द किलर : अॅक्शन क्लासिक आणि जॉन वू
यावर्षी मार्चमध्ये (२०२०) द किलर ला प्रदर्शित होऊन एकतीस वर्ष झाले. जॉन वू दिग्दर्शित या सिनेमाने हॉंगकॉंग सिनेमाचा खऱ्या अर्थाने चेहरामोहरा बदलला. या सिनेमाने हॉंगकॉंग सिनेमाला ब्रूस लीच्या व विनोदी सिनेमाच्या प्रभावाखालून काढलं आणि थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन पोचवलं. पण निव्वळ याच सिनेमाने नव्हे तर याआधी आलेल्या जॉन वूच्याच अ बेटर टुमारो (१९८६) व अ बेटर टुमारो २ (१९८७) या दोन सिनेमांनी हॉंगकॉंग सिने उद्योगाला एक नवा अभिनेता व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभाव टाकणारा पॉलिश्ड दिग्दर्शक दिला.
जॉन वूचे सिनेमेच नव्हे तर ऐंशीच्या दशकातल्या हॉंगकॉंग सिनेमाने एकुणातच कात टाकायला सुरूवात केली होती. सॉय हक (Tsui Hark), जॅकी चॅन, सॅमो हंग, युआन बियू व रिंगो लॅम यांनी पारंपारिक हॉंगकॉंग सिनेमात अमुलाग्र बदल करण्यावर भर दिला. या सर्व कलावंतातील सामाईक गोष्ट म्हणजे यांनी हॉंगकॉंग अॅक्शन सिनेमा या जॉनरला आधुनिक करून तो प्रस्थापित केला.
यापूर्वी अॅक्शन जॉनर अस्तित्वात नव्हता असं नव्हे तर तो पोशाखी मार्शल आर्टसच्या स्वरूपात होता. त्यातल्या त्यात तलवारबाजी असणाऱ्या वुशा (Wuxia) जॉनर हॉंगकॉंगमध्ये सिनेमाच्या सुरूवातीपासून अस्तित्वात होता. भारतीयांना त्याचं परिचीत रूप म्हणजे अँग ली दिग्दर्शित क्राऊचिंग टायगर, हिडन ड्रॅगन (२०००) हा ऑस्कर विजेता चित्रपट. ६०-७० च्या दशकात ‘शॉ ब्रदर्स’ या जगातल्या त्यावेळच्या सर्वात मोठ्या स्टुडीओने हा जॉनर भरभक्कम केला. याच काळात जॉन वूने अभिनेता होण्यासाठी शॉ ब्रदर्स स्टुडीओचा रस्ता धरला. पण अभिनेता होण्याचे स्वप्न पूर्ण झालं नाही. चँग चे (Chang Cheh) हॉंगकॉंग सिनेमाचे गॉडफादर असणाऱ्या दिग्दर्शकाने जॉनला तू कॅमेऱ्याच्या पाठीमागे राहून दिग्दर्शनाचं काम कर म्हणून सल्ला दिला जो त्यांनी शिरोधार्ह मानला. पण ऐंशीच्या दशकापर्यंत फक्त फार्सिकल विनोदी किंवा मार्शल आर्टस सिनेमेच जॉन वू बनवू शकले कारण स्टुडीओ सिस्टीममध्ये काम करताना येणाऱ्या मर्यादांमुळे.
