दंगल : गीताध्याय

गेल्या काही महिन्यांमध्ये ट्रेलरवरून सिनेमा कसा असेल याचे अंदाज सोशल मेडियावर मांडले की घमासान चर्चा वाचण्यात येते. निव्वळ ट्रेलरवरनं सिनेमाची यथायोग्यता तपासण्यात येऊ नये असं विरोधकांचं म्हणणं. पण सिनेमा प्रदर्शित झाल्यावर ट्रेलरवरून सिनेमा समजतो असं म्हणणाऱ्यांना तो तोंडघशी पाडत नाही. ट्रेलर उत्सुकता वाढवणारा व आशयाला समोर आणणारा असेल तर प्रेक्षक नक्कीच थिएटरमध्ये येणार. दंगलचं ट्रेलर प्रदर्शित व्हायला लागल्यावर तो चांगलाच असणार असे सकृतदर्शनी तरी वाटत होते. सिनेमा निराश करत नाही तर एक प्रेरणादायी कथा मांडतो.

हरियाणामधल्या बलाली इथल्या महावीर सिंग फोगाटला (आमीर खान) घरच्या अडचणींमुळे कुस्ती सोडून नोकरी करावी लागते पण त्याचं खेळाडू मन त्याला बसू देत नाही. आपल्याला मुलगा झाला तर तो देशाला सुवर्ण पदक मिळवून देईल या आशेवर तो असतो. त्याच्या दुर्दैवाने त्याला चारही मुलीच होतात. भारतीय रिवाजानुसार त्यांना रांधा, वाढा, उष्टी काढा यातच आयुष्य व्यथित करावं लागणार व आपलं स्वप्न भंगणार असं वाटत असतानाच समवयस्क मुलांनी दिलेल्या शिव्या न सहन होऊन गीता (झायरा वासिम, लहान व फातिमा सना शेख, मोठी) व बबिता (सुहानी भटनागर, लहान व सान्या मल्होत्रा, मोठी) त्या मुलांना कुस्ती सदृश मारतात. आपल्या मुली मुलांप्रमाणेच सक्षम आहेत याचा साक्षात्कार महावीरला होतो. मग सुरु होते उराशी बाळगलेल्या स्वप्नांशी त्याची व मुलींची दंगल.

या सिनेमाचं सर्वात उत्तम काय असेल तर आशयाला चपखलपणे शोभणारं त्याचं शीर्षक. त्याचे म्हणावे तितके अर्थ काढता येतात. दंगलचा अर्थ हिंदीत होतो कुस्ती स्पर्धा. पण इथे महावीरसाठी ती आयुष्याची स्पर्धा असते. मुलींसाठी स्वत्वाची दंगल. ऐरवी दंगल म्हटलं की येणारा रक्तरंजित अर्थ इथे दोन तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांसाठी जीवन मरणाचा प्रश्न ठरतो. उराशी बाळगलेलं स्वप्न क्षणार्धात नाहीसं व्हायला काहीही वेळ लागत नाही. प्रचंड उपसलेली मेहनत एका सेकंदात धराशाही होते. त्यामुळे महावीरने मुलींसाठी पुरुषप्रधान व्यवस्थेशी घेतलेली टक्कर त्याच्या खेळाला साजेशीस ठरते.

पटकथाकार-दिग्दर्शक नितेश तिवारी व त्यांचे सहकारी पियुष गुप्ता, श्रेयस जैन आणि निखील मेहरोत्रा यांची पटकथा महावीर, गीता व बबिता यांच्या नातेसंबंधांवर कथानक केंद्रित ठेवून इतर बऱ्याच गोष्टी त्याच्या आसपास दाखवतात. उदा. महावीरला मुलगाच व्हावा यासाठी संपूर्ण गावाने त्याला दिलेले मासलेवाईक सल्ले भारतीय समाजव्यवस्थेचं अप्रतिम दर्शन घडवतात. तर मुलींनी घेतलेली मेहनत व कुस्तीच्या प्राथमिक धड्यांपासून ते आंतरराष्ट्रीय स्पर्धा यांचे तपशीलवारपणे केलेले चित्रण खिळवून ठेवतात. आतापर्यंतच्या हिंदी सिनेमात खेळाविषयी तपशिलात घेतलेली मेहनत दिसून आली नाही. त्यामुळे पटकथाकार व दिग्दर्शक कौतुकास पात्र ठरतात. महावीर-गीता-बबिता जरी मुख्य पात्र असली तरी मुलींची आई (साक्षी तन्वर) व प्रशिक्षक कदम (गिरीश कुलकर्णी) यांना दुय्यम महत्व दिलं जातं. महावीर व त्याच्या बायकोचे जुजबी प्रसंग येतात तर प्रशिक्षक कदम खलनायक वाटावा असा उभा केला जातो. उलट वडील नसताना प्रशिक्षकाशी गीताचं नातं कसं होतं हे येणं गरजेचं होतं. त्यामुळे त्याचं ठोकळेबाज असणं खटकतं


सिनेमाचा हायलाईट आहे गीता-महावीरमध्ये होणारी दंगल. ही जितकी कथेच्या प्रकृतीला साजेशी आहे तशीच ती जुन्या-नव्याचा संघर्ष कसा असतो याचं उदाहरण म्हणून बघण्यासारखी आहे. महावीरचा जुन्या पद्धतीवर असणारा गाढ विश्वास तर गीताला नवीन पद्धतीनुसार स्पर्धा जिंकण्यासाठी आवश्यक वाटणारी तांत्रिकता आत्मसात करावी याचा अट्टाहास. त्याचे दृश्य परिणाम होतात जे गीताच्या कुस्तीकडे बघण्याच्या दृष्टीकोनाला छेदत जातात. इतर प्रसंगात गीता-नायोमीची स्पर्धा उत्कंठावर्धक झालीय.

तांत्रिक विभागात सरस कामगिरी करणारा हा सिनेमा अभिनयात सुद्धा सरसच ठरतो. सर्वच अभिनेत्यांचा उत्तम अभिनय जमेची बाजू असली तरी आमीर खान त्याच्या नेहमीच्या पठडीतून बाहेर पडलाय असं वाटावं इतका समजूतदार अभिनय त्याने केलाय. एक तर वयाला साजेशी भूमिका त्याने निवडली यातच सर्व आलं. बाकी त्यासाठी शारीरिक-मानसिक मेहनत घेणे हे नेहमीचच. ही भूमिका त्याच्या कारकिर्दीचा कळसाध्याय आहे.

गीताध्याय असणारी ही दंगल न चुकवणं कधीही उत्तमच. 

Comments