उडता पंजाब : बल्लीचं जग
टॉमी सिंगला जेलमध्ये ठेवलंय. त्याच्यावर ड्रग्सचा पार्टीत वापर केल्याचा आरोप
आहे. तो पाणी पिण्यासाठी हवालदाराला मागतो. पाणी दिलं जात नाही. तो नेहमीप्रमाणे शिव्या देतो. तिथं असणारा असिस्टंट इन्स्पेक्टर त्याला चार
थोबाडीत मारून दुसऱ्या कोठडीत ठेवतो जिथे आधीच सर्व वयोगटातले कैदी असतात. त्यात
दोन नुकतेच कॉलेजला जाणारे पोरं असतात जे त्याचे आठवीत असल्यापासून चाहते असतात.
ते का कोठडीत बंद आहेत ते लगेच एका म्हाताऱ्याच्या तोंडून कळतं. त्यांनी
ड्रग्ससाठी आईचा खून केलेला असतो. ते ऐकून टॉमी एकदम विस्मयचकित होतो. आपण ड्रग्स
घेऊन जी गाणी बनवतो त्याचे काय परिणाम समाजावर झालेत याचा वास्तववादी आविष्कार
त्याला सहन होत नाही. तो त्यांना तोंड द्यायचं टाळतो. उडता पंजाब सिनेमातला हा
सर्वातसुंदर व संस्मरणीय प्रसंग आहे. कथानकात पुढे येणाऱ्या घटनांची चुणूक तो
दाखवतो. दुर्दैवाने सिनेमात असे प्रसंग नाहीत पण एकूण परिणाम मात्र सुन्न करणारा.
रात्रीच्या अंधारात पाकिस्तान-भारताच्या सीमारेषेजवळ तिघे जण येतात. त्यात
शमशेर नावाचा एक जण जो थाळीफेकमधला खेळाडू असतो तो एक पाकीट थाळी फेकण्याच्या
शैलीत भारताच्या दिशेने फेकतो. तिथे असणारी एक बिहारी तरुणी (आलिया भट) जी तिथेच
काम करत असते तिला ते मिळतं. तिकडे टॉमी सिंग (शाहीद कपूर) त्याच्या कॉन्सर्टच्या
तयारीत असतो तर सरताज सिंग (दिलजीत दोसांज) हा पोलीस इन्स्पेक्टर ड्युटी करताना
बऱ्याच ड्रग्सच्या टोळ्यांना पकडत असतो पण त्याचा हिश्यासहित. प्रीत सहानी (करिना
कपूर खान) ही डॉक्टर कम सोशल वर्कर तरुणांनी ड्रग्सपासून दूर राहावं म्हणून
परिसरात कार्य करत असते. सोबत स्वतःच्या क्लिनिकमध्ये त्यांच्यावर ट्रीटमेंट करून त्यांचं
पुनर्वसन करत असते. अशा एकूण चार वेगवेगळ्या कथांच्या धाग्यांनी कथानकाचा ढाचा
तयार होतो.
पटकथाकार-दिग्दर्शक अभिषेक चौबे व सह-पटकथाकार सुदीप शर्मा
यांचे पहिल्यांदा अभिनंदन करायला हवे ते इतका ज्वलंत विषय इतक्या सफाईदारपणे हाताळला
यासाठी. समकालीन सामाजिक विषय हाताळताना त्याची कुठली बाजू घ्यायची, कुठली सोडायची,
इतर महत्वाच्या घटकांचं काय करायचं, लक्ष कुठे केंद्रित करायचं वगैरे बाबी ह्या
संहितेच्या पातळीवरच ठरवायला हव्यात ज्या इथे दिग्दर्शक-पटकथाकार योग्यपणे करतात.
