झॅक स्नायडर व्हर्सेस स्नायडर कट
लेखाचं
शीर्षक स्नायडरशीच निगडीत आहे कारण २०१७ च्या जस्टीस लीगचं डिरेक्टरचं क्रेडिट
स्नायडरला देण्यात आलंय. फिल्म बघताना ते दिसून येतं. सिनेमा थिएटरला रिलीज झाला
तो व्हीडनने दिग्दर्शित केलेला होता. पण स्नायडरच्या करारात डिरेक्टरचं क्रेडिट
देणं बंधनकारक होतं म्हणून ते तसंच ठेवण्यात आलं. व्हीडनने काय बदल केले व
स्नायडरने त्याच्या कटमध्ये नेमकं काय केलंय हे जाणून घेण्या अगोदर डिरेक्टर्स कट काय
असतं ते जाणून घेऊया.
‘डिरेक्टर्स
कट’ म्हणजे सिनेमा एडीट करताना दिग्दर्शकाच्या दृष्टीने कथा पडद्यावर कशी दिसायला
हवी यासाठी केलं गेलेलं संकलन. यात बऱ्याचदा निर्माते सिनेमा यशस्वी व्हावा म्हणून
दिग्दर्शकाला न जुमानता त्यांना हवा असलेला सिनेमा एडीट करून घेतात. तसेच सिनेमाची
लांबी बघण्यालायक असावी असाही उद्देश असतो. त्यामुळे काही महत्त्वाचे प्रसंग,
प्लॉट पॉईंट्स असणाऱ्या सीन्सना कात्री लावली जाते. पुढे जेव्हा सिनेमा डीव्हीडी
किंवा ब्ल्यू रेवर रिलीज करायचा असतो तेव्हा ‘एक्स्टेंडेड’ किंवा डिलीटेड
सीन्ससहित ‘स्पेशल एडिशन’ म्हणून रिलीज केला जातो. त्यात दिग्दर्शकाने नेमकं काय
काम केलंय हे बघायला मिळतं. यात अजून एक प्रकार हॉलीवूडमध्ये दिसून येतो. तो
म्हणजे सिनेमाचं चित्रीकरण चालू असताना निर्माते व दिग्दर्शकात सिनेमा कसा असावा
यावर खटके उडायला लागले की निर्माते दिग्दर्शकाची उचलबांगडी करतात. त्याच्या ऐवजी
त्यांच्या मर्जीतला त्यांना हवा तसा सिनेमा दिग्दर्शित करून देणारा दिग्दर्शक नियुक्त
करतात. ‘सुपरमॅन २’ (१९८०) च्यावेळी निर्मात्यांनी दिग्दर्शक रिचर्ड डॉनरला काढून
टाकून रिचर्ड लेस्टरला ते काम दिलं. पुढे २००६ मध्ये ‘सुपरमॅन २ द रिचर्ड डॉनर कट’
या नावाने तो सिनेमा डीव्हीडी व ब्ल्यू रेवर रिलीज करण्यात आला. हॉलीवूडमध्ये ही
परंपरा सत्तरच्या दशकापासून चालत आली आहे. त्यामुळे बऱ्याच सिनेमांचे ‘ओरिजिनल
थिएटर कट’ व ‘डिरेक्टर्स कट’ असे एकाच कथानकाचे दोन भाग बघायला मिळतात.
स्नायडर कट
बॅटमॅन व्हर्सेस सुपरमॅन जिथे संपतो तिथनं चालू होतो. त्यामुळे प्रेक्षकाला नवीन
घटना, प्रसंग मनात रजिस्टर करून त्यांचं पूर्वीच्या सिनेमाशी काय नातं आहे हे
पडताळून पहायची गरज भासत नाही.
