पंचवीस वर्षे

घर
८५ ला घराचं बांधकाम चालू झालं. तेव्हा औसा रोडच्या परिसरात मोजकीच घरे होती. जुना औसा रोड लहान असल्यामुळे नवीन औसा रोड तयार केला होता. त्याच्या लगतच प्लॉट असल्यामुळे तिथेच घर बांधायला घेतलं वडिलांनी. पहिल्यांदा बोर घेतला. ३५ फुटांवर पाणी लागलं. इतक्या वरच्या पातळीवर पाणी लागल्यामुळे अजून खूप खोल जायची गरज नाही म्हणून फक्त ११० फुटांपर्यंत बोर घेण्यात आला. घराचं बांधकाम झाल्यावर त्याच्यावर मोटर बसवण्यात आली. बांधकाम पूर्ण झालं. चार खोल्या, संडास-बाथरूम इतकंच बांधलं होतं. तेव्हा लोड बेअरिंगचे बांधकाम करणं सर्रास व स्वस्त असायचं. आमचं घर पण तशाच पद्धतीने बांधलेलं होतं. दोन खोल्यांची जागा सोडून उर्वरित जागेत बांधण्यात आलं. ८६ साली वास्तुशांती करून गृहप्रवेश केला. आजूबाजूला घरांची संख्या कमी असल्यामुळे बोरचे प्रमाण सुद्धा कमी होते. त्यामुळे पाण्याचा उपसा कमी व उपलब्धता भरपूर होती.

सबमर्सिबल पंपसेट बसवलेली बोर
तेव्हा पाऊस मोठ्या प्रमाणात पडायचा. एल निनो व ला निनोचे परिणाम दिसायला अजून अवकाश होता. त्याचा फायदा उन्हाळ्यात बोरला पाणी राहण्यासाठी व्हायचा. आजूबाजूला घरांची संख्या हळूहळू वाढत होती तशी बोरची संख्या वाढत होती. ९२ च्या उन्हाळ्यापर्यंत पाण्याची उपलब्धता होती. त्यावर्षी फेब्रुवारीत मुंज झाली. मार्च की एप्रिलमध्ये बोरचं पाणी एकदम कमी झालं आणि नंतरच्या दिवसात गेलं. पाणी जाणे म्हणजे बोर चालू केल्यावर एक कळशी/घागर न भरणे. कॉलनीतल्या जवळजवळ सर्वांच्या बोरच पाणी कमी अधिक प्रमाणात कमी झालं होतं. हे असं पाणी कमी होणे किंवा जाणे अनपेक्षित होतं. उरलेले दोन-तीन महिने काढणे गरजेचं होतं. पाण्याची टंचाई वाढतेय म्हणून नगर परिषदेने आजूबाजूच्या कॉलनीत टँकर्सची सुविधा उपलब्ध करून दिली. अशोक लेलँड किंवा टाटाच्या ट्रक्सवर मोठा आयताकृती लोखंडी चौरस असायचा ज्यात पाणी असायचं. ट्रकची पाठीमागच्या बाजूला चौरसाच्या मधोमध तळालगत एका मोठं छिद्र पाडून त्याला समांतर एक मोठा पाईप जोडलेला असायचा. पाईपला दहा तोट्या लावलेल्या. घराजवळ असणाऱ्या मैदानात टँकर थांबणार. मग तीन-चार घर मिळून एक तोटी असं गणित करून नळांच्या तोट्यांची वाटणी व्हायची. मग त्या तोटीमागे घागर, हांडे, बादल्या एका ओळीत ठेवायच्या. एकाने तिथे थांबून सर्वांच्या घागरी भरून द्यायच्या. मग भरलेली घागर घेऊन घरी जायचं. तेव्हा घरात साठवण म्हणून जमिनीत हौद करायची पद्धत रूढ झाली नव्हती. त्यामुळे घागरी, बादल्या गच्चीवर असणाऱ्या हौदात ओतायच्या नाही तर बाथरूममध्ये लोखंडी बॅरलमध्ये भरून ठेवायचं. 

