तिशीतील वर्ल्ड वाईड वेब

आज वर्ल्ड वाईड वेबचा तिसावा वाढदिवस. ८९ साली याची सुरुवात झाली. तेव्हा मी आठ वर्षांचा होतो. पुढे याच्याशी संपर्क आला तो ९८-९९ साली जेव्हा मी एनआयआयटीचा बेसिक कॉम्प्युटर कोर्स केला तेव्हा. त्यावेळी वर्ल्ड वाईड वेबला दहा वर्ष होत आले होते.  


Floppy Discs
माझा कॉम्प्युटरशी पहिल्यांदा संबंध आला तो केशवराज शाळेत असताना. तेव्हा शाळेने एक कॉम्प्युटर विकत घेतला होता. तिसऱ्या मजल्यावर एका खोलीत ठेवला होता. तो थंड राहावं म्हणून त्याला पडदानशीन केलं होतं. एका टेबलावर तो ठेवलेला असायचा. टीव्हीसारखा दिसणारा मोनोक्रोम मॉनिटर, त्याच्या खाली सीपीयू असायचा. सीपीयूमध्ये फ्लॉपी डिस्कस घालतात असं त्याला ऑपरेट करणाऱ्या माणसाने सांगितलं. संगणक साक्षरता वगैरे गोष्टींचं फॅड अजून सुरू व्हायचं होतं. मला मॉनिटरचं आकर्षण निर्माण झालं होतं. कारण त्यावरील प्रतिमा हलायच्या टीव्हीवरच्या प्रतिमांसारख्या सेम टू सेम. 

Prince of Persia
आम्हाला संगणक नावाचा एक एक्स्ट्रा विषय दिलेला होता. एके दिवशी आम्हाला त्यांनी ‘प्रिन्स ऑफ पर्शिया’ गेम खेळून दाखवला. मोनोक्रोम दिसणाऱ्या त्याच्या हलत्या आकृती बघून मी हरखून गेलो होतो. टीव्ही-सिनेमाचा पडदा सोडून हे वेगळच विश्व डोळ्यांसमोर होतं. गेम असे खेळतात हे पण पहिल्यांदाच समजलं. पुढे टीव्ही किंवा कॉम्प्युटरवर गेम्स खेळायला मिळाले. तोपर्यंत बैठे किंवा मैदानी खेळ खेळायची सवय होती. एमएस-डॉसची ओळख ही तिथेच झाली होती.  

त्यानंतर एनआयआयटीचा कोर्स केला. त्यात कॉम्प्युटरच्या फिजीकल स्ट्रक्चर ते त्यात कोणते कोणते सॉफ्टवेअर्स-ओएस असतात ते शिकवलं गेलं. सोबतच वर्ल्ड वाईड वेबची ओळख झाली. त्याचवेळी लातुरात इंटरनेटचं आगमन झालं होतं. एखाद-दोन सायबर कॅफेंची सुरूवात झाली होती. ८० रू./तास असं त्याचं स्वरूप होतं. पुढे ते कमी-कमी होत आता २० रू./तास झालंय. पण इंटरनेट ही काय चीज असते याची माहिती झाल्यावर एचटीएमएल, वेबसाईट डिझायनिंग वगैरे गोष्टी बेसिक नंतरच्या ऍडव्हान्स कोर्समध्ये शिकलो. ९९ ला ‘द मेट्रिक्स’ रिलीज झाला. इंटरनेट, वेबसाईट, प्रोग्रामर वगैरे गोष्टी संकल्पनेच्या स्वरूपातच माहिती होत्या त्यांना ह्या सिनेमाने आपल्या कल्पनेच्या पलीकडचं विश्व दाखवलं होतं. आपण घेत असलेलं ज्ञान व सिनेमातलं विश्व एकच आहे असा समज तेव्हा झालेला.

इंटरनेटचा वापर (रूढार्थाने) वाईट प्रकारे कसा करू शकतो हे औरंगाबादला कॉलेजच्या अभ्यास सहलीला गेलो होतो तेव्हा अनुभवलं. साल : ९९-२०००. पोर्न साईट्स पहिल्यांदा तिथल्या एका सायबर कॅफेत बघितल्या. त्यानंतर लातुरात आल्यावर यच्चयावत सर्व कॅफेजना भेट देऊन तिथं न्यूड फोटोज व व्हिडीओ क्लिप्स बघायची सवय लागली. सोबतच कॉम्प्युटरशी संबंधित मासिकं वाचायची सवय पण लागली. इथिकल हॅकिंगचा अंकित फादिया, हॉटमेलचा सबीर भाटीया, नॅपस्टरचा शॉन पार्कर, सिलिकॉन व्हॅली, याहू वगैरे शब्द त्याच क्षेत्रात आपण काम करतोय अशा पद्धतीने वापरायची सवय लागलेली. आपणही अंकित फादियासारखे इथिकल हॅकर बनूया असे स्वप्न पडायला लागले. मात्र एक फायदा झाला कॉम्प्युटरचं बेसिक ज्ञान घेतल्यामुळे त्यात काळानुसार झालेले बदल चटकन आत्मसात करता आले. 

कधीकाळी 'विंडोज ९५' व त्याही आधीची एमएस-डॉस प्रणालीतून 'विंडोज ३.1' मध्ये बघितलेली ग्राफिकल युजर इंटरफेस ते आताच्या अँड्रॉइड बेस्ड स्मार्टफोन हा प्रवास दिङ्मुख करणारा आहे. एकीकडे ऑपरेटिंग सिस्टिम्समध्ये पिढीनुसार वाढ होत होती तर दुसरीकडे इंटरनेट वेगवेगळ्या माध्यमातून वाढत होतं. विशेष म्हणजे ९८ साली गुगलची सुरूवात झाली असली तरी त्याची ओळख होऊन त्याच्या प्रेमात पडायला २००६ साल उजाडावं लागलं. आणखी चार वर्षांनी गुगल बेस्ड बिझनेस करणाऱ्या एका कंपनीत गुगलचा वापर कसा करता येऊ शकतं याचा अनुभव घेतला. गुगल पर्यायाने वर्ल्ड वाईड वेबचा पसारा आपल्या मर्यादित आकलनाच्या पलीकडे मोठ्ठ्या प्रमाणात आहे याची जाणीव झाली. एखादी कंपनी जगातील मुक्त माहितीचा वापर करून कोटींचा नफा कशी कमावते हे त्या कंपनीत जवळून अनुभवलं.

आज वर्ल्ड वाईड वेबची तिशी आहे. याचे निर्माते टीम बर्नर्स-ली यांना मात्र याचा होणारा गैरवापर काळजी करणारा वाटतो. ते म्हणतात, “If we give up on building a better web now, then the web will not have failed us. We will have failed the web.” त्यांचा रोख 'ब्रेक्झीट' व डोनाल्ड ट्रम्पनी निवडणुकीच्या काळात केल्या गेलेल्या वापराकडे आहे. पुढे ते म्हणतात, “It's our journey from digital adolescence to a more mature, responsible and inclusive future.

हे शतक जर डिजिटल युगाचं असेल तर याचा वापर विधायकरित्या केला तर नक्कीच भविष्य सुकर आहे.

Comments