इन्सेप्शन (कथा)

"काका, माझ्यावर विश्वास ठेवा. तिथं काहीतरी कॉन्स्पीरसी चालू आहे. ," तो मुलगा काकूळतीला येउन म्हणाला. अंगात टी-शर्ट, जीन्स, पायात आदिदासचा शूज घातलेले.
"मला उल्लू नको बनवू. या आधीसुद्धा मी तुला म्हणालो होतो. ," इन्स्पेक्टर कदम जरबेने म्हणाले.
दुपारच्या कडकडीत उन्हात जिल्हा परिषदेसमोर सुमोत त्यांचं बोलणं चालू होतं.
"मी तुम्हाला कसं पटवून देऊ? ," वैतागून तो म्हणाला.
सुमोच्या बाहेर त्याची नजर पार्क केलेल्या बाईकवर गेली. काहीतरी क्लिक झाल्यासारखं त्याने इन्स्पेक्टरकडे  मान वळवली.
"हे बघा, त्या माणसाचं कार्ड. ," त्याने वॉलेटमधून एक व्हिजिटिंग कार्ड काढून त्यांच्यासमोर धरलं.
इन्स्पेक्टर कदमनी ते हातात घेतलं. त्यावर लिहिलेलं होतं. निलेश माळी एरिया मनेजर इंडिया अर्थमुव्हर्स प्रा. लि., लातूर. सोबत त्याचा मोबाईल आणि ऑफिसचा नंबर.
कदमनी लागलीच मोबाईल नंबर डायल केला. धीस नंबर डज नॉट एक्झिस्टस असा संदेश यायला लागला. तसाच ऑफिसचा नंबर डायल केला. हा नंबर उपलब्ध नाही असं मराठीतून सांगण्यात आलं. आश्चर्यचकित होऊन त्यांनी मोबाईल खिशात ठेवला.
"तुला हे कार्ड कोणी दिलं अन का? ," त्यांनी शांतपणे प्रश्न केला.
"ह्याच माणसानं दिलं. ," कार्डकडे निर्देश करत तो मुलगा म्हणाला.
"कधी व कुठे दिलं?"
"त्या दिवशी मित्रांसोबत संतोष बारमध्ये बसलो होतो. तिथं… "
"तू ड्रिंक्स घेतोस? ," इन्स्पेक्टरनी त्याला मधेच तोडत विचारलं.
"कधी-कधी. फक्त मित्रांसोबत. इतर वेळी नाही."
"यंदा कितवीला आहेस? ," त्यांनी परत त्याला तोडत विचारलं.
तो मनातल्या मनात चरफडत होता. उगाचच ह्या साल्यावर आपण भरोसा ठेवला.
"बी. एस्सी. सेकंड ईयर. ," त्यानं माहिती पुरवली.
"कॉलेजला रेग्युलरली जातोस की घरातून निघून थेट संतोष बार ?"
त्यांना त्याच्या बोलण्यावर विश्वास नाही हे त्याच्या लक्षात आलं होतं. तरी आज त्यांना तिथं घेऊनच जायचं याच इराद्यानं त्यानं त्यांना असं दुपारच्या वेळी गाठलं होतं.
"नाही. रेग्युलरली कॉलेज. न चुकता. ," आपण दोनदा एकच माहिती दिली हे त्याला समजलं नाही.
"बरं. पुढं सांग. ," कदम विश्वास ठेवल्यासारखं करत म्हणाले.
"त्या दिवशी संध्याकाळी बारमध्ये साधारण सात-आठ वा. बसलो. दहा-साडेदहा दरम्यान जेवून निघालो. डोकं जाम pack झालं होतं. पाय कुठे टाकायचे ते कळत नव्हतं. कसंतरी बिल देऊन बाहेर येउन थांबलो. रस्त्यावर वर्दळ कमी होती. मित्र बाईक काढायला म्हणून पुढं गेला होता. मी तिथंच एका बाईकजवळ उभा होतो. तेवढ्यात माझ्या मागून आवाज आला. हाय मी वळून बघितलं तर साधारण पस्तिशी-चाळीशीचा माणूस उभा होता. माझ्यामागे बऱ्यापैकी अंधार होता. त्यामुळे चेहरा दिसत नव्हता. हे कार्ड. या नंबर वर फोन कर उद्या सकाळी. तुझ्यासाठी एक काम आहे. एवढं बोलून हातात हे कार्ड देऊन अंधारात गायब झाला."
