किस किसको प्यार करू : अपग्रेडेड साजन चले ससूराल

डेव्हिड धवनचा १९९६ साली साजन चले ससूराल आला तेव्हा नेहमीप्रमाणे त्याच्यावर टीका झाली. त्यातील दोन हिरोइन्स, गोविंदा-सतीश कौशिकचा आचरट विनोद, डेव्हिड धवनची दाक्षिणात्य सिनेमांचा रिमेक करण्याची हौस, गोविंदा-धवन जोडीचा विनोदाच्या नावाखाली काहीही दाखवण्याचा अट्टाहास या व अशा बऱ्याच गोष्टींचा समाचार घेण्यात आला. नव्वदच्या दशकातला सिनेमा विशिष्ट फॉर्म्युला घेऊन बनवला जायचा. त्याला तार्किकता, वास्तवाशी निगडीत असणे वगैरे गोष्टी फिजूल वाटायच्या. सिनेमा हा मनोरंजनासाठी असावा/असतो या तत्वज्ञानावर त्यांची श्रद्धा असायची.

तरीही एक अलिखित संकेत नेहमी पाळला जायचा तो म्हणजे ज्या दिग्दर्शकाने सुरुवातीला ज्या पद्धतीचा सिनेमा बनवला पुढे त्याने तसाच सिनेमा बनवायचा. आपला दायरा सोडून जायचं नाही. उदा. डेव्हिड धवनने कॉमेडीच करायची, आदित्य चोप्रा किंवा सुरज बडजात्याने फॅमिली ड्रामा बनवायचे तसेच अब्बास-मस्तान जोडीने सूडपट किंवा अॅक्शन थ्रिलर्स. अशा ठरलेल्या चौकटीतून बाहेर येऊन जेव्हा या दिग्दर्शकांनी सिनेमे बनवले तेव्हा ते खूप यशस्वी ठरले असे नाही. अब्बास-मस्तान जोडीने शाहरुख खानला घेऊन बादशाह बनवून कॉमेडीच्या प्रांतात मुशाफिरी करायचा प्रयत्न केला होता. पण तेव्हा ते प्रकरण अंगलट आलं होतं. यावेळी मात्र त्यांनी परत एकदा असा प्रयत्न केला आहे साजन चले ससूरालचं अपग्रेडेड वर्शन तयार करून.

शिव राम किशन (कपिल शर्मा) हा अनुक्रमे जुही (मंजिरी फडणीस), अंजली (सई लोकूर) व सिमरन (सिमरन कौर मुंडी) या तिघींचा पती आहे. त्याने या तिघींशी कोणत्या परिस्थितीत लग्न केलं हे त्याचा वकील मित्र करण (वरुण शर्मा) सांगतो. वरतून त्याला सल्ला देतो मुंबईत तीन वेगवेगळ्या ठिकाणी घर घेऊन लोकल ट्रेनसारखं फिरल्यापेक्षा एकाच बिल्डींगमध्ये तिघींसाठी फ्लॅट घे. पडत्या फळाची आज्ञा मानून तो एकाच सोसायटीत अनुक्रमे चौथ्या, सहाव्या व आठव्या फ्लोअरवर फ्लॅट्स घेतो. त्या दिवशीपासून त्याची ससेहोलपट सुरु होते. दररोज प्रत्येक मजल्यावर जाऊन प्रत्येकीच्या हातचा नाश्ता खाऊन ऑफिसला जाताना हसरा चेहरा करून जात असतो. अशा पद्धतीने तिघींना फसवून तो कंटाळलेला असतो. करणला हे सांगतो तोपर्यंत करवा चौथचा दिवस येऊन ठेपतो. त्या दिवशी तिघींना एकाच वेळी चेहरा कसा दाखवायचा या विवंचनेत असताना अजून पुढे काय काय वाढून ठेवलंय याची कल्पना त्याला नसते. त्यामुळे तो या तीन तिघाड, काम बिघाड सिच्युएशन मधून बाहेर येतो का हे बघणं राहतं.

अब्बास-मस्ताननी सिनेमाची संकल्पना व पटकथा यांची चर्चा अनुक्रमे अनुकल्प गोस्वामी व धीरज सरना यांच्याशी केली असावी. कारण कपिल शर्माला घेऊन सिनेमा करायचा तर त्याच्या मर्यादा आणि बलस्थानांचा विचार करणं खूप गरजेचं होतं. तसं त्यांनी ते केलं आहे. त्याला अभिनयाला खूप वाव देण्यासाठी लंबेचौवडे डायलॉग किंवा हृदयद्रावक प्रसंग न देता त्याच्या कम्फर्ट झोनचा म्हणजेच स्टँड अप कॉमेडीचा वापर चुरचुरीत संवादानिशी करून खुलायला वाव दिला आहे. ज्या ज्या वेळी तो अशा प्रकारच्या प्रसंगात अप्रतिमपणे बोलतो तेव्हा प्रेक्षक हसून हसून लोटपोट होतात. मात्र इतर प्रसंगात त्याच्या मर्यादा दिसून येतात. खासकरून डान्स आणि गाण्यांच्या सिच्युएशन्समध्ये तो हिरो मटेरीअल नाही हे चटकन जाणवतं. अब्बास-मस्तानचं कौतुक अशासाठी करायचं की इतक्या वर्षांच्या अनुभवामुळे नवख्या अभिनेत्याकडून योग्य ते काढून घेऊन ते पेश कसं करायचं हे त्यांना जमलं आहे.

वरील तिघींचा पूरक अभिनय त्याला सुप्रिया पाठक, शरत सक्सेना, मनोज जोशी, अरबाज खान यांची अनुभवी साथ एकूण करमणुकीच्या आड येत नाही. कपिल शर्मा व्यतिरिक्त अजून दोन व्यक्ती लक्षात राहतात. वरुण शर्मा आणि जॉनी लिव्हरची मुलगी जेमी लिव्हर. वरुण शर्माला पूर्वी फुकरेमध्ये पाहिलेलं. त्याचं कथानकाला सहजतेने आपलसं करून सहजसुंदर अभिनय करणं भावलेलं. इथे त्याने निराशा केली नाही. थोडक्या प्रसंगात जेमी लिव्हर अब्बास-मस्तानच्या सिनेमात नेहमी हजेरी लावणाऱ्या जॉनीची कमतरता छानपणे भरून काढते. तिचा अभिनय वडिलांसारखा असला तरी एकूण या गर्दीत ती उठून दिसते.

कपिल शर्माचे चाहते असाल तर चुकवू नका. नसाल तरी एकदा त्याच्या पंचेससाठी चुकवू नका. 

Comments