कोरोना काळ, फोबिया आणि दहशत
जानेवारीत
नेहमीसारखी वर्षाची सुरूवात झाली. आयुष्य नॉर्मल होतं. दिल्लीतील विद्यापीठात
विद्यार्थ्यांवर हल्ला झाला म्हणून मोठ्या प्रमाणात निदर्शनं चालू झाली होती.
फेब्रुवारीत परत दिल्लीतच दंगली उसळल्या. केंद्र सरकारच्या या फेजमध्ये अजून काय काय
बघायला मिळणार अशी चर्चा ऐकू यायला लागली. याच काळात चीनमध्ये कोरोना नावाचा एक
व्हायरस पसरला आहे. तो संसर्गजन्य आहे. त्याने तात्काळ माणूस मरतो असं ऐकण्यात
यायला लागलं. इटलीमध्ये केसेस वाढायला लागल्यावर इतर देशात सुद्धा तो पसरतोय हे
बातम्यातून कळायला लागलं. विमानाने प्रवास करणाऱ्यांमुळे तो मोठ्या प्रमाणात पृथ्वीभर
पसरतोय असं सुरूवातीच्या पाहणीतून लक्षात आलं. पँडेमिकची सुरूवात झाली होती. ३०
जानेवारीलाच वूहान प्रांतातून परतलेल्या केरळमधील एका विद्यार्थ्याला कोरोनाची
लागण झाल्याचं आढळून आलं होतं. तो भारतातला पहिला कोरोनाबाधित.
२४
मार्चला रात्री बारापासून देशात लॉकडाऊन करण्यात आलं. ते का केलं, कशासाठी केलं हे
कळण्या अगोदरच सगळं बंद करण्यात आलं. जीवनावश्यक वस्तू घेण्याची मुभा असली तरी संपूर्ण
शहर बंद केलं गेलं होतं. लातूर बंद किंवा भारत बंद बघण्याची सवय असलेल्यांना एकदम
शहरच एकवीस दिवसांसाठी पूर्णतः बंद करण्यात आलंय असं सांगण्यात आलं. सर्व व्यवहार
रोखले गेले. जिथे आहात तिथेच रहा. प्रवास करू नका. जी माणसे घरून कामे करू शकत
असतील त्यांनी ती घरातून करावीत असा आदेश देण्यात आला. एकमेकांमधे अंतर राखा.
मास्क वापरा. हॅन्ड सॅनिटायझरचा वापर करा. बाहेरून आल्यावर साबणाने हात स्वच्छ
धुवा. शिंकणार खोकणार असाल तर हाताचे पंजे तोंडासमोर न धरता कोपरा तोंडासमोर धरून
शिंका किंवा खोका असं सांगण्यात आलं. व्हायरस कशातून पसरेल हे माहिती नव्हतं.
त्यामुळे सर्वच गोष्टींची अति काळजी घेणं चालू झालं. भाज्या, किराणा सामान यांची
स्वच्छता केल्याशिवाय घरात घेण्यात येत नव्हते.
मार्च
ते जून व त्यानंतर टप्प्या टप्प्याने अनलॉक होत असताना एक गोष्ट सर्वत्र दिसून येत
होती ती म्हणजे दहशत, भीतीची. ही दहशत सोपी म्हणावी अशी नव्हती. याची तुलनाच
करायची झाल्यास अमेरिकेतील ट्वीन टॉवर्स पाडण्यात आले. अमेरिकन जनतेला दहशतवादी
हमला काय असतो हे माहिती नसल्यामुळे त्यांची पाचावर धारण बसली. विमान प्रवासाची दहशत
घेतली त्यांनी. भीती निर्माण झाली त्यांच्यात. त्यामुळे त्याचा परिणाम विमान
प्रवासी उद्योगावर झाला. लॉकडाऊन हे अशाच एका अघोषित हल्ल्याचा परिणाम होता. उदाहरणच
द्यायचं झालं तर साधं एकमेकांच्या घरी जाणं मुश्कील झालं होतं. प्रत्येकाच्या घरी
काही काम असल्याशिवाय जायचं नाही. गेलात तरी विशिष्ट अंतर ठेवून व्यवहार करायचा.
सामानाची किंवा वस्तूंची देवाणघेवाण करायची नाही. शरीराला स्पर्श होऊ द्यायचा
नाही. सर्दी, पडसं किंवा इतर आजार असतील तर ताबडतोब हॉस्पिटल गाठून टेस्ट करून
घ्यायची.
