ती३न : रहस्याच्या पलीकडे

खलनायक कसा असावा याचे काही ठोकताळे ठरलेले आहेत. त्याने फक्त आणि फक्त खलनायकी कृत्ये करायची, नायकाला एकांगी त्रास द्यायचा, त्यासाठी वाट्टेल त्या थराला जायचं हे पण ठरलेलं. त्यामुळे हिंदी व्यावसायिक सिनेमात खलनायक हे नेहमीच कृत्रिम, ठोकळेबाज राहिलेले आहेत. नायकांना बऱ्यापैकी वास्तववादी, जिवंत, त्रिमिती आकार देण्याचे प्रयत्न केले गेले आहेत पण खलनायक आजही त्याच त्याच पद्धतीने लिहिले जातात. ती३नमधील खलनायक हा रूढार्थाने खलनायक नाही तर त्याच्या कृत्याला एक ठोस कारणमीमांसा आहे. जी आजच्या सामाजिक परिस्थितीशी निगडीत आहे. पण दिग्दर्शकाने एकूण त्याचा वावर खलनायकासारखा ठेवल्यामुळे व शेवटाकडे त्याचं रहस्योद्घाटन केल्यामुळे तो सामान्य पातळीवर राहिला आहे.

दाढीचे खुंट वाढलेले जॉन बिस्वास (अमिताभ बच्चन) हे कोलकात्याच्या पोलीस स्टेशनमध्ये दररोजच्या शिरस्त्याप्रमाणे त्यांच्या अंजेला रॉय या नातीच्या आठ वर्षांपूर्वीच्या अपहरण व खूनाच्या केसचं काय झालं विचारण्यासाठी बसलेत. सरिता सरकार (विद्या बालन) ही पोलीस अधिकारी त्यांच्या दररोज येण्याला कंटाळली आहे. ती त्यांना आठ वर्षांपूर्वी झालेल्या घटनेला विसरून जाऊन उर्वरित आयुष्य बायकोसोबत आनंदात व्यथित करा असा सल्ला देते. पूर्वाश्रमीचा इन्स्पेक्टर असणारा पण आता फादर मार्टिन झालेला मार्टिन दास (नवाजुद्दिन सिद्दीकी) जॉनला मदत करायचा नकार देतो. एके दुपारी भाजी खरेदी करत असताना जॉनला एक छोटी मुलगी तीच टोपी घातलेली दिसते जी त्यांच्या नातीने अपहरणाच्या दिवशी घातलेली असते. आठ वर्षांनंतर सापडलेला हा धागा आपल्याला अपहरणकर्त्यापर्यंत घेऊन जाईल या इर्षेने जॉन त्या मुलीचा पाठलाग करायला लागतात.

ती३न हा कोरिअन सिनेमा मोंताजचा अधिकृत रिमेक आहे असं श्रेयनामावलीच्या सुरुवातीलाच सांगितलं जातं जे की योग्यच आहे. अधिकृत परवानगी न घेता सरसकट भ्रष्ट नक्कल करायची यापेक्षा आपल्या सामाजिक, सांस्कृतिक वातावरणात कथानक कसं घडवता येईल याचा विचार करून अधिकृत रिमेक करणं कधीही चांगलच. यासाठी निर्माता सुजॉय घोष यांचे आभार मानावयास हवेत. दिग्दर्शक रीभू दासगुप्त व पटकथाकार सुरेश नायर, रितेश शाह, बिजेश जयराजन यांनी मात्र त्याला भारतीय साज चढवताना इथल्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीचा चांगला वापर केला आहे.

विकीपेडियानुसार मूळ सिनेमात एक आई, एक आजोबा व एक खाजगी गुप्तहेर असा त्रिकुट आहे. घटना पंधरा वर्षांपूर्वी घडलेली आहे. इथे घटना आठ वर्षांपूर्वी घडलीय. गुप्तहेराच्याऐवजी इन्स्पेक्टर आहे. तर तिथे आई आहे जी इथे गायब आहे. त्या ऐवजी अपहरणकर्ता आहे जो तिसऱ्या व्यक्तिरेखेसारखा आहे पण तुल्यबळ नाही किंवा त्याच्या व्यक्तिरेखेला इतरांसारखं निवेदनाच्या दृष्टीकोनातून महत्व दिलं जात नाही. त्याचं थोड्या अंतरावर असणंच काही एक प्रमाणात कथानकाची बाजू कमकुवत करतं. कमकुवतचा अर्थ निवेदनात त्याला दिलेलं दुय्यमत्व त्याचं व्यक्तिचित्रण ठोकळेबाज होण्यात झालं आहे असा आहे. इतर सर्व बाबतीत मात्र दिग्दर्शक व टीमला पैकीच्या पैकी मार्क्स द्यायला हवेत. तर्कसुसंगत पटकथा, त्याला दिलेली उत्तम संकलन व चित्रणाची जोड यामुळे सिनेमा खिळवून ठेवतो.

प्रेक्षकांना दोन समांतरपणे चालणारे निवेदनं कदाचित संभ्रमात पाडायला लावतील पण याने फार फरक पडणार नाही. उलट अशा पद्धतीने निवेदन केल्यामुळे कुणा एका पात्राच्या दृष्टीकोनातून कथानक पुढे सरकण्याऐवजी प्रेक्षकांसमोरच सर्व घडत असल्यामुळे तो सर्वसाक्षी होईल. यासाठी फ्लॅशबॅक तंत्राचा वापर वाखाणण्यासारखा.

तरीही वर म्हटल्याप्रमाणे खलनायक हा सुद्धा ज्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीतून आला आहे याचं भान दिग्दर्शक पटकथाकारांनी ठेवलं असतं तर तो निश्चित वेगळा ठरला असता कारण जॉन या नायकाचं वागणं संदिग्ध आहे. त्याचं कृत्य सकृतदर्शनी योग्य वाटत असलं तरी थोडा विचार केल्यावर ते त्याच्या मानसिकतेला छेद देतं. सबळ पुरावा असल्याशिवाय कुठलीही व्यक्ती ही अपराधी ठरत नाही हे कायदेशीर सूत्र त्याच्या मदतीला येतं त्यामुळे त्याचं वागणं गुलदस्त्यात राहतं.

अमिताभ बच्चन, विद्या बालन, नवाजुद्दिन सिद्धीकी व सब्यासाची चक्रबर्ती यांचं एकाच पातळीवरचं काम सिनेमाला पूरक. अमिताभ खांदा पडलेला, मणक्यात बाक आलेला, आपल्या एका चुकीमुळे नातीच्या खुनाला कारणीभूत ठरलेला, तिच्या खुनाचा सूड घ्यायचा याने पेटून उठलेला आजोबा अप्रतिमपणे साकारतात. या वयात सुद्धा त्यांच्यासाठी व्यक्तिरेखा लिहिल्या जातात हे हिंदी सिनेमासाठी चांगलं लक्षण आहे.

एकुणात एक चांगला रहस्यपट त्याच्या सामाजिक व मानवी बाजूला समोर आणतो जो नेहमीच्या रहस्यपटांपासून त्याला वेगळा ठेवतो.

Comments