हा सिलसिला बरीच वर्ष चालला. पुढे चौरसाकृती टँकर जाऊन ट्रॅक्टरला जोडलेले टँकर्स आले. तोपर्यंत घरात एक छोटा हौद बनवून घेतलेला. त्यात पाणी साठवून टिल्लू मोटरने ते पाणी वर चढवायचं अशी कसरत करावी लागायची. घर एक मजलीच असल्यामुळे ही कसरत तशी बरी होती. मधल्या काळात पावसाचं प्रमाण कमीच राहिल्यामुळे टंचाईचा काळ तीन महिन्यांवरून पाच-सहा महिन्यांवर गेला. त्या काळात नगर परिषदेने औसा रोड व जुना औसा रोडच्या परिसरात प्रत्येक कॉलनीत विवक्षित ठिकाणी बोर घेऊन त्याच्याजवळ एक स्टँड पोस्ट बांधण्याचं ठरवलं होतं. गंमत म्हणजे बऱ्याच जणांनी री-बोर करून, बोरची खोली वाढवून, घरातच एखाद्या पाणक्याला आणून कुठल्यातरी एका कोपऱ्यात अजून एक बोर घेतले. तरी पाणी लागायचंच नाही. नगर परिषदेने शक्यतो गटारींच्या बाजूला घेतलेले बोर्स कधीही फेल गेले नाहीत (लातुरात अजून बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे.) मग कॉलनीतल्या लोकांनी पैसे खर्च करून एक पाईपलाईन टाकून घेऊन आपापल्या घरी कनेक्शन घ्यायचे. पाईपचा खर्च सोडला तर बाकी कुठलाच कर त्यावर नसायचा. मग कॉलनीतल्या एकाकडे चावी. बोर किती वाजता व वेळ चालवायचा याचे शेड्यूल ठरलेलं.

९३ साली जुन्या औसा रोडकडून आमच्या घराच्या बाजूने नगर परिषदेने भावी काळासाठी नळांच्या जोडण्या देण्यासाठी पाईपलाईन टाकली. ही पाईपलाईन विजय कॉलनीत असणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या मुख्य लाईनची होती. आमच्या कॉलनीत जो स्टॅन्ड पोस्ट होता तो बाजूच्या घराच्या कोपऱ्यावर होता. त्याची पाईपलाईन टाकलेली नव्हती तर सकाळी-संध्याकाळी बोरच्या बाजूला असणाऱ्या सिमेंटच्या उभ्या गोल टाकीत पाणी भरलं जायचं. खाली दोन तोटीचे नळ असायचे. त्याच्या एका तोटीला पाईप लावून त्याने हौद भरायचं. काही दिवसांनी तो स्टॅन्ड पोस्ट बंद पडला. मग घरासमोर असणाऱ्या शाहूपुरी कॉलनीच्या मैदानात असणाऱ्या बोरला पाईप लावायचं आलं. त्यासाठी शंभर फुट पाईप विकत आणला. त्या बोरला मात्र भरपूर पाणी असायचे. किमान दोन-तीन उन्हाळे त्यावर काढले. एके वर्षी एकाने बोरचा आवाज खूप येतो त्यामुळे त्रास होतोय अशी तक्रार करायला सुरुवात केली तेव्हा नाईलाजाने तिथनं पाणी घेणं बंद केलं.

२००२ पर्यंत टँकर घ्यायचं, एका उन्हाळ्यात पाठीमागची कॉलनीतल्या स्टॅन्ड पोस्टवरनं आमच्या कॉलनीत पाईपलाईन टाकून कनेक्शन्स दिले होते असेच चालले होते. पाणी घेण्याचे सर्व पर्याय त्या काळात करावे लागत होते. २००२ मध्ये वरच्या मजल्याचं बांधकाम काढण्यात आलं. त्यापूर्वी बारावीत असताना वर दोन खोल्या-संडास-बाथरूम बांधलं होतं. आता उरलेल्या जागेत इतर खोल्या काढून संपूर्ण मजला बांधून काढावं असं बिल्डरनं सुचवलं. त्याप्रमाणे उरलेल्या खोल्या बांधायला घेतल्या. छताच्या लेव्हलला बांधकाम आलं. बोरच पाणी एकदम कमी झालं. तीन खोल्यांचं बांधकाम अर्धवट सोडणं शक्य नव्हतं. तडकाफडकी एक मोठा हौद बांधायचा निर्णय झाला. साधारण ६५०० लिटरचा एक टँकर बसावा असा हौद बांधायचं ठरलं. घराच्या मुख्य दरवाज्याखालची जागा हौदासाठी खोदून घेतली. तोपर्यंत कॉलनीत व औसा रोड परिसरात घरात हौद असणे गरजेचं झालं होतं. मोठ्या प्रमाणात साठवण करण्यासाठी ते आवश्यकच झालं होतं. हौद बांधून पूर्ण झाला. आता घरात दोन हौद झाले. बांधकाम परत चालू झालं. बोरला पाणी नव्हतंच. पाणी विकत घेऊन वरचा मजला पूर्ण केला.