पण
ही भीती किंवा दहशत होती कसली. मार्च पूर्वीचे दिवस आठवल्यास एक गोष्ट लक्षात येते
एक प्रकारचा मोकळेपणा व्यवहारात होता. हा मोकळेपणा कसा तर आपण न भीता नवीन
व्यक्तीशी व्यवहार करत होतो. व्यवहार म्हणजे काय तर बोलणे कामा निमित्त असेल किंवा
नसेल सुद्धा. एखादा ऑटोवाला असेल तर त्या छोटेखानी प्रवासात राजकारणापासून ते
क्रिकेटपर्यंत कोणत्याही गोष्टीवर मनमोकळं बोलता येत होतं. मत मांडता येत होतं. मत
ऐकण्याची सवय होती. कुठेही जायची मुभा होती. कामानिमित्तच बाहेर जावं यावर बंधन
नव्हतं. कुठेही थांबून दोन-चार तास गप्पा मारता येत होत्या. व्हायरस संसर्गजन्य
आहे हे कन्फर्म झाल्यावर ही भीती चेहऱ्यावर व डोळ्यात दिसायला लागली. प्रत्येकाकडे
संशयाने बघायची सवय झाली. एखादी व्यक्ती साधी शिंकली तरी ती कोरोनाबाधित आहे ही
भीती निर्माण झाली. त्यामुळे रक्ताचे लोकं असतील किंवा मित्रगोत्र कुणीही हा असंशयित
राहिला नाही. कोरोनाफोबिया वाढायला लागला होता. एखाद्याची घरी जायचं तर त्यांच्या
घरचे नियम पाळायला लागत होतं. त्यासाठी त्यांनी इथूनतिथून मिळेल त्या माहितीच्या
आधारावर स्वतःची अशी डिफेन्स स्ट्रॅटेजी तयार केली होती.
A
phobia is an anxiety disorder characterized by persistent, excessive,
unrealistic fear of an object, person, animal, activity or situation. Phobia
makes people avoid the triggers of fear; when such avoidance is not possible,
it causes anxiety and distress.[1] वरील व्याख्येवर आधारित
कोरोनाफोबियाची एक व्याख्या तयार करण्यात आली आहे ती पुढीलप्रमाणे: Coronaphobia as an
excessive triggered response of fear of contracting the virus causing COVID-19, leading to accompanied excessive concern over physiological
symptoms, significant stress about personal and occupational loss, increased
reassurance and safety seeking behaviors, and avoidance of public places and
situations, causing marked impairment in daily life functioning.[2] याचे परिणामस्वरूप निराशावादी
होणे, आयुष्याचं काय होईल, अनिश्चितता, आत्महत्येचे विचार, जगायचं कसं हे व असे अगणित
प्रश्न निर्माण झाले. दहशत निर्माण झाली. ही दहशत जशी व्यक्तीसापेक्ष होती तशीच
त्यापेक्षा जास्त ती समूह सापेक्ष होती.
समूह
सापेक्ष दहशत निर्माण होण्याचं कारण माणूस हा कळपात/समूहात राहणारा प्राणी. सर्व
छोट्या मोठ्या व्यवहारासाठी त्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. कुटुंब, काम,
प्रवास, सण-उत्सव, मेडिकल इमर्जन्सी वगैरेसारख्या सामाजिक संबंधांवर तो अवलंबून
आहे. कोरोनाने या सामाजिक सलोख्यावरच हल्ला केला. व्यक्ती व्यक्तीमधील संबंध संशयाच्या
पातळीवर आणून त्यातील नात्यांची साखळी तोडून टाकली. त्यामुळे आपण (कायमचे) अधांतरी
झालो आहोत ही समूह सापेक्ष भावना तयार झाली. इथेच कोरोना विजयी ठरला. त्याने समूह
भावनेला उध्वस्त करून टाकलं. समाजाचा पाया हा या सामजिक बंधातल्या नात्यांवर असतो.
त्यातून समूहाची व समाजाची निर्मिती होते. व्यवहार पक्के होतात. आपण जे काही करतो
आहोत त्याला चांगला-वाईट प्रतिसाद आपल्यासारखीच एक व्यक्ती देत आहे हा सुखावणारा
मानसिक आधार कोरोनाने ठिसूळ करून टाकला. त्याचे असंख्य परिणाम दिसयला लागले.
त्यातील एक गोष्ट म्हणजे प्रवास करणे लोकं टाळायला लागली. प्रवासात काही सर्वचजण
एकमेकांशी बोलत नाहीत पण प्रवासात आपल्यासोबत काही व्यक्ती आहेत हे भावनिक समाधान
असतेच. पण कोरोनामुळे समोरच्यावर संशय निर्माण झाल्यामुळे ओळखी-अनोळखी हा भेद
पुसला गेला. जे प्रवासाचं तेच इतर व्यवहारांचं. कटिंग करणे हे नेहमीचे कर्म पण
त्या साध्याश्या कर्माला सुद्धा लोकं टाळायला लागली. नेहमीच्या कटिंगवाल्याकडे
जायचं टाळायला लागले. किंवा इतर उपाय शोधायला लागले. ही दोन उदाहरणे प्रातिनिधिक
आहेत. जीवनाच्या सर्वच व्यवहारावर अशा प्रकारे घाला घालायचं काम कोरोनाने केलं आहे.
त्यातून आर्थिक ते सामाजिक प्रश्न निर्माण झाले ते वेगळेच.
सरत्या
वर्षाचा लेखाजोखा मांडताना कोरोनाने जी उलथापालथ करून ठेवली आहे ती समूह
भावनेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. सामाजिक सलोखा किती महत्वाचा असतो हे
कोरोनाने दाखवून दिलं आहे. बाकी ‘न्यू नॉर्मल’ तर ‘नॉर्मल’ सारखंच राहणार आहे. पण २०२०
चा विचार करता समूह भावनेतील भीती, दहशत काढून टाकून सामाजिक सलोखा खोलवर जपणे हे
आता सर्वांपुढील काम आहे असं वाटतं.
[1]
American Psychiatric Association American Psychiatric Publishing; 2013 Diagnostic and Statistical Mental
Disorders (DSM-5®)
[2]
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC7474809/#bib0010






Comments