घर
ऐंशीचं दशक संपण्याच्या दोन वर्षे आधी त्या गृहस्थांनी औरंगाबादसारख्या त्यावेळच्या शहरात सिडकोमध्ये प्लॉट विकत घेऊन घर बांधणं हे दिव्यच होतं. जुन्या औरंगाबादेत मुलांसहित काढल्यावर मध्यमवर्गीय मानसिकतेला अनुसरून त्यांनी सिडकोत घर बांधण्याचा निर्णय जाहीर केला तेव्हा घरात छोटासा भुकंपच झाला. कुठे तिकडे जाता, माणसं तोडायची आहेत का वगैरे बोलणं ऐकून ते घर बांधायच्या निर्णयावर ठाम राहिले.
त्यावेळी आजच्यासारखं बिल्डरला घर बांधायला देणं वगैरे नसल्यामुळे गवंड्याला हाताशी धरून घर बांधायला सुरुवात केली. त्याने त्याच्या स्वभावाला अनुसरून घर बांधलं ज्याची शाश्वती तो सुद्धा देऊ शकला नसता. त्यामुळे घरात जी आय पाईप्सचे जाळे, त्यावेळच्या पद्धतीचा किचन ओटा-सिंक, स्पंज केलेल्या भिंती, त्यांना सिमेंट कलर्स मारलेले, भिंती पुढील काळात पावसात ओल धरणाऱ्या, भिंतीत फळ्या असणारी कपाटं, छताला गिलावा नसणे, काचा बसवलेल्या/न बसवलेल्या लोखंडी खिडक्या अशा अवतारात एक बेडरूम, हॉल, किचनचं ते घर सिडकोत इतर तुरळक घरांबरोबर दिमाखात उभं राहिलं.
गृहस्थांना दोन मुले व दोन मुली. मुली नेहमीप्रमाणे दिल्या घरी सुखी राहिल्या. मुलांपैकी एकाने कसेतरी ग्रॅज्युएशन पूर्ण केले. नंतर नोकरीला लागला. दुसऱ्याने शिक्षण अर्धवट सोडले. गृहस्थांना मधल्या काळात अपघाताला सामोरे जावे लागले. त्यांना उर्वरित आयुष्य पलंगाला खिळून राहावे लागले. तर त्यांच्या पत्नीला वेड लागले होते. दोन नंबरच्या मुलाने आई-वडिलांची सेवा करायची म्हणून शिक्षण अर्धवट सोडलं होतं. (एवढं एकच कारण होतं असं नाही. तसेच बऱ्याच ब्राह्मण कुटुंबात एका तरी मुलाने शिक्षण सोडल्याचं नेहमीच दिसून आलंय. खासकरून लातूर जिल्ह्यातल्या कुटुंबात तरी निदान...)
दोघांचं लग्न झालं. नवीन आलेल्या सुना ह्या सुनांना साजेसं वागल्या. सासू-सासऱ्यांना होईल तितकं 'प्रेम' त्यांनी दिलं. त्यामुळे त्यांना आपण मुलांपासून कधी दूर गेलो हे कळलंच नाही. शेवटच्या दिवसात आपल्या दुसऱ्या मुलाचं काय होईल याची चिंता दोघांना लागून राहिली होती. शिक्षण नसल्यामुळे नोकरी नाही. नोकरी नाही म्हणून स्थिर उत्पन्न नाही. तरीही त्याचं लग्न झालंच. सुनांच्या अति प्रेमामुळे त्यांनी आनंदात शेवटचा श्वास घेतला.
सासू-सासरे असतानाच सुनांनी त्याच घरात दोन ब्लॉक्समध्ये आपापल्या चुली मांडल्या. चुली मांडल्या म्हणजेच त्यांच्यात विस्तव जायचा नाही. त्याचा परिणाम स्वरूप भावांमध्ये पण दुरावा आला. दुरावा असला तरी ते 'घर' मात्र दोन्ही कुटुंबांना एकत्र ठेवायला सामाईक दुवा ठरला कारण तीर्थरूपांची स्थावरजंगम मालमत्ता ही मुलांसाठीच असते यावर त्यांचा ठाम विश्वास होता. मोठ्या मुलाने आपल्या मुलांना या वातावरणात राहायला नको म्हणून शहरात दूरवर वळण रस्त्यालगत असणाऱ्या नवीन भागात नवीन घर बांधलं पण जुन्या घरात आपण राहत असलेल्या ब्लॉकमध्ये भाडेकरू ठेवले.
