चिंटू का बर्थडे आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्स

विसाव्या शतकाची असंख्य वैशिष्ट्ये आहेत. पैकी एक म्हणजे जगभरात स्थलांतरितांचा झालेला प्रवास. एका देशातून दुसऱ्या देशात जाणाऱ्यांची संख्या विसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात झाल्याची दिसून येते. खासकरून पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युरोपातून अमेरिकेत व त्यानंतर जगाच्या इतर भागातून युरोप अमेरिकेत स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली दिसून येते. स्थलांतरित होण्याची कारणे बरीच आहेत. पैकी आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक ही मुख्य कारणे. आर्थिक कारण हे त्यातल्या त्यात ठळकपणे स्थलांतरित होण्यासाठी मजबूर करणारं. स्थलांतरित जरी वैध मार्गाने होणारं असलं तरी अवैध मार्गाने होणाऱ्यांची संख्या सुद्धा तितकीच आहे. किंवा असे म्हणता येईल वैध मार्गाने जाणाऱ्यांपेक्षा अवैध मार्गाने जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. लालफितीच्या कारभारामुळे वैध ऐवजी अवैध मार्ग स्वीकारणारे बरेच दिसतात. त्यामुळे आजच्या काळात स्थलांतरितांचं जगणं ही एकाचवेळी त्या त्या भूभागासाठी पर्वणी आहे तर समस्या सुद्धा. पर्वणी या अर्थाने की शिकून नोकरी, व्यवसायासाठी जाणारा वर्ग हा तिथल्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी आयुष्य वेचतो तर अवैधरित्या गेलेला वर्ग तिथल्या व्यवस्थेवर ताण आणतो. त्यामुळे त्याची समस्या उत्पन्न होते. त्यातून असंख्य सामाजिक, सांस्कृतिक प्रश्न निर्माण होतात.

Alan Kurdi

२ सप्टेंबर २०१५ ला तीन वर्षांच्या अलान कुर्दीचा मेडिटरेनिअन समुद्राच्या किनाऱ्यावर आढळलेला इवलासा मृतदेह स्थलांतरित लोकांचे यादवी युद्धामुळे काय हाल होतात याचं हृदयद्रावक उदाहरण. सिरीयातील यादवी युद्धामुळे तिथली माणसे युरोपकडे स्थलांतरित होतायत. खासकरून समृद्ध जर्मनीत ही माणसे मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होताना दिसतात. राजकीय स्थैर्य किती महत्त्वाची असते हे आज नऊ वर्षांनीदेखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चालू असलेल्या या युद्धाकडे बघून लक्षात येतं. जगण्याला स्थैर्य नसेल तर उर्वरित आयुष्य फक्त संघर्षात जातं. आज सीरियन यादवी युद्धामुळे तिथल्या लोकां पुढे जगण्याचे तीव्र प्रश्न उभे राहिलेत. राजकारण्यांच्या सत्तेच्या हव्यासापायी सर्वसामान्यांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. जगण्याला स्थैर्य नसल्यामुळे भविष्याचं काय हा प्रश्न आवासून उभा आहे.

अशीच परिस्थिती २००४ मध्ये सद्दाम हुसेनच्या पाडावाच्या वेळी उद्भवली होती. इराकमध्ये अमेरिकन सैन्य सद्दाम हुसेन विरोधात कारवाई करत होते. त्याचवेळी तिथे अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने सोय केली होती. पण ती सोय फक्त वैधरित्या इराकमध्ये कामा निमित्ताने स्थलांतरितांनाच उपयोगाची होती. पण अवैधरीत्या तिथे गेलेल्यांचा प्रश्नच होता. देवांषु व सत्यांषु सिंग दिग्दर्शित ‘चिंटू का बर्थडे’ हा सिनेमा याच काळातल्या एका भारतीय कुटुंबाची एका दिवसाची कहाणी सांगतो.

मदन तिवारीच्या (विनय पाठक) मुलाचा चिंटूचा सहावा वाढदिवस असतो. इराकमध्ये अमेरिका व सद्दाम हुसेनमध्ये युद्धसदृश परिस्थिती असते. अमेरिकेला सद्दाम हुसेनचा पाडाव करायचा आहे. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणावर इराकी व अमेरिकन सैन्यात धुमश्चक्री चालू असते. मदन तिवारी इराकमध्ये कामानिमित्त सेटल झालेला. युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्याचं भारतात परत जायचं मुश्कील झालेलं असतं कारण तो अवैधरीत्या इराकमध्ये आलेला असतो. पासपोर्ट-व्हिसाचं काम करणाऱ्या एका भारतीय माणसाने ऐनवेळी कामच केलेलं नसतं त्यामुळे त्याला कुटुंबासहित तिथेच अडकून पडायला लागतं. वाढदिवस साजरा होणार इतक्यात दोन अमेरिकन सैनिक घरात घुसतात. तिवारी कुटुंबाच्या तोंडचं पाणी पळून जातं.

