इन्सेप्शन (कथा)
"काका, माझ्यावर विश्वास ठेवा. तिथं काहीतरी कॉन्स्पीरसी चालू आहे. ," तो मुलगा काकूळतीला येउन म्हणाला. अंगात टी-शर्ट, जीन्स, पायात आदिदासचा शूज घातलेले. "मला उल्लू नको बनवू. या आधीसुद्धा मी तुला म्हणालो होतो. ," इन्स्पेक्टर कदम जरबेने म्हणाले. दुपारच्या कडकडीत उन्हात जिल्हा परिषदेसमोर सुमोत त्यांचं बोलणं चालू होतं. "मी तुम्हाला कसं पटवून देऊ? ," वैतागून तो म्हणाला. सुमोच्या बाहेर त्याची नजर पार्क केलेल्या बाईकवर गेली. काहीतरी क्लिक झाल्यासारखं त्याने इन्स्पेक्टरकडे मान वळवली. "हे बघा, त्या माणसाचं कार्ड. ," त्याने वॉलेटमधून एक व्हिजिटिंग कार्ड काढून त्यांच्यासमोर धरलं. इन्स्पेक्टर कदमनी ते हातात घेतलं. त्यावर लिहिलेलं होतं. निलेश माळी एरिया मनेजर इंडिया अर्थमुव्हर्स प्रा. लि., लातूर. सोबत त्याचा मोबाईल आणि ऑफिसचा नंबर. कदमनी लागलीच मोबाईल नंबर डायल केला. धीस नंबर डज नॉट एक्झिस्टस असा संदेश यायला लागला. तसाच ऑफिसचा नंबर डायल केला. हा नंबर उपलब्ध नाही असं मराठीतून सांगण्यात आलं. आश्चर्यचकित होऊन त्यांनी मोबाईल खिशात ठेवला. "तुला हे कार...