आई-वडील नसल्यामुळे आता त्या घराचं काय करायचं हे दोन्ही भाऊ व त्यांच्या धर्मपत्नींना कळत नव्हतं. स्थावरजंगम मालमत्तेची वाटणी करायची तर त्यांच्या बहिणींची पण परवानगी घेणं गरजेचं होतं. बहिणींना त्यांच्या प्रेमळ वागण्याची पूर्ण कल्पना होती. आपल्या भावजयी आपल्या आई-वडिलांशी किती किती प्रेमळ वागल्या याची त्यांनी याचि देही याचि डोळा प्रत्यय घेतला होता. त्यांनी समजूतदारपणा दाखवत वाटणीतला वाटा सोडला. आता दोघांना घराची कधी एकदा वाटणी होते याचे वेध लागले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली.
ऐंशीच्या दशकाच्या शेवटी बांधलेल्या त्या घराची किंमत तेव्हा किती होती याची माहिती मिळत नाही पण कॉंग्रेस सरकारच्या धाडसी निर्णयामुळे या देशाचे आर्थिक उदारीकरण झाले. त्याचे परिणाम दिसायला लागले. दोन्ही भावांनी घराची वाटणी करण्यासाठी घेतलेला निर्णय त्यांच्या पथ्यावर पडला. घराला गिऱ्हाईक शोधायला लागले. शोधकार्य संपलं. घसघशीत एक ते दीड कोटी किंमत देणारा गिऱ्हाईक मिळाला. किंमत अर्धी अर्धी वाटून घेतल्यावर ती कशी आणि कुठे ठेऊ हे सुरुवातीला त्यांना माहित नव्हतं. घर घेणाऱ्याने दुसऱ्या मुलाला घेऊन ते घर पाडून दोघात टोलेजंग बंगलो बांधुयात असा प्रस्ताव मांडला. मोठ्याने हाती आलेल्या पैशामुळे स्वखुशीने ताबा सोडला.
आता दुसरा कामाला लागला. त्याने व त्याच्या पत्नीने आजच्या काळाला साजेसं घर असावं यासाठी शहरातल्या सर्वात निष्णात बिल्डर्सकडून ते करवून घ्यावं असं ठरलं. तसेच त्याने मधल्या काळात स्वकर्तृत्वाने विकत घेतलेली ‘कार’ ठेवण्यासाठी तरी आलिशान घर बांधावे असे स्वप्न बघितले होते. ते आता प्रत्यक्षात उतरणार होते. त्यांनी कसूर केली नाही.
मध्यमवर्गीय एक मजली असणारे, भाडेकरू राहावेत म्हणून त्यात केलेली सोय असणारं ते घर पाडून तिथे दोन मजली टोलेजंग घर उभे राहिले. हिंदी सिनेमात दाखवतात तसे आतलं त्याचं स्वरूप ठेवलं. मुलींसाठी व जोडप्यासाठी स्वतंत्र बेडरूम्स. तिथपर्यंत जाता यावं म्हणून हॉलमधनं पायऱ्या बांधलेल्या. बेडरूम्स त्यांच्या रुचीला आवडणाऱ्या. किंग साईज बेड, वॉर्डरोब, चिल्ड्रन बेड सिनेमात दाखवतात तसे डेकोरेट केलेले. सेल्फी किड्स असणाऱ्या मुली इंग्रजी माध्यमात शिकतात त्यामुळे त्यांच्या लेव्हलला योग्य असावं असं वातावरण ठेवलेलं. आर्थिक स्थरात वर जाण्यासाठी इंग्रजी माध्यमात जायलाच हवे असे त्या जोडप्याला वाटते. त्यांची मराठी माध्यमात झालेली ज्ञानाची परवड मुलींना इंग्रजी माध्यमात घालून भरून काढायची हा शुद्ध हेतू.
