मी एक ब्राह्मण

सन १९९५-९६ मध्ये मी दहावीला होतो. प्रकृती तोळामासा असल्यामुळे वडिलांनी शाळेला व ट्युशन-क्लासला जाण्या-येण्यासाठी ऑटो लावला. साधारण डिसेंबरपर्यंत ऑटो होता. नंतर प्रकृतीत थोडीशी सुधारणा झाली म्हणून तो बंद केला. वार्षिक परीक्षेच्यावेळी सायकलवर परीक्षेला जाण्याचा त्रास होईल म्हणून परत त्या ऑटोवाल्याला बोलवायला त्याच्या घरी गेलो. त्याचं घर लातुरात जुन्या औसा रोडवर मराठवाडा ग्रामीण बँकेच्या जवळ होतं. घरासमोर सायकल लावून एका छोट्या दरवाज्यातून बोळकंडीवजा जागेतून आत गेलो. समोर दोन मध्यमवयीन बायका बोलत बसल्या होत्या. त्यातल्या एकीला ऑटोवाल्याला घरी पाठवून द्या म्हणून सांगितलं. तिनं माझं नाव विचारलं. मी सांगितल्यावर ती चटकन म्हणाली, "म्हणजे बामनाच्या घरी का?" तेव्हा काय उत्तर दिलं ते आठवत नाही पण तिचं अगदी सहज जातीबद्दल बोलणं मनात रुतून बसलं.

घरी आल्यावर वडिलांना घडलेलं सांगितलं. ते म्हणाले हे असंच आहे. आजकाल ब्राम्हणांविरुद्ध असंच बोललं जातं. मला हे असंच बोललं जातं वाक्य आजही खटकतं. ब्राह्मण जातीत जन्मलो म्हणजे नक्की काय केलं ते कळत नाही. तसेच इयत्ता चौथीत असताना संत नामदेवांनी एका महाराच्या बाळाला कडेवर घेतल्याची कथा पुस्तकात होती तिची पगडा तोपर्यंत मनावर होता पण त्या प्रसंगाने खूप प्रश्न निर्माण केले. त्या बाईचा ऑटोवाल्याशी कसा संबंध होता हे लक्षात नाही. कदाचित ती त्याची बायको असेल पण त्याचं आडनाव मुंडे होतं हे पक्कं लक्षात आहे. मुंडे म्हणजे वंजारी.

पहिला प्रश्न निर्माण झाला जर ती बाई मला माझ्या जातीवरनं ओळखत असेल तर शाळेत शिकवलेलं जातीपातीच्या भिंती तोडून टाका हे कितपत खरंय. जर शाळेत असे दिशाभूल करणारे संस्कार करत असतील तर शाळा शिकायची कशाला या उपप्रश्न लगेच त्याला जोडून पुढं आला. दुसरा प्रश्न जर मी ब्राह्मण असेन तर विवेक या नावाला काय अर्थ आहे. तिसरा प्रश्न निर्माण झाला मी ब्राह्मण आहे म्हणजे नक्की कोण आहे. समाजव्यवस्थेतल्या उतरंडीत वरच्या स्थानावर राहणारा म्हणजे नक्की काय करणारा. जर वडिलोपार्जित धन हे आपल्याला मिळत असेल तर याला वडिलोपार्जित धन म्हणायचं का की समाजोपार्जित?

यातील एकही प्रश्नाचे उत्तर अजूनपर्यंत मिळाले नाही.

