लई लवकर एक्झिट घेतलीत सर...

शिरीष निर्मळे
एका सामाईक मित्रामुळे आपली ओळख झाली. तेव्हा तुम्ही तुमच्या नेक्स्ट जनरेशन मासिकाचे काम करत होतात. आपला सामाईक मित्र संपादक होता. आपल्या अंका तर्फे आपण अन्वयार्थ दिवाळी अंक काढण्याच्या बेतात होतात. मी म्हटलं विशिष्ट विषयाला अंक वाहिल्यापेक्षा आपण दरवर्षी दिवाळी जसे वाचतो तसा एखादा अंक लातुरातनं काढावा अशी कल्पना मांडली. तुम्ही व मित्राने लगेच ती उचलून धरली. त्याला येणारा खर्च वगैरे बाबी ठरल्यावर कामही सुरु झालं. अंकासाठी जाहिराती तुम्हीच गोळा करणार होतात. तुमचं ते क्षेत्रच म्हणा. जाहिरात व्यवस्थापक म्हणून काम करत असल्यामुळे जाहिरातींबाबत आम्ही निश्चिंत होतो. फक्त अंकात काय, असावं काय असू नये याबद्दलच चर्चा व्हायच्या. तुम्ही आम्हाला पूर्ण स्वातंत्र दिलं होतं त्यामुळं आम्ही पण जोशाने कामाला लागलो. अंकाचं काम दररोज नाहीतर किमान एक दिवसा आड तरी कुठपर्यंत आलंय हे सांगण्याचं बंधन मात्र होतं. त्यामुळे बऱ्याचदा चहाच्या निमित्ताने किंवा तुमच्या दुकान कम ऑफिसात आपण बसत असू त्यावेळी अंका व्यतिरिक्त इतरही बाबींवर बोलणं व्हायचं. त्यात तुम्ही एक फ्लॅट बुक केलय व लवकरच तिथे राहायला जाऊ असं म्हणालात. मला यशोदाजवळ कुठेतरी ती साईट आहे जिथे एका सोसायटीचं कामपण चालू हे पण आपण बालाजी मंदिरकडून येताना दाखवलं होतं.

एकीकडे वडील आजारी असल्यामुळे जवळपास दररोज दवाखान्यात जाण्याचा प्रसंग यायचा. तुम्ही न चुकता विचारपूस करायचात. एकदा तर कुठलातरी प्रसाद वडिलांसाठी दिला होतात. खरंतर माझ्या वडिलांची व तुमची कधी ओळख होऊ शकली नाही. पण निव्वळ एक व्यक्ती आजारी आहे तर त्याची आत्मीयतेने विचारपूस करणं आपलं कर्तव्य आहे या भावनेनं तुम्ही विचारायचात. तेव्हा खूप बरं वाटायचं. त्यामुळे कामात दिरंगाई व्हायची पण तुम्ही कधी रागावल्याचं किंवा वेळेवर न आल्याबद्दल कानउघाडणी केल्याचं आठवत नाही. उलट समजूतदारपणे काम उपलब्ध वेळेत कसं तडीस नेता येईल याबद्दल बोलायचात. तुम्हाला बीपी-शुगरचा त्रास आहे हे त्या मित्राने आधीच सांगितले होतं. सकाळी लवकर नाश्ता वगैरे करून तुम्हाला बीपीची गोळी घ्यावी लागतं असे असं ऐकलेलं. मग दिवसभर फिरतीचं काम. तरीही तुमच्या चेहऱ्यावर कधी थकल्याचे किंवा वैतागलेले भाव दिसले नाहीत. उलट एखादं काम असेल तर उत्साहाने ते पूर्ण करायला तयार असायचात. लहान वयात हे अलंकार गळ्यात पडले असले तरी खंत ना चिंता बाळगता दिलेलं काम व्यवस्थितपणे पूर्ण करायचं तुमचं धोरण असायचं याचं मला नेहमीच कौतुक वाटायचं. आपलं वय वाढतंय असं नुकतंच तिशीला स्पर्श केलेले सतत तक्रार करतानाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही मात्र या सर्वांना लाजवत कामं करायचात.

अंकाच्या छापील प्रती हातात आल्यावर त्याच्या मुखपृष्ठ बघून जो आनंद दिसला होता ती अवर्णनीय होता. कायमचा स्मरणात राहणारा. त्यानंतर दहा-बारा दिवसांखाली आपली भेट झाली तेव्हा आहे ते दुकान अंबाजोगाई रोडवर शिफ्ट करायचा तुमचा मनसुबा होता. त्यानुसार गाळा शोधत होतात. या महिन्याच्या पाच तारखेपर्यंत कसेही करून गाळा मिळवून दुकान शिफ्ट करायचं ठरवलं होतं. तिथे एक छानसं जनरल स्टोअर्स थाटावं असं ठरवलं होतं. फ्लॅटचा ताबा मिळाला की उर्वरित आयुष्य इथेच घालवायचं तुमचं स्वप्न होतं. खरंतर तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे तरीही मला अहो-जाहो शिवाय कधी बोलला नाहीत. समोरच्याचं शांतपणे ऐकून घ्यायच्या तुमच्या स्वभावामुळे तुमच्यासोबत बोलताना कधीही अवघडलेपणा जाणवला नाही. तसेच एखादेवेळी फोनवर बोलणं झालं नाही किंवा कामात असल्यामुळे कॉल घेता आला नाही तर आवर्जून कॉल बॅक करायचात.

मराठवाडा नेता ०७-०९-२०१६
आमची शॉर्ट फिल्म स्मार्टफोन दाखवायचीच राहिली. यू ट्यूबची लिंक काही मिळणार नाही तर दुकानावरच येऊन पीसीवर फिल्म दाखवावी म्हणालात ते पण राहिलं. आपण पण एक शॉर्ट फिल्म करूयात अशी इच्छा व्यक्त केली होती. विषय मिळाला की लगेच सांगतो म्हटलो पण आता विषय जरी मिळाला तरी तुम्हीच नाही तर काय करायचं त्या विषयाचं. लातूर पॅटर्न वाचून आवडली असा अनुकूल अभिप्राय सुद्धा मनमोकळेपणाने दिलं होतं. खूप छान वाटलं तेव्हा.

काल सकाळी गोवंडे सरांनी फोन करून शिरीष निर्मळे गेले असं सांगितलं तेव्हा एक क्षण विश्वासच बसला नाही. बातमी वाचली. पंचेचाळीस हे असं मधेच अर्ध्या वाटेवरून निघून जायचं वय नाही. कितीतरी कामं राहिलीयत. यावर्षीच्या दिवाळी अंकाचं काम चालू केलं होतं. मला दोन-तीन लेख मिळवून देण्यासाठी अधिकारवाणीने सांगितलत. मी मिळवलेत पण तुम्हीच नाहीत म्हटल्यावर काय करायचं त्या लेखांचं. आपण बनवणाऱ्या शॉर्ट फिल्मचं काय ते कधी पूर्ण करणार! लई लवकर एक्झिट घेतलीत सर... लई लवकर एक्झिट घेतलीत...

Comments