सिनेमाचा विषय हिंदी सिनेमाने न हाताळलेला. स्थलांतरित भारतीयांचं खासकरून इराक, इराण, सौदी अरेबियामध्ये राहणाऱ्यांचं चित्रण हिंदी सिनेमात दिसून येत नाही. त्यामुळे सद्दाम हुसेनच्या पाडावाच्या पार्श्वभूमीवर इराकी, भारतीय व अमेरिकन पात्रांच्या सहभागाने कथेला एकदम जागतिक परिमाण मिळतो. तसेच हिंदी सिनेमाला एखादी युद्धासारखी घटना, त्याचे परिणाम, त्याच्या सानिध्यात राहणारी माणसे इ. गोष्टींवर कथा रचायला आवडत नाही. परदेशस्थ भारतीय म्हणजे इंग्लंड-अमेरिकेत राहणारा सुखवस्तू भारतीय इतपतच त्याची समज आहे. त्यामुळे आज जगभर पसरलेला परदेशस्थ भारतीय खूपच ढोबळ व ठोकळेबाज स्वरूपात पडद्यावर दिसून येतो. त्यांच्या समस्या, सांस्कृतिक संघर्ष, स्थानिक गोष्टींचा होणारा किंवा एकुणातच तिथलं त्यांचं आयुष्य कसं असतं याचं यथातथ्य चित्रण दिसून येत नाही. या पार्श्वभूमीवर हा सिनेमा महत्वाचा ठरतो.

कथानकाचा विचार केला तर मदन तिवारी व त्याचे कुटुंबीय हे द्विमितील पात्रे आहेत तर त्याचा इराकी घरमालक व दोन अमेरिकन सैनिक एकमितीतील पात्रे आहेत. राजकीय व सांस्कृतिक मतभिन्नतेमूळे अमेरिकन सैनिकांना इराकी व भारतीय लोकांमध्ये फरक दिसून येत नाही. ते दोघांना पण एकाच मापात तोलतात. त्यामुळे तिथे भीतीचं वातावरण तयार होतं. त्यातून मार्ग काढणं त्यांना क्रमप्राप्त होतं. दिग्दर्शक द्वय सिंगनी युद्धसदृश वातावरण व पात्रांच्या मनात असणारी सैनिकांची भीती छान उभी केलीय. प्रोडक्शन डिझायनर सुकांत पाणीग्रहीनी तयार केलेलं ते घर टिपिकल इराकी घर वाटतं. विशेष म्हणजे ते घर प्रत्यक्ष इराकमध्ये किंवा युद्धजन्य परिस्थिती असणाऱ्या एखाद्या देशातलं न वापरता मुंबईतल्या एका स्टुडीओत उभारलंय म्हटल्यावर तर अजूनच आश्चर्य वाटतं. त्यांच्या कामाचं कौतुक करावसं वाटतं. तसेच नरेन चंदावरकर व बेनेडिक्ट टेलरचं पार्श्वसंगीत वातावरण नेमकं तयार करतं. एक क्षण असा येतो की आपण सुद्धा तिवारी कुटुंबासोबत आहोत असं वाटतं इतकं परिणामकारक पार्श्वसंगीत संगीत दिग्दर्शकांनी निर्माण केलंय. हेलीकॉप्टर, घराबाहेरचा कोलाहल, बॉम्बगोळ्यांचे आवाज अगदी आपल्या बाजूकडून येतायत असं वाटतं.

सिनेमा बघितल्यावर एक प्रश्न पडतो हा सिनेमा थिएटरमध्ये चालला असता का? कारण प्रेक्षकांनी सिनेमाला आवर्जून जावं असा मसालेदार ऐवज त्यात नाही. सुरूवातीला हलक्याफुलक्या मार्गाने जाणारी कथा गंभीर वळण घेते तेव्हा ती किती प्रेक्षकांना पचली असती हा प्रश्नच आहे. त्यात नायक-नायिका अनुक्रमे विनय पाठक व तिलोत्तमा शोम हे प्रेक्षक खेचणारे अभिनेते नाहीत. भारतीय प्रेक्षक थिएटरमध्ये गंभीर सिनेमा असला की खुर्चीवर चुळबुळ करायला लागतो. त्याला दर दोन मिनिटाला एखादा विनोद किंवा धांसू डायलॉग ऐकायला, बघायला आवडतं. कथेनं गंभीर वळण घेतलं की, पात्र फिलॉसॉफिकलच थोडक्यात कंटाळवाणं बोलतात असा त्याचा समज असतो. त्यामुळे डायलॉगबाजीवर धकवून नेणारे सिनेमे त्याला जास्त आवडतात. तसेच आपल्याला सिनेमा बघून खूप विचार करायला लागू नये अशी त्याची अपेक्षा असते. ती अपेक्षा फोल ठरली की तो सिनेमाला यथेच्छ शिव्या द्यायला लागतो. सिनेमा अर्ध्यातून सोडून जातो. थिएटर बाहेर जाऊन सिनेमा किती फालतू आहे अशी बदनामी करतो. त्यामुळे ज्यांचा काही कारणाने थिएटरमध्ये बघायचा राहिला असेल तो प्रेक्षक सुद्धा सिनेमाच्या वाट्याला जात नाही. मग चांगले सिनेमे बघायलाच मिळत नाहीत अशी तक्रार ऐकायला मिळते.