एक व्यक्ती म्हणून मी ब्राह्मण जातीतला असणं व माझ्यात ब्राह्मणीपणा असणं फरक आहे का कारण आमच्या कुटुंबात जरी कर्मठपणे जातीपातीचा विचार केला जात नसला तरी आपण ब्राह्मण आहोत याचा सूक्ष्म गर्व नक्कीच बोलण्यातून नाहीतर चर्चेतून डोकावतो. मला अशावेळी प्रश्न पडतो मी विवेक नावाची व्यक्ती म्हणून यांच्यापासून वेगळा आहे का? लहानपणापासून त्या संस्कारात वाढलो असल्याने माझ्यातसुद्धा तो ब्राह्मणीपणा आलाय का? माझ्या आत्मपरीक्षणावरनं वाटतं आपल्यात तो नाही पण ब्राह्मणेत्तर वर्गातल्या लोकांच्या नजरेतनं ते आहे असं लक्षात येतं. प्रत्यक्षात ती बाई सोडली तर अजून तरी कोणी मला तुझ्यातला ब्राह्मण डोकं वर काढतोय किंवा तुला बामनी अटीट्युड सोड असं म्हणलेलं नाही. एक ब्राह्मणेत्तर वर्गातली मैत्रीण म्हणायची कंजूष बामन आहेस म्हणून पण ते विनोदानं.

इथे मला ब्राह्मण, ब्राह्मणीपणा किंवा ब्राह्मणवाद याच्या खोलात शिरायचं नाही किंवा पुर्वसूरीतल्या पंडितांनी यांच्या व्याख्या काय ठरवल्यात किंवा चर्चा केल्यात याचा उहापोह करायचा नाही. तसेच फुले-आंबेडकरांसारख्या विद्वानांनी याच्या विरोधात किंवा समर्थनात काय लिहिलय याची चर्चा नाही करायची. मला पडलेला प्रश्न हा व्यक्तिगत स्वरूपाचा आहे. मी जर एक व्यक्ती म्हणून या समाजव्यवस्थेचा घटक किंवा अंश असेन तर माझ्यावर झालेला संस्कार हा चुकीचा आहे की बरोबर. यात परत उपप्रश्न तयार होतो तो असा जर चुकीचा असेल तर गेली काही हजार वर्ष या समाजव्यवस्थेत अल्पसंख्य (की बहुसंख्य) असणाऱ्या घटकाने स्वतःचं अस्तित्व कशाच्या जोरावर टिकवून ठेवलं अन का! याची उत्तरं अभ्यासकांनी दिली आहेत. मला आश्चर्य वाटतं ते याचं की ही ब्राह्मण चीज काय आहे? ती माझ्यात व माझ्या कुटुंबीयात इतके वर्ष कशी टिकून राहिली. आमचं गोत्र भारद्वाज म्हणजे भारद्वाज नावाच्या ऋषीपासून आमची वंशावळ सुरु झाली. मग ते ऋषी ब्राह्मण कसे?

त्यांनी ब्राह्मण्यपदाची शपथ घेतली होती की कुठल्या कंपनीने त्याला पे-रोलवर ठेवलं होतं की त्यांचा वंशज म्हणून मी आयुष्य व्यथित करावं. इथे त्यांना विरोध करण्याचा किंवा उपहास करण्याचा उद्देश नाही तर त्या पाठीमागच्या दृष्टीकोनाला समजून घ्यायचा आहे. त्यायोगे आजच्या काळात मी ब्राह्मण असणं म्हणजे काय याचं कदाचित उत्तर मिळेल. कारण स्वातंत्र्योत्तर भारतात आरक्षण लागू झाल्यापासून जात-पात-धर्म यांची चर्चा, अट्टाहास, वाद-विवाद, हेवेदावे प्रचंड प्रमाणात वाढलेत. आपल्याला जातींच्या लोकांना समाज म्हणवून घेऊन एकत्र आणून संमेलनं भरवली जात आहेत. ही चुकीची गोष्ट आहे का नाही हे मी ठामपणे नाही सांगू शकत. पण माझ्या निरीक्षणातून मला वाटतं शिक्षणाचा प्रसार सामाजिक उतरंडीतल्या सर्वांपर्यंत पोचल्यामुळे एक प्रकारचं सपाटीकरण झालय. त्यामुळे प्रत्येकाला असुरक्षितता वाटायला लागलीय. ज्या समाजात श्रेष्ठ-कनिष्ठतेचे पक्के विचार वर्षानुवर्षे अस्तित्वात होते व त्यांची पिढ्यानपिढ्या जोपासना करून हस्तांतरित करण्यात आहे तिथे ते सर्व एकाच माळेचे मणी झाल्यावर असुरक्षितता वाढीस लागली आहे. ही असुरक्षितता मी किंवा माझ्या जातीतला व्यक्ती या बदलत्या युगात राहू का या साध्या प्रश्नाभोवती केंद्रीत झाली आहे. या असुरक्षिततेला जातीचा किंवा धर्माचा वर्ख लावून एकत्र करण्याचा प्रयत्न आपण किती न्यूनगंडांनी पछाडलोय हे दाखवून देतो.

