्श्वसंगीत – उरी
सिनेमातील
पार्श्वसंगीताबद्दल ए. आर. रेहमान म्हणतात, “काही सिनेमांमध्ये पार्श्वसंगीत हे
वॉलपेपरसारखं असतं व इतरांमध्ये ते एक पात्र असतं.” २०१८ मध्ये श्रीदेवी अभिनीत ‘मॉम’
सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारात उत्कृष्ठ पार्श्वसंगीताचा पुरस्कार मिळाल्यावर ते
बोलत होते.
हिंदी सिनेमाचा विचार केला तर लक्षात येईल पार्श्वसंगीताला फारसं महत्त्व दिलं जायचं नाही किंवा दिलं गेलं तरी ते गाणी, गाण्यांचं संगीत व कथानकात त्याचं अस्तित्व जाणवायचं नाही. एकुणात ते नसल्यासारखच होतं. त्यामुळे जेव्हा रेहमान पार्श्वसंगीत हे पात्र असतं असं म्हणतात तेव्हा ते नक्कीच आर. डी. बर्मनबद्दल बोलत असावेत असं वाटतं. पार्श्वसंगीतातला बाप असं आरडींना म्हटलं तर वावगं ठरू नये. आर. डी. नी खऱ्या अर्थाने पार्श्वसंगीत हे सिनेमाला इतर गोष्टीं इतकच महत्वाचं असतं हे त्यांच्या कामातून दाखवून दिलं. ‘शोले’ हे मोठं उदाहरण. शोलेचा टायटल ट्रक किंवा बसंतीच्या मागे दरोडेखोर लागतात तो प्रसंग असू दे. आरडीचं संगीत प्रसंगाला साजेसं.
सिनेमाला उठावदार करण्याचं काम किती महत्वाचं असतं हे शोले आणि दीवारमधील काम बघून लक्षात यावं. दीवारमध्ये विजयला शोधणारे पीटरची माणसे गोडाऊनमध्ये परत येतात. विजय तिथेच दरवाज्याजवळ बसून त्यांची वाट बघत असतो. तो ‘पीटर’ असा उच्चार करतो. कॅमेऱ्यासमोर असणारी पीटर व त्याची माणसे बाजूला होतात. दिग्दर्शक यश चोप्रा क्रॅश झूममध्ये आपल्याला विजयला दाखवतात. ‘पीटर’ नाव उच्चारायला उशीर आरडींचं काम चालू होतं. उर्मट, मग्रूर चेहऱ्याने बिडी डावीकडून उजवीकडे करणारा साधा गोदी कामगार विजय पीटर व साथीदारांना आव्हान देतो.
दीवार गोडाऊन फाईट सीन
वरील प्रसंग
आपण शेकडो वेळा बघितला असेल. पण आरडींच्या पार्श्वसंगीतासाठी परत परत बघावासा
वाटतो. का बघावासा वाटतो? असं काय खास आहे त्यांच्या संगीतात की आपल्याला तो
प्रसंग व ते पार्श्वसंगीत आवडतं. यावर युट्युब चॅनल ‘एव्हरी फ्रेम अ पेंटिंग’ चे
टोनी जो ‘द मार्व्हल सिम्फोनिक युनिव्हर्स’ या व्हिडीओ निबंधात एक महत्वाचा मुद्दा
मांडतात जो पार्श्वसंगीताचा प्रभावीपणा कशात आहे ते दर्शवतो. तो म्हणजे
प्रेक्षकांनी द्यावयाचा भावनिक प्रतिसाद. जर भावनिक प्रतिसाद निर्माण होणार नसेल
तर पार्श्वसंगीताचा उपयोग नाही. वर दीवारमधील गोडाऊन फाईट सीन दिला आहे. ते बघून
विजय पीटर व त्याच्या साथीदारांना नुसता मारणार नाही आपल्यात सुद्धा विजय संचारेल
असं वाटतं. ते शक्य होतं ते आरडींच्या प्रेक्षकांच्या भावनिक प्रतिसादाला चेतवणाऱ्या
पार्श्वसंगीतामुळे.