२०२० मध्ये उद्भवलेल्या कोरोना पँडेमिकने सर्वत्र लॉकडाऊन करायला भाग पाडलं. थिएटर्स बंद पडले. सर्वसामान्य प्रेक्षकांना मनोरंजन करवून घेण्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सचा आधार घ्यावा लागला. त्यात थिएटरचा भव्य परिणाम मिळत नसला तरी आपल्याला जे आवडतंय ते किंवा जे राहिलंय ते बघण्याची मुभा त्याला मिळाली. त्यामुळे कोणते वेब सिरीज वा सिनेमे पाहावेत याची विचारणा होऊ लागली. याच काळात चिंटू का बर्थडे एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. त्याला एकूण प्रेक्षक प्रतिसाद किती मिळाला याची आकडेवारी उपलब्ध नसली तरी ज्यांना चांगले सिनेमे बघण्याची समज आहे अशा प्रेक्षकांना एक पर्याय उपलब्ध झाला. इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर सिनेमे बघणारा वर्ग हा त्याचं सबस्क्रिप्शन घेऊ शकेल या आर्थिक उत्पन्न गटातला आहे. बहुसंख्यांना अजूनही ते परवडणारं नाही. तसेच ते घ्यायचं कसं म्हणजे पेमेंट कसं करायचं, डाऊनलोड केलं तरी बघायचं कसं अशा प्राथमिक स्वरूपातल्या समस्या सुद्धा त्यापासून दूर जाणाऱ्यांना पडतात. जे प्लॅटफॉर्म्स स्ट्रीमिंग विना पैशाचं फुकट करतात त्याकडे बरेचजण आकर्षित झालेले दिसले. थिएटरमधले तिकीट रेट्स वाढलेले असले तरी तिथे जाणारा वर्ग हा सर्व आर्थिक थरातला असायचा. कमी पैशातला सिंगल थिएटर हा पर्याय पँडेमिक पूर्वी अस्तित्वात होता. लॉकडाऊनमध्ये आर्थिक ओढगस्ती मोठ्या प्रमाणात पसरली त्यामुळे निम्न मध्यमवर्गीय व त्याखालील गटातला प्रेक्षक ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सकडे वळला नाही. हा प्लॅटफॉर्म मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय व त्यावरील गटाला परवडणारा होता. त्यांच्याकडे सबस्क्रिप्शन भरण्या इतपत पैसे या काळात सुद्धा होते. त्यामुळे हा प्लॅटफॉर्म त्यांच्या पुरताच सीमित राहिला.

यात न चर्चिला गेलेला मुद्दा म्हणजे इंटरनेट पायरसी. सरकारने त्या विरोधात पावले उचलली असली तरी हुशार प्रेक्षक कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्याचा वापर करत होता. लॉकडाऊन काळात वैध मार्गाने सिनेमे/वेब सिरीज बघितल्या जात होत्या तसेच अवैध मार्गाने ते डाऊनलोड करून बघणारे पण कमी नव्हते. एकदा डाऊनलोड केल्यावर हातोहात एका मोबाईलमधून दुसऱ्या मोबाईलमध्ये जायला वेळ लागला नाही कारण अनलॉक झाल्या झाल्या लोकं एकमेकांना भेटायला लागली तेव्हा सिनेमा/वेब सिरीजची देवाणघेवाण वाढली. पण तरीही चिंटू का बर्थडेसारख्या सिनेमांचं पायरसी होईल असं वाटत नाही. पायरसी जे खूप लोकप्रिय व खूप वादग्रस्त आहे अशाच कलाकृतींचं होतं. चिंटू का बर्थडे ना वादग्रस्त ना लोकप्रिय त्यामुळे त्याच्या वाट्याला किती प्रेक्षक गेले असतील हा प्रश्नच आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्म्स हे चांगल्या, आशयघन व इंडिपेन्डन्ट पद्धतीने बनवल्या गेलेल्या सिनेमांसाठी उत्तम प्लॅटफॉर्म आहे. हे सिनेमे थिएटरमध्ये रिलीज झाले तर प्रेक्षक प्रतिसादाविना दुर्लक्षिले गेले असते. निर्मात्यांना गुंतवलेल्या पैश्यांची परतफेड मिळाली नसती वरतून कायमचा फ्लॉपचा शिक्का बसला असता. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे सिनेमाची चांगली समज असणारा प्रेक्षक त्याच्याकडे आकृष्ट होईल व तसेच विविध सोशल मीडिया साईट्सवरील चर्चेत तो चर्चिला जाणार. माऊथ पब्लिसिटीचा त्याला फायदा होईल. त्यामुळे प्रेक्षक प्रतिसादाचा विचार करून तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला तर मोठ्या प्रमाणात पण हक्काने बघितला जाईल हा फायदा आहेच.

ओटीटी प्लॅटफॉर्म : ZEE5

पूर्वप्रसिद्धी : वास्तव रूपवाणी, बहुविध.कॉम

Comments