लाल वर्तुळात जलपुनर्भरणसाठी केलेले गच्चीवरची आउटलेट्स
बांधकाम करताना पुर्वेकडची बाजू काही इंचांनी उंच केली जेणेकरून गच्चीवर पडणारे पावसाचे पाणी एकाच बाजूला प्रवाहित होऊन खाली बोरच्या बाजूला जमा करता यावे. वरच्या मजल्याचं बांधकाम करण्याआधी दरवर्षी पाण्याची टंचाई सहन करून व नगर परिषदेने लोकांनी जलपुनर्भरण करून घेऊन पडणाऱ्या पावसातून पाण्याची पातळी वाढवावी अशी मोहीम चालू केली. बोरमधलं पाणी कमी होते किंवा जाते म्हणून बऱ्याच री-बोरिंगचा प्रयोग करून बोरची खोली वाढवून बघितली. नवीन बोर घेणाऱ्यांनी ५००-६०० फुटांपर्यंत बोर घेतले तरी पाणी लागत नव्हतं. पावसाळ्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी पडणे नित्याचं झालं होतं. तरीही लातूर नगर परिषदेने जलपुनर्भरण करण्यासाठी मोहीम हाती घेतली. वरच्या दोन खोल्या बांधण्याआधीच एका प्लंबरकडून जलपुनर्भरण करण्यासाठी छतावरून पाणी पडण्याचे जे आउटलेट्स होते ते एकत्र एकाच पाईपने खाली आणून बोरच्या बाजूला केलेल्या खड्यात सोडण्यात आले. संदीपान नावाचा ८५ साली घर बांधलेल्या व वरच्या दोन खोल्यांचं बांधकाम केलेल्या मिस्त्रीनेच बोरच्या बाजूला खड्डा करून त्यात पाण्याचं योग्य फिल्टर व्हावं म्हणून नगर परिषदेने निर्देशित केलेल्या पद्धतीने वाळू, दगड व इतर गोष्टींचा वापर करून तो खड्डा तयार केला. खड्डयाच्या तळाशी फिल्टर झालेलं पाणी व्यवस्थित बोरमध्ये पडावं म्हणून केसिंग पाईपला एक छिद्र करून पाईप जोडला.

आउटलेट्स एकाच पाईपद्वारे खालील खड्ड्यात सोडण्यात आले.
उर्वरित जागेचं बांधकाम करताना पूर्वेकडची बाजू काही इंचांनी वाढवल्याने गच्चीवरचं एकही थेंब न थांबता पश्चिमेकडच्या बाजूच्या दोन आउटलेट्स मधून त्याच खड्यात सोडण्यात आलं. यावेळी एक इंचचा पाईप वापरला. त्यामुळे पाणी कोणत्याही अडथळ्याविना बोरमध्ये पडायला लागलं. पाण्याचा थेंब ना थेंब वाचवण्यासाठी केलेला इतका आटापिटा पाहिजे तसा रिझल्ट देत नव्हता कारण पावसाळ्यात पाऊस पडण्याचं प्रमाण कधी अत्यल्प असायचं तरी कधी सरासरीच्या आसपास असायचं. त्यामुळे सातत्याने पाणी बोरमध्ये पडलंय असं झालं नाही. अवकाळी पावसाचं प्रमाण अत्यल्प असतं तरी त्याचं पाणी बोरमध्ये पडतच. तो बोनस असतो. त्याचा परिणाम फेब्रुवारी-मार्चमध्ये बोरचं पाणी कमी होण्यावर व्हायचा. मग पावसाळ्यापर्यंत टँकर घेणं क्रमप्राप्त असायचं. वरच्या मजल्याचं बांधकाम झालेलं असल्यामुळे वर दोन व खाली एक असे एकूण तीन भाडेकरू राहायला आले. पाण्याचा वापर वाढला. अनुक्रमे उपसा वाढला. परिणामस्वरूप पाणी कमी होण्यावर झाला. २०१४ साली ८६ साली बसवलेली बोर मशीन काढून सबमर्सिबल पंपसेट बसवण्यात आला. जिथे अर्धा कधी कधी एक तास गच्चीवरील टाकी भरायला लागायचा तिथे फक्त नऊ ते दहा मिनिटेच लागायला लागली. याच दरम्यान कुठल्यातरी वर्षी नगर परिषदेने नळांचे कनेक्शन्स द्यायला सुरुवात केली. पण मुळातच धरणात पाणी नसल्यामुळे ते पाणी कधी यायचं, कधी नाही.

