Behind Every Great Fortune There Is A Crime

२०११ मध्ये लातूर पॅटर्न कादंबरी प्रकाशित झाली होती. कादंबरी लिहिली ती माझ्या कॉलेजातील अनुभवांवर आधारित. मी १९९८-२००३ अशी पाच वर्ष अनुक्रमे बीकॉम व बीएस्सीमध्ये नापास होतो. पुढे बीए-एमए केलं. त्यामुळे कादंबरी त्या नापास व नंतर बीए-एमएच्या दिवसांवर आधारित आहे. नापास विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून ती लिहिली आहे.

२०१४ ला मी पुण्याहून लातूरला परत आलो. या गेल्या बारा वर्षात लातूर पॅटर्नचं रुपडं पूर्णपणे बदलल्याचं दिसून आलं. आमच्यावेळी खाजगी क्लासेस होते पण त्यांचा आता इतका प्रभाव नव्हता. शाळा, कॉलेजातील टक्केवारीलाच महत्त्व होतं. आरसीसीमुळे ट्युशन एरियात एक इको सिस्टीम* तयार झालेली दिसून आली. लातूरचा शैक्षणिक अवकाश वाढीला लागलेला दिसून आलेला. राजस्थानातील कोटा नंतर लातूरचं नाव घेण्यात येऊ लागलं. आताशा गेल्या पाच, सहा वर्षात अमली पदार्थांमुळे विद्यार्थी बिघडतायत असंही दिसून येत होतं.

[*या विषयी मी अविनाश चव्हाण या क्लास संचालकाच्या हत्ये नंतर लेख लिहिलेला त्याची लिंक खालती पोस्टच्या शेवटी.]

पैश्यांची मुबलकता जिथे असते तिथे वाममार्ग व गुन्हेगारी फोफावायला लागते. अविनाश चव्हाण हत्या प्रकरण हे त्याचं उदाहरण होतं. आता मोटेगावकर व इतर लोकं यात असणे हे ऑनर द बाल्झाक या फ्रेंच लेखकाच्या सुप्रसिद्ध वचनाचच लेटेस्ट उदाहरण आहे. तो म्हणतो behind every great fortune there is a crimeप्रत्येक आर्थिक लाभामागे एखादा गुन्हा हा असतोच असं याचं ढोबळपणे मराठीकरण करता येईल. या प्रकरणात असणारे आर्थिक लागेबांधे गुन्हा करण्यासाठी पूर्णपणे पोषक ठरलेले आहेत.

मला हे वाचून आश्चर्य वाटलं का, तर नाही. आर्थिक उदारीकरणाची व लातूर पॅटर्नची सुरूवात जवळपास एकदाच झाली म्हणता येईल. पण त्याचे परिणाम मात्र या शतकाच्या पहिल्या दशकापासून दिसून यायला लागले. इंजिनीअर व मेडिकल प्रवेशासाठी विद्यार्थी, पालक, संस्थाचालक व खाजगी क्लासेस यांचं नेक्सस तयार व्हायला लागलं. त्याचं एकमेव कारण म्हणजे इंजिनीअर व डॉक्टर होण्यामागची प्रतिष्ठा. भारतीय समाज हा प्रतिष्ठेचा भुकेला. प्रतिष्ठा मिळवण्यासाठी तो वाट्टेल त्या थराला जाऊ शकतो. यात आपल्या पाल्याला ते मिळायलाच हवं ही पालकांची इर्षा असते. त्यामुळेच या प्रकरणात काही लाख रूपयात फुटलेला पेपर विकत घेण्यासाठी पालक तयार होते असं दिसून येतं. म्हणजे पालकांना आपला पाल्य डॉक्टर होऊन समाजात लब्धप्रतिष्ठित व्हावा ही इच्छा होती. त्यासाठी ते कसलाच विधिनिषेध बाळगताना दिसत नाहीत. याच प्रतिष्ठेपायी संपूर्ण व्यवस्था मार्गी लागलेली दिसून येते.

प्रतिष्ठा करावीशी वाटते कारण काहीतरी मिळवण्याची लालसा मनात निर्माण होते. लालसा ही खतरनाक चीज. लातुरात खाजगी क्लासेसचं पेव फुटलं व त्यातून प्रसिद्धी मिळायला लागली हे या वर्गानं हेरलं आणि त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजायला तयार झाले. आर्थिक उदारीकरणामुळे पैसे मुबलक प्रमाणत कमावत होते. त्याला अशा पद्धतीने मार्गी लावण्यात आलं. पण मधल्या काळात आपण गुन्हेगार होत चाललो आहोत हे सपशेल विसरून गेले. आपल्याला कुणी विचारत नाही किंवा कायदा, प्रशासन आपलं वाकडं करू शकत नाही किंवा केलंच तर त्याला पैशाच्या जोरावर विकत घेऊ शकतो ही मानसिकता बळावत गेल्यावरच असे प्रकार घडतात. २०१४ पासून मी हे जवळून बघत आलोय. त्यातलंच हे एक लेटेस्ट प्रकरण.

लातूर पॅटर्नची शोचनीय बाजू : https://www.aksharnama.com/client/article_detail/2238 



Comments