तो लगेच कथेत ओढला
जातो. तसेच स्नायडरने त्याच्या मूळ स्क्रिप्टमधील कथानकालाच प्राधान्य दिल्यामुळे
यात व व्हीडनच्या कटमध्ये फरक स्पष्ट दिसून येतो. उदा. वंडर वूमनचा शाळेतील मुलांना
वाचवण्याचा प्रसंग. यात व्हीडन झटपट कट्समध्ये तिची मुलांना वाचवण्याची धडपड
दाखवतो. तर स्नायडर हाच प्रसंग बराच वेळ घेऊन तपशिलात तिची अतिरेक्यांना मारण्याची
व एका ब्रीफकेसमधील बॉम्ब सर्वांपासून दूर नेऊन नष्ट करण्याची पद्धत दाखवतो. शेवटी
ती त्या अतिरेक्याच्या म्होरक्याला मारते ते सुद्धा तो दाखवतो. व्हीडन इथे कट करून
बॅटमॅन अॅक्वामॅनला भेटायला जातोय असं दाखवतो.
मला
व्यक्तीशः न आवडलेल्या दोन गोष्टी आहेत. पहिली विक्टर जो सायबॉर्ग झालाय त्याच्या बॅक
स्टोरीला दिलेलं महत्त्व. व्हीडन काही संवादांमध्ये त्याच्यासोबत काय झालं व तो
कसा सायबॉर्ग झाला हे सांगतो. स्नायडर त्याचा भूतकाळ दाखवतो. त्याचं अमेरिकन
फुटबॉलमध्ये भाग घेणं, त्याचा अपघात, त्याच्यावर त्याच्या वैज्ञानिक वडिलांनी
केलेला प्रयोग व त्याचं सायबॉर्ग होणे असं तपशीलवार उपकथा येते. इथे पटकथेच्या
पातळीवर यावर कात्री चालवायला हवी होती. कारण ही अनावश्यक माहिती प्रेक्षकांना
दिली जाते. त्याच्या लेखी याला महत्वच राहत नाही. मदर बॉक्सेस जेव्हा एकत्र येतात
तेव्हा त्यांना वेगळे करण्याचं काम सायबॉर्ग करतो ते प्रेक्षकांच्या लेखी महत्वाचं
आहे. सिनेमा थिएटरमध्ये रिलीज केला असता तर स्नायडरला मन मारून संकलनात या भागाला काढून
टाकावं लागलं असतं.
दुसरा
मुद्दा एपिलॉगची लांबी. सिनेमा संपतो तेव्हा साडे तीन तास झालेले असतात. आपले
पेशन्स संपलेले असतात. तरीही अजून अर्धा तासाचा सिनेमा उरलेला असतो. त्यातही हा
एपिलॉग वीस मिनिटांचा आहे एंड क्रेडिट्सची दहा मिनिटे सोडली तर. एपिलॉगमध्ये मार्शियन
मॅनहंटर या पात्राला दाखवलं जातं. तसेच भविष्यात नेमकं काय घडणारे याची चुणूक
दाखवली जाते. ज्याचा संबंध बॅटमॅन व्हर्सेस सुपरमॅनमधील भविष्यातील फ्लॅश बॅटमॅनला
लोईस लेनबद्दल माहिती देतो त्याच्याशी आहे. इथे जोकर तिचा उल्लेख करून भविष्यात
काय झालं असेल याचा अंदाज करायला प्रेक्षकांना भाग पाडतो. ही मालिका जर पुढे येणार
असेल तर ती कुठल्या दिशेने मार्गक्रमणा करेल यासाठी आहे हे उघडच आहे. पण तोपर्यंत
सिनेमाची लांबी इतकी वाढलेली असते की तो का उगाच दाखवलाय असं वाटतं. असंही सिनेमा
ऐवजी सहा भागांची सिरीज करायची असं स्नायडरने सांगितलंच होतं. मग सलग चार
तासापेक्षा दोन तासांचे दोन व्हॉल्युम्स केले असते तर एपिलॉग बघायला काहीही वाटलं
नसतं. या उपरही प्रेक्षकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला हे जास्त महत्वाचं.



Comments