न भावलेला ‘सुपर ३०’

ऋतिक रोशन अभिनीत ‘सुपर ३०’ मधील सर्वात चांगला प्रसंग म्हणजे आनंदकुमारला लल्लनमुळे आपण किती मोठी घोडचूक केली याची जाणीव होते तो. सिनेमातील इतर गोष्टी मात्र नेहमीची कथा वाटली. मी व्यक्तिशः शिक्षणव्यवस्थेवरील भारतीय सिनेमांपासून दूरच राहतो. त्याला एक कारण आहे. मी एकूण बारा वर्षे महाविद्यालयात घालवली आहेत. बारावी सायन्सची दोन, बीकॉमची दोन, बीएस्सीची तीन वर्ष (बीकॉम-बीएस्सी मिळून पाच वर्ष. सर्व विषयात नापास.) आणि त्यानंतर बीए-एमए. महत्त्वाच्या सर्व विद्याशाखांचा अनुभव घेतल्यामुळे एकूणच शिक्षणाबद्दल आजही मनात कटुताच आहे. त्यामुळे सिनेमात जेव्हा शिक्षणावर भाष्य केल्याच्या थाटात कथा मांडली जाते तेव्हा मला त्याचवेळी अंदाज आलेला असतो की कथानक खूपच ढोबळ स्वरूपात मांडलेलं असणार. वास्तव दाखवण्याचं धारिष्ट्य अजून तरी निर्माता-दिग्दर्शकांनी दाखवलेलं नाही.

चर्चेपुरती चटकन आठवणारी नावे म्हणजे ‘दहावी फ’, ‘तारे जमीं पर’ आणि ‘थ्री इडियट्स’. तिन्हीत शिक्षणव्यवस्थेचं बऱ्यापैकी चित्रण केलं आहे. तरीही मला हे सिनेमे तितकेसे प्रभावी वाटत नाहीत जितके ते असावयास हवेत. त्याचं कारण आपल्या सामाजिक रचनेत व नेणीवेत आहे. ब्रिटीशांच्या कृपेने आधुनिक शिक्षणाची कास धरणाऱ्या भारताने स्वातंत्र्योत्तर काळात स्वतःची शिक्षणव्यवस्था उभी केली. पण एकूण समाजाची मानसिकता मात्र तशीच राहिलीय जशी ती ब्रिटीशांच्या काळात होती असं मला वाटतं. किमान पंच्याण्णव टक्क्यांच्यावर भारतीयांची मानसिकता ही नोकरदार होण्याकडे कल असणारी आहे. सुरक्षित आयुष्य जगण्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी असते. त्यामुळे इंजिनिअरिंग व मेडिकलची फीस कितीही असली तरी कर्ज काढून मुलांना शिकवणे हे आता रक्तात भिनल्यासारखं झालंय.

इंग्रजी माध्यमात शिक्षणाचं फॅड खेडेगावांपर्यंत पोचण्याचा हा काळ. मग तद्नुषंगाने वाढलेली खाजगी ट्युशन्स, कोचिंग क्लासेसची प्रतिष्ठा. पालकांची पाल्याच्या सुरक्षित व यशस्वी आयुष्यासाठी स्थलांतरित होण्याची तयारी असते. एकुणात भारतीय समाज हा अतिसुरक्षित आयुष्याकडे वाटचाल करणारा आहे. सरकारी पातळीवर सुद्धा अशा सुरक्षित आयुष्य सर्वसामान्यांनी जगावं म्हणून समाजातल्या सर्व थरात शिक्षण पोचावं म्हणून प्रयत्न सुरू असतात. त्यामुळे सर्वत्र शिक्षणाचं भारलेलं वातावरण दिसून येतं. पण या भाऊगर्दीत आपण ज्ञानाची कास धरलेली दिसून येते का? तर नाही. आपल्या समाजाच्या नेणीवेत ज्ञानाची कास धरणे नीचतम दर्जाचं काम आहे अशी मानसिकता आहे. त्यामुळे इथे आयआयटीच्या प्रवेशावर मेहनत घेणाऱ्या शिक्षकाची कथा चवीने व भरभरून प्रतिसाद देऊन बघितली जाते. म्हणूनच मी वरती म्हटलं की वास्तव दाखवण्याचं धारिष्ट्य अजून तरी निर्माता-दिग्दर्शकांनी दाखवलेलं नाही.