जलपुनर्भरणसाठी केलेला खड्डा
२०१३ ते १५ पर्यंत सरासरी इतका सुद्धा पाऊस पडलाच नसल्यामुळे नंतर पाण्याचे हाल व्हायला लागले. ‘१५ च्या डिसेंबरमधेच बोरचं पाणी कमी झालं. जाने.’१६ पासून ते जुलैपर्यंत खऱ्या अर्थाने दुष्काळाचा सामना करावा लागला. डिसेंबरमध्ये ५०० रू. दर असणारा टँकर मेमध्ये १५०० रू. पर्यंत पोचला. १५०० रुपये देऊन सुद्धा पाणी मिळण्याची शाश्वती नव्हती. डिसेंबर ते जुलैपर्यंतचा टँकरचा खर्च ५०-६० हजार रुपयांच्या घरात गेला होता. आठ दिवसाला येणारे नळाचे पाणी अनिश्चित काळापर्यंत गेले होते. दरवर्षी पिण्याच्या पाण्याची गाडी व वापरायच्या पाण्याचा टँकर वेगळा घेणं ठरलेलंच होतं. मागच्या वर्षी मात्र टँकर व पाणी पिण्या योग्य सॉफ्ट करून (मात्र त्यावर ‘प्रक्रिया करून’ असं जाहिरातबाजी करून) विकणाऱ्यांची चांदी झाली. वार्षिक उत्पन्नापेक्षा अधिक पैसे त्यांनी चार-पाच महिन्यातच कमावले असतील. शहरात पाण्यावरून भांडणं झाली म्हणून कलम १४४ लावावं लागलं. सोबत रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची नामुष्की ओढवली.

पाऊस पडायला जुलै महिना उजाडला. जूनमध्ये शिंपडल्यासारखा पडणारा पाऊस जुलैमध्ये चांगला बरसला. सर्व नदी, नाले, धरण, शेततळे, विहिरी व बोरना पाणी आलं. तीन वर्षांचा ड्राय स्पेल भरून निघाला. ज्यांच्या शेतातील विहिरी तीन-चार वर्षांपासून कोरड्या होत्या त्यांना पुढची तीन वर्ष पाण्याची चिंता वाटणार नाही इतक्या तुडुंब भरल्या विहिरी. ज्यांच्या घरातले बोर नेहमीच कोरडे असायचे अशांना सुद्धा पाणी आलं.

२००० साली किंवा त्याआधी कधीतरी जलपुनर्भरण करावं म्हणून केलेल्या प्रयत्नांना यश आलं. नेहमीप्रमाणे बोरला पाणी आलं. अगदी केसिंग पाईपमध्ये बॅटरी धरली तर पाणी दिसेल इतकं पाणी आलं. बोरला पाणी येणं नेहमीचं असल्यामुळे यावर्षी किमान मार्चपर्यंत पाणी टिकेल हा अंदाज होता. पण मेच्या १९ तारखेपर्यंत पाणी टिकलं तीन भाडेकरू असून सुद्धा. त्या दिवशी या वर्षीचा पहिला टँकर घेतला. त्या नंतर दोनदा टँकर घ्यावा लागला. जूनच्या सुरुवातीलाच पाऊस पडल्यामुळे दोन-अडीच आठवडे बंद असलेला बोर चालू झाला. गेल्या पंचवीस वर्षात पहिल्यांदाच संपूर्ण उन्हाळा इतक्या कमी टॅंकरमध्ये गेला.

१९९२ ते २०१७ या पंचवीस वर्षात पाण्यासाठी खूप झगडल्यानंतर पुढील वर्षी हे तीनही टॅंकर घ्यायला लागू नये इतका पाऊस पडावा, बास!

Comments

Anonymous said…
छान लिहिले आहे। माझ्या पण जुन्या आठवणी ताज्या झाल्या। संदीप गोडसे।
Vivek Kulkarni said…
दोघांचेही आभार.