द किलरचं कथानक तीन सिनेमांच्या प्रभावातून जॉननी लिहिलं. ते सिनेमे म्हणजे जाँ पिएरे मेल्व्हीलचा ला सामुराई (१९६७), मार्टिन स्कोर्सेसीचा मीन स्ट्रीट्स (१९७३) आणि तेरूओ इशीचा नराझूमोनो (१९६४). आह जोंग (चाऊ यूं फॅट) हा हिटमन एका क्लबमध्ये जॉबवर असताना तिथल्या नाईटक्लब सिंगरला जेनीला (सॅली याह) अपघाताने इजा पोचवतो. तिच्या डोळ्यांना इजा होते ज्यामुळे तिची दृष्टी हळूहळू कमी व्हायला लागते. तिच्यावर कॉर्नियल ट्रान्सप्लांट करून तिची दृष्टी परत आणावी ज्यातून तिला मदत होईल असा विचार करून तो शेवटचा जॉब घेतो. पण यात त्याला डबल क्रॉस केलं जातं. पैसे मिळवण्यासाठी त्याची धडपड चालू होते तर जेनीची दृष्टी मात्र झपाट्याने कमी व्हायला लागते.
या पार्श्वभूमीवर जॉन वू अॅक्शन सिक्वेन्सेसचा मोठा पसारा मांडतात. सिनेमाच्या सुरूवातीलाच येणारा नाईट क्लबमधील छोट्याश्या खोलीत घडणारा प्रसंग पुढील कथानकाची नांदी ठरतो. हा प्रसंग मुळातूनच बघायला हवा. आह जोंग हिटमन म्हणून कसा आहे हे तर दिसून येतंच तसेच तो अत्यंत व्यावसायिक आहे. नाईटक्लबमध्ये इतर माणसे असताना फक्त ज्याच्या नावाची सुपारी घेतली आहे त्याला व त्याच्या साथीदारांना कंठस्नान तो घालतो. जॉन वू याचं चित्रीकरण करताना हिंसा, स्लो-मोशन, एडिटिंग, वातावरण, सिनेमॅटोग्राफी, पार्श्वसंगीत याचा अपूर्व मिलाप घडवून आणतात. कदाचित काही जणांना हे हिंसेचं उदात्तीकरण केल्यासारखं वाटेल पण जॉनच्या जडणघडणीत शाळेत व कॉलेजावयीन असताना जे अनुभव आले त्याचा तो परिपाक आहे.
अजोड म्हणताना एक गोष्ट विसरायला नाही हवी की, अॅक्शन दृश्ये म्हणजे हिंसेनेच भारलेले असतात. त्यांना काही अर्थ नसतो. असा सर्वसामन्य समज असतो. हिंसा जरी पडद्यावर मोठ्या प्रमाणात दिसत असली तरी तिला दिग्दर्शकाच्या मुल्यदृष्टीची जोड आहे. जॉन वू हे त्यांची स्टाईल कॉपी करणाऱ्या दिग्दर्शकांसारखे नव्हेत. त्यांच्या सिनेमातील नायकाला न्यायाची बाजू स्पष्ट कळते. त्यामुळेच नायक जेनीला मदत करायची ठरवतो तसेच एका बीचवर त्याच्यावरील हल्ल्यात जखमी झालेल्या छोट्या मुलीचा जीव तो वाचवतो. तो कोल्ड ब्लडेड हिटमन नाही. त्याच्यात चांगुलपणा वसलाय. हा चांगुलपणा जॉन वूनी लहानपणी चर्चमध्ये अनुभवला. तोच नायकामध्ये उतरलाय. त्यामुळे हिंसा जरी अंगावर येणारी वाटत असली तरी तिच्या पाठीमागचा विचार हा निव्वळ व्यावसायिक दृष्टीकोनातून आलेला नसून अनुभवातून आलेला आहे.
दिग्दर्शक
सॅम रेमी जॉन वूला अॅक्शन सिनेमाचा आल्फ्रेड हिचकॉक म्हणतो ते अॅक्शन प्रसंगात
सस्पेन्सचा वापर करतात म्हणून. क्वेंटीन टॅरंटिनो,
रॉबर्ट रॉड्रीगेझसारख्या
मोठ्या हॉलिवूड दिग्दर्शकांवर त्यांचा प्रभाव आहे. त्यामुळे विसाव्या शतकातील अॅक्शन
क्लासिक असणारा हा सिनेमा सिनेप्रेमींनी चुकवू नये.




Comments