जुन्या घरात प्रत्येक ब्लॉकमध्ये सर्वांसाठी एकच संडास असायचा इथे दोन्ही बेडरूम्समध्ये अॅटॅच्ड बाथरूम कम कमोड्स असणारे टॉयलेट्स. दोन्हीकडे छतापासून फरशीपर्यंत विशिष्ट रंगसंगती असणारे टाईल्स, जग्वार बाथ फिटिंग्ज, पाहुण्यांना सुद्धा इंडिअन पद्धतीचं वेगळं स्वतंत्र संडास-बाथरूम, वॉश बेसिन एकदम झकपक. जुन्या घरात नसलेल्या वॉश बेसिनचं पुरेपूर उट्टं काढायचा हा हेतू. देवासाठी वेगळी स्वतंत्र रूम जिथे देवावरच्या सर्व श्रद्धा स्वतंत्रपणे जपता याव्यात. हॉलमध्ये व इतरत्र फाल्स सीलिंग्जचं सुशोभीकरण. भिंतीवर सपाट टीव्ही टांगण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था. त्याच्या पाठीमागे विशिष्ट डिझाईन असणारं वरतून खालपर्यंत वॉलपेपर, प्रत्येक खोलीत फर्निचर केलेलं, स्वैपाकघरात पांढऱ्या संगमरवराचा ओटा, त्याच्या एका कोपऱ्यात स्टीलचं सिंक, निर्जंतुक स्वच्छ पाणी मिळावे म्हणून वॉटर फिल्टर मशीन बसवलेली, ओट्याखाली मोड्युलर किचन ट्रॉलीज, काचेचा डायनिंग टेबल, त्यावर चांदीचं तुपाचं तांमलं असा जंगी मामला. घराच्या खाली कारसाठी पार्किंगची व्यवस्था.
जुन्या कळकट वाटणाऱ्या मध्यमवर्गीय घराची आठवण सुद्धा येऊ नये याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली.
जुन्या घरात बरेच दोष होते. पण वातावरण खेळीमेळीचे होते. प्रेमळपणा होता. छोट्या छोट्या गोष्टी शेअर करण्याची मुभा होती. प्रत्येक गोष्ट पैशाच्या हिशोबात न मोजण्याची खास मध्यमवर्गीय मिजास होती. सर्वांनी एकत्र राहायला हवे या पिढीजात संस्कारावर गृहस्थांचा व त्यांच्या पत्नीचा विश्वास होता. त्यासाठी सणवार, व्रतवैकल्ये एकत्रितपणे करायला हवीत याचा अट्टाहास होता. पाहुणे आले तर त्यांनी कुठं झोपावे याची चिंता कुणालाही नव्हती. कारण रात्री एकत्र हसतखेळत गप्पागोष्टी करत झोपणे हा शिरस्ता होता. उन्हाळ्यात गच्चीवर झोपणे घरातील चिल्ल्यापिल्यांना खूप आवडते म्हणून त्यांच्यावर बंधन आणली जात नसायची. सकाळी उन्हं अंगावर घेत उशिरा उठण्यातली गंमत एकमजली मध्यमवर्गीय घरातच अनुभवता यायची. घरात किती वस्तू आहेत यापेक्षा किती माणसं घरात येतात जातात याचा हिशेब असायचा.
आज आर्थिकस्थरात वरच्या स्थानावर गेल्यामुळे बदललेली देहबोली व मग्रुरीतून आलेला कोडगेपणा मात्र त्यांच्यात कधी शिरला हे दुसऱ्याला व त्याच्या पत्नीला कधी कळलं नाही. झपाट्यानं बदलणाऱ्या त्या शहराच्या चेहऱ्यात त्यांचं घर दिमाखाने उभं आहे ते सर्वांना दिसण्यासाठी की इथे कधीकाळी एक जुनं टुमदार घर होतं ज्याला भूतकाळात गाडून टाकण्यात आलं आहे.
Comments