उरी पार्श्वसंगीत ज्युकबॉक्स
शाश्वत सचदेवनी
यासाठी बरीच मेहनत घेतलेली दिसून येते. त्याने खास बर्लिनला जाऊन ऑर्केस्ट्रल पीसेस
तयार केले आणि व्हिएन्नामध्ये रेकॉर्ड केले. त्यामुळे पार्श्वसंगीतात भव्यता दिसून
येते ती ऑर्केस्ट्रल पीसेसमुळे. ऑर्केस्ट्रल पीसेसमुळे संगीत फक्त साऊंड डिझाईन न
राहता ते स्वतंत्र संगीत होतं. त्यातनं हार्मनी, मेलडी तयार होते. तसेच पार्श्वसंगीत हे व्हिज्युअल्सला उठावदार करणारे
असावे असं शाश्वत म्हणतो. तसेच त्यातनं भावनिक प्रतिसाद निर्माण होणं गरजेचं आहे.
उरीचं पार्श्वसंगीत ऐकताना असाच भावनिक प्रतिसाद तयार होतो.
सर्जिकल
स्ट्राईक करणाऱ्या सैनिकांचं वीरश्रीपूर्ण काम जसं पडद्यावर दिग्दर्शक आदित्य धर
दाखवतात तसंच किंवा त्याच्यापेक्षा मोठं काम शाश्वत पार्श्वसंगीतातून करतो.
‘स्पेशल फोर्सेस’ हा सुरुवातीला येणारा पीस ऐकावा. स्पेशल फोर्सेसचं स्पेशल काम
किती महत्वाचं आहे ते पायाने ताल धरायला लावणाऱ्या संगीताने तो करतो. त्यामुळे
सैनिकांमध्ये असणारी राष्ट्रभावना प्रेक्षकात सुद्धा परावर्तीत होते. त्यांच्यात
राष्ट्रभावना निर्माण होते. सिनेमाला मिळालेल्या प्रचंड मोठ्या प्रतिसादात शाश्वतचा
मोठा हात आहे.
यासाठी
त्याने सिंथेसायझर्स व मोड्युलर सिंथेसायझरचा वापर कसा केला असं एका मुलाखतीत
सांगितलं. ‘द सर्जिकल स्ट्राईक’ हा असाच एक पीस. सर्जिकल स्ट्राईक होताना वाजणारा
हा पीस चार मिनिटांचा आहे. त्यात भारतीय सैनिकांनी केलेली कामगिरी प्रेक्षकात
वीरश्री संचार करणारी ठरते. शेवटाकडे येणारे ‘गट्स’ आणि ‘ग्लोरी’ हे दोन छोटे
पीसेस तर उरीचा कळसाध्याय आहेत. ते मुळातूनच ऐकावेत.
झी म्युझिक
कंपनीने पार्श्वसंगीताचा ज्युकबॉक्स अपलोड करून एक चांगला पायंडा पाडला आहे. या
निमित्ताने रेहमान, आर. डी. बर्मनव व इतर संगीतकारांच्या सिनेमांच्या
पार्श्वसंगीताचे ज्युकबॉक्स अपलोड व्हावेत. सिनेप्रेमींना त्यांचा आस्वाद केव्हाही
घेता येईल. उरीसाठी शाश्वतला उत्कृष्ठ पार्श्वसंगीताचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला
आहे.
शाश्वतच्या
कामाचं कौतुक झालं असलं तरी अजून एक संगीतकार जोडी सचिन-जिगर (शुद्ध देसी रोमान्स,
राबता) म्हणतात पार्श्वसंगीत हे थँक्सलेस जॉब आहे. ते म्हणतात
निर्माता-दिग्दर्शकांना पार्श्वसंगीताचं महत्वचं कळत नाही. ते काय करतात की
सिनेमाचं फुटेज आणून देतात म्हणतात तुम्हाला जसं वाटेल तसं संगीत तयार करा.
त्यामुळे आमचं काम अवघड होतं असं ते म्हणतात. दिग्दर्शकाने पार्श्वसंगीतात काय
हवं, काय नको हे सांगणं गरजेचं आहे. निव्वळ सिनेमाचं फुटेज दिल्याने काम होत नाही.
काही एक प्रमाणात हे खरं आहे. बऱ्याच कथानकांमध्ये पार्श्वसंगीताची गरज असताना
तिथे ते नसतं हे जाणवतं. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये भावनिक प्रतिसाद निर्माण होत
नाही.
एका
अर्थाने कथानक चिरकाळ प्रेक्षकांच्या स्मरणात राहणं अपेक्षित असेल तर पार्श्वसंगीत
असणं तितकंच गरजेचं आहे. उरी पुढील काळात प्रेक्षकांच्या स्मरणातून निघून जाणार
नाही इतकं काम शाश्वत सचदेवने करून ठेवलंय.

Comments