असं धारिष्ट्य का दाखवलं जात नाही. सिनेमातून प्रश्न मांडायचे असतात ही भावना पटकथा रचताना बाळगली जात नाही. संघर्ष ही इतर कथानकांमधल्यासारखाच सामाईक धागा पकडून त्याच्याभोवती पटकथा रचली जाते. या सिनेमाची पटकथा पटकथेतील गुरु सीड फिल्डच्या तीन अंकी रचनेनुसार आहे. त्यामुळे त्यातनं वरवरचा संघर्ष दिसून येतो पण प्रेक्षकांना प्रश्न पडत नाहीत. एका अडचणीवर मात केल्यामुळे उत्तरे चटकन मिळतात. बाजारात आयते गाईड्स व नोट्स असतात तसे. आपण यशस्वी झालो आहोत अशी भावना प्रेक्षकांच्या मनात तयार होते.

वरील तीन सिनेमांपैकी ‘तारे जमीं पर’ व ‘थ्री इडियट्स’ हे निश्चित उत्तर देणारे कथानक मांडतात. ‘दहावी फ’ मधले विद्यार्थी सुद्धा शेवटाकडे एक बदल घेऊन येतात पण त्या सिनेमाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. कदाचित नापास विद्यार्थ्यांची कथा का बघावी असा प्रेक्षकांना वाटलं असेल. त्याचं दुसरं कारण असं आपल्या इथला प्रेक्षकवर्ग हा मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गातला आहे. त्याला त्याच्या आयुष्याशी निगडीत कथानके मांडलेली असली की तो त्याला भरभरून प्रतिसाद देतो. त्यातच शिक्षण, शिक्षक, यशस्वी होणे वगैरे बाबी असल्या की त्याला आपल्या घरचाच सिनेमा आहे असं वाटतं. आपल्याकडे ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर’ म्हणण्याची प्रथा आहे. त्यामुळे इथे विश्वास नांगरे-पाटील ते एपीजे अब्दुल कलाम व्हाया सचिन तेंडूलकर यांना आदर्श मानण्याची पद्धत आहे. त्यात आता आनंदकुमार यांची भर पडलेली. याचं कारण मध्यमवर्गाचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे शिक्षण. 

शिक्षणातून मिळणारी सुरक्षित आयुष्याची हमी त्याला खूप जवळची वाटते. त्यामुळेच असे शिक्षक, असे आदर्शव्रत असणाऱ्या व्यक्ती त्याला पूजनीय आहेत. याचाच परिपाक म्हणजे एका शिक्षणसंस्थेच्या प्रवेश परीक्षेला नको इतकं महत्त्व देणाऱ्या या सिनेमाला प्रतिसाद मिळतोय. आयआयटीमध्ये शिकणे म्हणजे प्रतिष्ठेची गोष्ट. आपण कुठे शिकतो याला भारतीय शिक्षीत वर्गात अतोनात महत्त्व दिलं जातं. भारतीयांना ज्या त्या गोष्टीत प्रतिष्ठा हवी असते मग ते सिम कार्ड कोणत्या कंपनीचं वापरावं ते घर फ्लॅट असावा की बंगलो की रो-हाऊस यात शोधली जाते. त्याद्वारे आपल्याला समाजात श्रेष्ठत्व प्राप्त होतं अशी भावना तयार होते. त्यामुळेच इंजिनिअर, डॉक्टर, वकील, बँक, आयपीएस, आयएएस अधिकारी, खाजगी आस्थापनातील वरिष्ठ पदावर असणारा व्यक्ती यांना आपल्या इथे अत्यंत मान आहे. प्रतिष्ठा आहे. आपणही ह्याच वर्गात असावेत असं सर्वसामान्यांना वाटत असतं. जास्तीकरून मध्यमवर्गाला.