गायब झाला म्हणालास का? ," त्यानं वापरलेल्या शब्दांचं त्यांना आश्चर्य वाटलं.
"हो. गायब झाला. ," तो मुलगा ठामपणे म्हणाला.
"गायब झाला की तुझ्याकडे पाठ करून निघून गेला. जर आठवून सांग. ," नशेत असल्यामुळे त्याला तसा भास झाला असेल असं त्यांना वाटलं.
"नाही. तो गायब झाला. मागनं मित्राच्या बाईकचा हॉर्नचा आवाज ऐकू आला म्हणून मी दचकून मागे वळालो. बाईकवर बसून त्याच्या रूमवर गेलो. रूम नांदेड रोडला विवेकानंद चौकात आहे. " तो बोलायचा थांबला. त्याला वाटलं इन्स्पेक्टर काहीतरी बोलतील यावर. ते काही बोलले नाहीत.
"सकाळी उशिराच उठलो. डोकं खूप दुखत होतं. फ्रेश झाल्यावर व एक चहा मारल्यावर बरं वाटलं. रूमवर आल्यावर रात्री काय-काय झालं ते आठवू. एकदम आठवलं रात्री कोणीतरी एक कार्ड दिलं होतं. त्याला फोन लावला. त्यानं शिवाजी चौकातल्या ब्रिज हॉटेलात ये म्हणून सांगितलं. मी पोचलो. तिथं एका कोपऱ्यातल्या टेबलावर बसला होता… "
"त्याला लागलीच ओळखलास का की आधीपासूनच ओळख होती? ," इन्स्पेक्टरनी परत मधेच तोडत त्याला विचारलं.
"नाही म्हणजे तिथं पोचल्यावर त्याला फोन केला तेव्हा त्यानेच सांगितलं.," एवढं बोलून तो एक क्षण थांबला.
कदमनी मानेनेच पुढे बोल म्हणून सांगितलं.
"ओळख वगैरे झाल्यानंतर त्यानं कार्ड देण्याचं कारण सांगितलं. तो म्हणाला त्याने व त्याच्या मित्राने एक कंपनी स्थापन केली आहे. सध्या ते दोघंच काम करतायत पण त्यांचं काम थोडं वेगळं असल्यामुळे त्यांना एका मुलाची गरज होती ज्याला कॉम्प्युटर चालवता येईल. तसेच त्यांच्या कामात प्रत्यक्ष मदत होईल."
"कश्या प्रकारचं काम होतं त्यांचं? ," इन्स्पेक्टरनी विचारलं.
"एखाद्या माणसाच्या मनात शिरून त्याच्या सबकॉंन्शस पातळीतली माहिती बाहेर काढायची. ," तो आत्मविश्वासानं अन उत्साहानं म्हणाला. इन्स्पेक्टर कदम आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवतायत याचा त्याला आनंद झाला होता.
"असं… ," कदम म्हणाले. मन, सबकॉंन्शस पातळीसारखे शब्द ऐकून त्यांना उत्सुकता वाटली.
"तर. त्यानं मला लगेच सोबत चालायला सांगितलं."
"मग. गेलास का तू? ," उन्हामुळे सुमोत गरमी जाणवत असली तरी त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून विचारलं.
"हो. त्याच्याच गाडीतून तिथं पोचल्यावर त्यानं माझी अजून एका माणसाशी भेट घालून दिली. त्या माणसाचं नाव होतं डॉमनिक कॉब. ज्याची खासियत तो एखाद्या माणसाच्या अंतर्मनात शिरून त्यातली माहिती बाहेर काढतो. हा तोच माणूस होता ज्याच्यावर ख्रिस्तोफर नोलाननी इन्सेप्शन सिनेमा बनवलाय."
"बरं… ," सिनेमाचा विषय निघाल्यावर इ. कदमनी आश्चर्ययुक्त स्मितहास्य केलं.