तरीही थोड्या वेगळ्या पद्धतीने या गोष्टीचा विचार करता येतो. आदिम मानवाच्या अस्तित्वाच्या खुणा ह्या तो टोळी करून राहू लागला तेव्हापासूनच्या आहेत. आजच्या आधुनिक भारतात प्रत्येक जात-धर्म ही एक टोळी आहे असं म्हणून बघितलं तर आपल्याला काय दिसतं. सामाजिक उतरंडीत ब्राह्मण ही एक वरच्या स्थानावरची टोळी आहे. (कृपया, इथे टोळी याचा अर्थ नकारात्मक घेऊ नये. तसेच समूह किंवा गट हे समाजशास्त्रीय शब्द मी मुद्दामच वापरायचं टाळतोय.) तर ही टोळी काय करतेय तर माझ्यासारख्या ब्राह्मण वंशजांना एकत्र आणून ब्राह्मणेत्तर वर्गातल्या टोळ्यांशी स्पर्धा करायला लावतेय किंवा स्वतः वर्चद असल्याचं त्यांच्यासमोर भासवतेय. यात पुन्हा प्रश्न पडतो टोळीची निर्मिती ही काही समविचारी लोकं काही एक चांगला उद्दिष्ठ डोळ्यासमोर ठेवून करतात मग ब्राह्मण या जातीची टोळी तयार होणे यात चांगला उद्देश की वाईट. तसेच मी एक ब्राह्मण म्हणून या टोळीचा सदस्य असेन तर त्यांनी दिलेली दिशा किंवा दाखवलेल्या मार्गावरनं मला मार्गक्रमणा करावी लागेल का? जर समाज हा लोकांच्या एकत्र येण्याने तयार होत असतो तर एका व्यक्तीच्या अस्तित्वाची किंमत त्यात किती असते? समजा मी ब्राह्मण ही संकल्पना झुगारून दिली म्हणजे काय केलं तर ब्राह्मणी आचार-विचार सोडून दिले तर माझ्यावरील संस्कार कसे पुसायचे किंवा माझी कंडीशनिंग झालीय ती कशी बदलायची. दुसरं महत्त्वाचा बदल केला तो म्हणजे माझं आडनाव बदललं. सध्याच्या आडनावा ऐवजी ब्राह्मणेत्तर वर्गातल्या एखाद्याचं आडनाव लावलं किंवा परधर्मातील एखादं आडनाव घेतलं तर माझ्या अस्तित्वाला दुधारीपणा येईल.

पहिलं मी पूर्वाश्रमीचा ब्राह्मण वर्गातनं आलेला असल्यामुळे तिथले संस्कार सोडणार नाही आणि दुसऱ्या धर्मातलं नाव घेतल्यामुळे त्या धर्माची शिकवण मानवी लागेल कारण आपल्या इथे नाव व त्याचा धर्म यांचा परस्पर व दाट संबंध आहे. तसेच आपण कितीही डांगोरा पिटत असलो की मी भलेही एका विशिष्ठ जाती-धर्मात जन्मलो-वाढलो असलो तरी मी ते संस्कार किंवा विचार मानत नाही हे मला तरी निखालस खोटं वाटतं. कारण कोणतीही व्यक्ती ही कुटुंबात राहत असली तरी किंवा स्वतंत्र राहत असली तरी कुठल्या ना कुठल्या प्रकारे समाजातल्या कुटुंब या प्रकाराशी निगडीत असते आणि कुटुंबाशी निगडीत आहे म्हणल्यावर त्याच्यावर जाती-धर्माचे संस्कार होतातच. हे एक चक्र आहे असं मानलं तर माझा व मी ब्राह्मण असण्याचा संबंध कुठल्या पातळीवर येतो हे लक्षात आलंच असेल पण मला प्रश्न अजून वेगळ्या पद्धतीने पडतो. मी विवेक कुलकर्णी ही एक व्यक्ती व मी विवेक कुलकर्णी ही ब्राह्मण व्यक्ती यात फरक आहे का? मला वाटतं असावा. पण हा माझा दृष्टीकोन झाला. माझ्याबाहेर ब्राह्मणेत्तर वर्ग मोठ्या प्रमाणात आहे जो हे मनात नाही किंवा नसावा.