हा सिनेमा शेवटाकडे आल्यावर माझ्या मनात प्रश्न उपस्थित झाला मी जसा पदवीधर होताना नापास झालो तसं ही हुशार, मेहनती मुलं आयआयटीमध्ये जाऊन नापास झाली तर यांचा वाली कोण? कारण दहावी, बारावीपेक्षा अभ्यासाचा मोठा आवाका पदवीचा असतो. तिथे विद्यार्थी म्हणून आपली खरी कसोटी लागत असते. आणि आपण केलेल्या चुका आपल्यालाच भोगाव्या लागतात. कुणी आनंदकुमार लगेच जवळ येऊन गणितातल्या अडचणी सोडवत नाही. त्यामुळे जर नापास झालो तर पुढची दारं बंद होण्याचा मोठा धोका असतो. भारतीय समाजात शिकताना नापास होणे हे बलात्कार किंवा खून केल्यापेक्षा मोठा गुन्हा आहे. ज्याची शिक्षा अवहेलनेच्या स्वरुपात दिली जाते. आपला पाल्य नापास झालाय हे शरमेने सांगण्याची पाळी आपल्यावर येऊ नये असं पालकांना वाटतं कारण त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळालेली असते. त्यामुळेच त्यांचा ओढा आपल्या पाल्याने वाट्टेल ते करून शिक्षणात भरपूर गुण घेऊन समाजातील लब्धप्रतिष्ठीत जागा प्राप्त करावी असा असतो.

नापास पाल्य गळ्यातलं लोढणं असतं. सुरक्षित आयुष्याची हमी तो देऊ शकत नाही. त्यामुळेच त्याच्यासमोर आत्मविश्वासाचा, परीक्षेतील यशाचा, त्यातनं मिळणाऱ्या सुखवस्तू आयुष्याचा, प्रतिष्ठेचा बागुलबुवा उभा केला जातो. याचा परिणाम पाल्य पदवीधर होताना नापास झाल्यावर त्याची अवहेलना केली जाते. त्याच्या हुशारीचं मोजमाप केलं जातं. आसपासचे सर्व शिक्षीत व्यक्ती ह्या न्यायाधीशाच्या भूमिकेतून त्याला सल्ले द्यायला लागतात. ह्या दुष्टचक्रात त्याला अडकावं लागतं. बाहेर येण्याची कसलीही सोय नसते. त्याने एकतर शिक्षण सोडून देऊन कुठेतरी चार पैसे कमवायचे किंवा जमेल तसं शिकत राहायचं. त्यामुळेच सिनेमातली ती मेहनती मुले पदवीधर होताना नापास झाली तर त्यांचं पुढचं आयुष्य कसं असेल असा प्रश्न पडला मला.

परीक्षेतील यशाला आयुष्याच्या यशाची खात्री म्हणून बघणाऱ्या त्या प्रेक्षकात असंख्य शाळकरी मुले होती जी अशा सिनेमांमधून प्रेरणा घेणारी होती. त्यांच्या शाळकरी वयाला ते योग्यच आहे पण त्यांना घेऊन येणारे पालक मात्र आपला पाल्यही असाच यशस्वी होईल. आयआयटी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन इंजिनिअर झाल्यावर आपल्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देईल या भावनेने भारलेले दिसले. त्यांच्या चेहऱ्यावरील ते भाव बघून भरलेल्या सिनेमा हॉलमध्ये मी मात्र आतनं रिकामा होतो. 

पूर्वप्रसिद्धी : जस्टराईटसिनेमा.कॉम 

Comments