"मी एक्सायटेड झालो होतो त्यांच्यासोबत काम करायला. त्या घरात एका जागेतून आत खाली जायला भूयार होती. जी एका तळघरात संपत होती. तिथं सर्व प्रकारच्या सोयीसुविधा होत्या. मला त्यांनी नेमकं काय करायचय ते समजावून सांगितलं. तसंच यासाठी आगाऊ पैसे पण दिले."
"किती दिले?"
"पाच हजार रुपये."
"कुठे ठेवलेत?"
"घरी."
काही सेकंद त्यांच्यात बोलणं झालं नाही.
नेमकं त्यांचा प्लान काय होता? ," इ. कदमनी संभाषण बंद पडू नये याची काळजी घेत विचारलं.
"त्यांनी प्रयोग म्हणून मुंबईतल्या एका मोठ्या उद्योगपतीची निवड केली आहे. संजय नथानी नाव आहे त्याचं. येत्या शनिवारी मला घेऊन ते जाणार आहेत. ,"
कदमनी ते ऐकून घेतलं. लगेच प्रतिक्रिया दिली नाही.
"मला तिथं घेऊन चल.," बोलता-बोलता स्टियरिंग व्हील खाली हात घालत त्यांनी चावी लावली.
***
लातूर सोडून पंधरा मिनिटं झाली होती. औश्याच्या दिशेनं सुमो पळत होती तरी त्यांच्यात बोलणं झालं नव्हतं. मला तिथं घेऊन चल असं इ. कदमनी बोलल्यावर त्यानं लगेच हो म्हणलं पण जीभ चावून. ते त्यांच्या नजरेतून सुटलं नव्हतं. 
उजवीकडे आलमल्याच्या दिशेने त्यांनी गाडी वळवली. साधारण सहा-सात किलोमीटर गेल्यावर त्यानं त्यांना डावीकडे वळणाऱ्या एका कच्च्या रस्त्याकडं सुमो वळवायला सांगितली. 
तशीच पुढे दोन किलोमीटर अंतरावर त्यानं थांबवायला सांगितलं. समोर एक पडकी इमारत होती. 
इन्स्पेक्टर कदमनी पहिल्यांदा संपूर्ण इमारत बाहेरून फिरून बघून घेतली. 
दोघं दरवाज्यातून आत आले. वरती आकाश स्वच्छपणे दिसत होतं. 
इन्स्पेक्टरनी एकदा प्रश्नार्थक चेहऱ्यानं त्याच्याकडे बघितलं. त्यानं पाहून न पाहिल्यासारखं करत इतरत्र बघायला सुरुवात केली. 
आतल्या सर्व भिंती खचल्यामुळं कागदावर चौकोन काढतात तसं आतनं घराचं झालं होतं. एका कोपऱ्यात खालच्या बाजूला एक कोनाडा होता. इन्स्पेक्टर त्याच्या जवळ गेले. खाली बसून कोनाड्यात उजवा हात घातला. हाताला काहीही लागलं नाही. 
तो उत्सुकतेने त्यांच्याकडे बघत मागे उभा होता. 
ते उठले. हताश चेहऱ्यानं मागे वळले. चेहऱ्यावरचे भाव झपाझप बदलत होते. तो चपापून एक पाऊल मागे सरकला. 
त्यांनी खण्णकन त्याच्या कानफटात ठेवून दिली. तशी त्याच्या डोळ्यांसमोर भर दुपारी तारे चमकले. डोळ्यांसमोर अंधारी आली. 
"मूर्ख बनवतो का मला? ," इन्स्पेक्टरचा चढलेला सूर त्याची मती गुंग करत होती.
"तू दारू प्यायला बसला होतास असं म्हणालास तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं. नेमका मी सापडलो तुला हं… ताथोडे काकांची माझी चांगली ओळख आहे म्हणून फक्त वॉर्निंग देतोय. यापुढे असं काही केलस तर ड्युटीवरच्या ऑफिसरला चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्याप्रकरणी जेलमध्ये घालीन. गपगुमान कॉलेज करायचं. पुढच्या वर्षी डिग्री घेऊन नोकरी करायची, काय !," एवढं बोलून इन्स्पेक्टर कदमनी त्याला वापस चल अशी खूण केली. 
---------------------------------------------------------------------------------------------------

सर्वाधिकार विवेक कुलकर्णी

Comments

Gorakhnath said…
Enjoyed reading it, Vivek. The anti-climax is funny.