हॅप्पी भाग जायेगी: हॅप्पी सियाप्पा

एसीपी उस्मान आफ्रिदीला हॅप्पीला शोधण्यासाठी सांगण्यात आलंय. तो हाताखालच्या लोकांना सांगतोय की लाहोर शहरात कसं कसं तिला शोधायचं. ते सांगता सांगता तो म्हणतो ज्यांना यात भाग घ्यायचा नाही त्यांनी एक पाऊल मागे जावं. एक पोलीस कॉन्स्टेबल पाठीमागे पाय टाकतो तर तो अधांतरी राहतो कारण ते पोलीस स्टेशनच्या गच्चीवर असतात. प्रसंग छोटासाच पण प्रचंड हसवणारा व लक्षात राहणारा. दुर्दैवाने मुदस्सर अझीझ लिखीत व दिग्दर्शित हॅप्पी भाग जायेगीमधला हा प्रसंग एकमेव असा राहतो. असे चांगले प्रसंग नंतर व त्या आधी बघायला मिळत नाहीत.

हरप्रीत कौर उर्फ हॅप्पी (डायना पेंटी) तिच्याच लग्नामधून पळून जाते. ती ज्या ट्रकमध्ये आसरा घेते तो बिलाल अहमदचा (अभय देओल) असतो. तिला जाणीव होते तेव्हा ती लाहोरमध्ये त्याच्या घरी असते. इकडे भारतात अमृतसरमध्ये तिचा होणारा नवरा दमण सिंग बग्गा (जिमी शेरगील), प्रियकर गुरदीप उर्फ गुड्डू (अली फैझल) व वडील (कंवलजीत सिंग) तिला शोधण्यासाठी पंजाब पालथा घालत असतात. बिलालला जेव्हा कळतं की हॅप्पी चुकून त्याच्या ट्रकमध्ये आलीय तेव्हा तो तिला वापस भारतात पाठवण्याची तयारी करायला लागतो. यासाठी त्याला मदत मिळते ती एसीपी उस्मान आफ्रिदीची (पियुष मिश्रा). पण घरच्या आघाडीवर होणारी नवरी झोया (मोमल शेख) व पाकिस्तानचा जीना होण्यासाठी स्वप्न पाहणाऱ्या वडिलांचा (जावेद शेख) अडथळा त्याला पार करायचा असतो.

दिग्दर्शक मुदस्सर अझीझ हेच सिनेमाचे लेखक आहेत त्यामुळे त्यांना काय सांगायचं आहे हे सुस्पष्ट आहे. व्यक्तिरेखा, त्यातील तपशील ते योग्यपणे हाताळतात. यातील गुड्डू, बग्गा, बिलाल, झोया या स्वतंत्र व्यक्तिरेखा आहेत. त्यांना स्वतःचे अस्तित्व आहे. त्यामुळे त्या जिवंत होतात. या सर्वांच्या केंद्रस्थानी हॅप्पी आहे. तिच्यामुळे कथानक घडते तरीही वरील व्यक्तिरेखांना कथानकाच्या अवकाशात स्थान मिळतं. 

तरीही पटकथेत दोष आहेत. ती म्हणावी तशी गतिमान नाही. काही काही ठिकाणी पुढे काय घडेल याचा संभ्रम पटकथाकाराला पडला असावा कारण कथेची गती कमी झाल्यासारखी होते. तसेच हॅप्पीमुळे सर्व काही घडत असताना ती मधेच गायब होते. कथेचा फोकस बिलालच्या आयुष्यावर स्थिरावतो तेव्हा पटकथा तिथे रेंगाळते. गुड्डू व बग्गाच्या व्यक्तिरेखेवर अन्याय झालंय असं वाटायला लागतं. कदाचित अभय देओलच्या प्रतिमेचा इथे विचार केला गेला असावा. काही काही प्रसंगात दिग्दर्शकाचा नवखेपणा जाणवतो.

आनंद एल. राय निर्मिती असणाऱ्या सिनेमाचं वैशिष्ट असतं स्थानिक भाषेचा उत्तम वापर. हा सिनेमा सुद्धा त्याला अपवाद नाही. इथे पंजाबी, उर्दू, व हिंदीचा चांगला वापर केला आहे. काही महिन्यांपूर्वी आलेल्या नील बटे सन्नाटामध्ये आग्रामध्ये बोलल्या जाणाऱ्या हिंदीचा छान उपयोग केला होता. तीच गोष्ट तनु वेड्स मनू रिटर्न्सची. तिथे हरयाणवी भाषेचा वापर केला होता. 

स्थानिक भाषेला कथेच्या केंद्रस्थानी आणल्यामुळे नेहमीच्या बम्बैय्या हिंदीमुळे आलेल्या एकसुरी व कृत्रिमपणावर चांगला उतारा मिळतो. हेच सिनेमे नाही तर गेल्या काही वर्षात भाषेचा लहेजा असणारे असंख्य सिनेमे हिंदीत येत आहेत ही चांगली गोष्ट आहे. भाषेचा असा वापर केल्यामुळे आपसूक कथेला स्थानिक संस्कृतीचा मुलामा मिळतो जो सिनेमाला बांधून ठेवायला उपयोगी पडतो. लहान शहरातून आलेल्या लेखक-दिग्दर्शकांमुळे कधी नव्हे ते हिंदीत असे वैविध्य बघायला मिळत आहे.

सर्वच कलाकारांचा उत्तम अभिनय ही जमेची बाजू. या सिनेमाचे दोन नायक म्हणावेत इतका छान अभिनय पियुष मिश्रा व जिमी शेरगील यांनी केला आहे. मिश्रांचा पाकिस्तानी एसीपी तर लव्हेबल आहे. तो जितका आपल्या देशाबद्दल कडवा आहे तितकाच आपल्या नेत्याला तोंडघशी न पाडण्यासाठी तत्पर आहे. मिश्रांचं उर्दू तर खास त्यांच्याच तोंडून ऐकण्यासारखं आहे. तीच गोष्ट जिमी शेरगीलची. कॉर्पोरेटर ते आमदार होण्याचं स्वप्न बघणारा व त्यासाठी हॅप्पीचा वापर करणारा स्वार्थी राजकारणी तो लीलया पेलतो.

भारत-पाकिस्तान हे दोन ज्वलंत विषय कथेच्या केंद्रस्थानी असले तरी त्याकडे विनोदी दृष्टीकोनातून बघणारा हा सिनेमा निखळ मनोरंजनाची पुरेपूर हमी देतो. एकदा बघायला काहीच हरकत नाही.

रेटिंग ३/५

Comments