उडता पंजाब : बल्लीचं जग
टॉमी सिंगला जेलमध्ये ठेवलंय. त्याच्यावर ड्रग्सचा पार्टीत वापर केल्याचा आरोप आहे. तो पाणी पिण्यासाठी हवालदाराला मागतो. पाणी दिलं जात नाही. तो नेहमीप्रमाणे शिव्या देतो. तिथं असणारा असिस्टंट इन्स्पेक्टर त्याला चार थोबाडीत मारून दुसऱ्या कोठडीत ठेवतो जिथे आधीच सर्व वयोगटातले कैदी असतात. त्यात दोन नुकतेच कॉलेजला जाणारे पोरं असतात जे त्याचे आठवीत असल्यापासून चाहते असतात. ते का कोठडीत बंद आहेत ते लगेच एका म्हाताऱ्याच्या तोंडून कळतं. त्यांनी ड्रग्ससाठी आईचा खून केलेला असतो. ते ऐकून टॉमी एकदम विस्मयचकित होतो. आपण ड्रग्स घेऊन जी गाणी बनवतो त्याचे काय परिणाम समाजावर झालेत याचा वास्तववादी आविष्कार त्याला सहन होत नाही. तो त्यांना तोंड द्यायचं टाळतो. उडता पंजाब सिनेमातला हा सर्वातसुंदर व संस्मरणीय प्रसंग आहे. कथानकात पुढे येणाऱ्या घटनांची चुणूक तो दाखवतो. दुर्दैवाने सिनेमात असे प्रसंग नाहीत पण एकूण परिणाम मात्र सुन्न करणारा. रात्रीच्या अंधारात पाकिस्तान-भारताच्या सीमारेषेजवळ तिघे जण येतात. त्यात शमशेर नावाचा एक जण जो थाळीफेकमधला खेळाडू असतो तो एक पाकीट थाळी फेकण्याच्या शैलीत भारताच्या दि...