त्यांचा विचार स्पष्ट आहे. आपल्याला एक कथा मांडायची आहे. त्यातनं कुठलाही संदेश
वगैरे द्यायचा नाही. प्रेक्षकांनी जे दाखवलय त्यावर विश्वास ठेवून त्यांच्यापुरता अर्थ
काढावा. त्यामुळे ते कथेतील तपशीलवार भर देतात. अशा गंभीर विषयात रिसर्च मोठ्या
प्रमाणावर करावा लागतो. मिळालेल्या माहितीचा कथानकासाठी योग्य तोच वापर करावा
लागतो इथे दिग्दर्शकाची टीम शंभर टक्के काम करते.
त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षक खुर्चीला खिळून
राहतात ते यामुळेच. अशा पद्धतीचं काम जॉन मथ्यू मठाननी सरफरोशमध्ये केलं होतं.
क्रॉस बॉर्डर टेररीझमचे काय परिणाम झालेत व ते संपवण्यासाठी काय करता येईल यावर भर
दिला होता. दोन्हीत पाकिस्तान सामाईक हा पण एक योगायोग. नक्कीच नाही कारण दोन्ही
गोष्टींना खाद्य पुरवण्यासाठी पाकिस्तानकडून नेहमीच भरपूर प्रमाणात प्रोत्साहन
देण्यात येतं हे उघड सत्य आहे. तसेच त्याला भारतातल्या क्षुद्र मानसिकतेचं सहकार्य
असल्यामुळे ड्रग्स व दहशतवादाचे अक्राळविक्राळ परिणाम दिसून येत आहेत.
दिग्दर्शक अभिषेक चौबेंचा हा तिसरा सिनेमा पहिल्या दोन
सिनेमांपेक्षा वेगळा ठरतो ते त्यांनी याकडे वास्तववादी स्वरुपात सादर करायचं हा
हेतू ठेवून केल्यामुळे. सामाजिक समस्या हाताळताना विषयाचं गांभीर्य ते जपतातच सोबत
त्यांची ट्रेडमार्क शैली असणाऱ्या डार्क कॉमेडीचा वापर छान पणे करतात. ईश्कीया व
देढ ईश्कीयामध्ये व्यावसायिक मूल्यांना महत्व होतं. इथे ते वास्तववादाला महत्व
देतात ते किती तर आलिया भटचं पात्र शेवटपर्यंत तिचं नाव काय आहे ते सांगत नाही.
प्रत्येक पात्राची माहिती संवादातून कळते. दिग्दर्शक कथा सांगायला महत्व देत
असल्यामुळे प्रेक्षकांना माहिती मिळेल की नाही या फंद्यात ते पडत नाही. हेच
प्रेक्षकांच्या पथ्यावर पडतं.
सर्वच कलाकारांचा उत्तम अभिनय सिनेमाचा प्रभाव वाढायला कारणीभूत
ठरतं. खासकरून आलिया भटची बिहारीण अप्रतिमच. तीच सिनेमाची नायक वाटते इतका उत्तम
अभिनय तिने केला आहे. वयाच्या या टप्प्यावर अशी भूमिका मिळणे आणि ती योग्यपणे
निभावणे हिंदी सिनेमात कमी प्रमाणात बघायला मिळतं. अशीच चुणूक तिची मोठी बहिण
पूजाने सुद्धा डॅडी व दिल है की मानता नहीं मध्ये दाखवली होती. दुर्दैवाने नंतरची
तिची कामगिरी फुलली नाही. आलियाचं तसं होऊ नये यासाठी तिने पटकथांची निवड अचूकपणे
करावी ही अपेक्षा. करिना कपूर खान, दिलजीत दोसांज, शाहीद कपूर, सतीश कौशिक व इतर योग्य
साथ देतात.
सामाजिक समस्या कथेतून कशी हाताळावी याचा वस्तुपाठ या
सिनेमाने घालून दिला आहे. खासकरून मराठी सिनेमांनी यातनं खूप घेण्यासारखं आहे.
काही अपवाद वगळले तर सामाजिक समस्येवरील सिनेमे म्हणजे ‘चाय पे चर्चा अन् तोंडाची
वाफ’ असेच असतात. अनुराग कश्यप व अभिषेक चौबेंची चोखाळलेली वाट इतरांनी पण
चोखाळावी अशी आशा आहे.





Comments