माझ्यामध्ये मात्र त्या प्रसंगापासून चमत्कारिक बदल झाला म्हणजे माझ्या तीन व्यक्तिमत्व तयार झालेत. पहिला माझ्यातला मी, दुसरा घरच्यांना व नातेवाईकांना आणि ब्राह्मणवर्गातल्यांना आपला वाटणारा विवेक आणि तिसरा या वर्तुळाच्या बाहेर असणाऱ्यांना दिसणारा या देशाचा एक जबाबदार नागरिक असणारा विवेक कुलकर्णी ही ब्राह्मण जातीतली ब्राह्मण असणारी व्यक्ती. या तिन्ही आघाड्या सांभाळणं दिवसेंदिवस अवघड होत चाललय. माझ्या वागण्यातून, बोलण्यातून समज-गैरसमज पसरत चाललेत. हे समज-गैरसमज कमी करायला वेळ नसल्यामुळे त्यांचा दीर्घकाळ परिणाम समोरच्याच्या मनावर होतोय किंवा होणार आहे.

वरील सर्व गोष्टी माझ्या मनार चालू असतात पण याला एजुन एक मिती आहे. ती म्हणजे माझ्या बाह्यांगाची. माझा एक मित्र मला हाय देखण्या म्हणूनच संबोधतो. स्लॅम बुकात माहिती शेयर करताना त्याने हाय देखण्या म्हणूनच सुरुवात केली. दुसरा एक मित्र माझ्या देखणेपणाचा हेवा करतो असं त्यानं स्पष्टच सांगितलं. त्याच्या म्हणण्यानुसार माझ्या देखणेपणामुळे व छान-छान बोलण्यामुळे मला मैत्रिणी जास्त आहेत व त्या आवर्जून माझ्याशीच बोलतात. याला कदाचित निसर्ग जबाबदार असेल पण तरीही त्याचं मत विचार करण्यासारखं आहे. मला यात एक गंमत वाटते ती म्हणजे सर्व ब्राह्मण देखणे असतात का की देखणेपणामुळे ब्राह्मण होता येतं. मला वाटतं हा मुदा इथे दुय्यम आहे.

कलेजा घायाळ करणारे चेहरे जे असतात त्यांचे विचार ऐकलं की हसायला येतं. तरीही मला त्याच्या दृष्टिकोनाचा हेवा वाटला. तो अशासाठी की तो त्याच्यात काय चागलं आहे याचा विचार न करता स्वतःच्या बाहेर स्वतःला शोधत असतो. असा विचार केला तर मला वाटतं आफ्रिकन लोकांनी आतापर्यंत सामुहिक आत्महत्येचे प्रयत्न करायला हवे होते. म्हणजे बाह्य व्यक्तिमत्व माझ्या ब्राह्मण असण्याला हातभार लावत नाही तर मला इतरांपासून एक हात अंतरावर ठेवतं. ही एक समस्याच आहे. हिच्यावर उपाय शोधणं अवघड दिसतंय. यामुळे मी मात्र वर्तुळाच्या केंद्रात एकटाच उभा आहे असं वाटायला लागलय.

चंद्रकांत वानखडेंकडून उसनवारी करायची तर आपुलाची वाद आपणासि असं त्या प्रसंगापासून झालंय. बघुयात येत्या काळात यातून बाहेर पडता येतं का ते.                                                       
                    

Comments