किस किसको प्यार करू : अपग्रेडेड साजन चले ससूराल
डेव्हिड धवनचा १९९६ साली साजन चले ससूराल आला तेव्हा नेहमीप्रमाणे त्याच्यावर टीका झाली. त्यातील दोन हिरोइन्स, गोविंदा-सतीश कौशिकचा आचरट विनोद, डेव्हिड धवनची दाक्षिणात्य सिनेमांचा रिमेक करण्याची हौस, गोविंदा-धवन जोडीचा विनोदाच्या नावाखाली काहीही दाखवण्याचा अट्टाहास या व अशा बऱ्याच गोष्टींचा समाचार घेण्यात आला. नव्वदच्या दशकातला सिनेमा विशिष्ट फॉर्म्युला घेऊन बनवला जायचा. त्याला तार्किकता, वास्तवाशी निगडीत असणे वगैरे गोष्टी फिजूल वाटायच्या. सिनेमा हा मनोरंजनासाठी असावा/असतो या तत्वज्ञानावर त्यांची श्रद्धा असायची. तरीही एक अलिखित संकेत नेहमी पाळला जायचा तो म्हणजे ज्या दिग्दर्शकाने सुरुवातीला ज्या पद्धतीचा सिनेमा बनवला पुढे त्याने तसाच सिनेमा बनवायचा. आपला दायरा सोडून जायचं नाही. उदा. डेव्हिड धवनने कॉमेडीच करायची, आदित्य चोप्रा किंवा सुरज बडजात्याने फॅमिली ड्रामा बनवायचे तसेच अब्बास-मस्तान जोडीने सूडपट किंवा अॅक्शन थ्रिलर्स. अशा ठरलेल्या चौकटीतून बाहेर येऊन जेव्हा या दिग्दर्शकांनी सिनेमे बनवले तेव्हा ते खूप यशस्वी ठरले असे नाही. अब्बास-मस्तान जोडीने शाहरुख खानला घेऊन बादशाह बनवून ...