फटा पोस्टर निकला हिरो : (स्वतःच्या) प्रेमात पडलेल्याचा रिझल्ट

९४ साली अंदाज अपना अपना हा सिनेमा आधीच्या वर्षी आलेल्या दामिनी नंतरचा राजकुमार संतोषीचा दिग्दर्शक म्हणून तिसराच सिनेमा. घायलमधून दिग्दर्शक म्हणून पुढे आलेल्या या दिग्दर्शकाने नव्वदच्या दशकात असणाऱ्या फॉर्म्युला सिनेमांना व्यवसायिक चौकटीत वेगळं काय देता येईल या विचाराने बनवले होते असा समीक्षकांचं म्हणणं होतं. दामिनीसारखा कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार, घराने की इज्जत ला चौकटीच्या मर्यादा न तोडता छान पेश केलं त्यामुळे प्रेक्षक आणि समीक्षक खूष झाले. या नंतर लगेचच आमीर खान आणि सलमान खान द्वयीचा अंदाज अपना अपना आला. त्याची झलक दामिनीतल्या एका गाण्यात दाखवलेली.

दोन महत्वाचे आणि गंभीर विषय असणारे सिनेमे देणारा दिग्दर्शक म्हणून सर्वांची उत्सुकता होती की यात काय असेल. सिनेमा प्रदर्शित झाल्या झाल्या समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी झोडपला. त्या काळाला अनपेक्षित असणारं कथानक, कथेला मुद्दामहून दिलेला बाळबोध सूर, लहान मुलांच्या कथेत शोभावा असा खलनायक तो ही शक्ती कपूर ज्याने त्याच वर्षी आलेल्या राजा बाबू मध्ये त्याच पद्धतीचा रोल केला असं सर्वांना वाटणं, हिंदी व्यावसायिक सिनेमाची उडवलेली टर, विनोदाचा बाज मुद्दामहून वेगळा ठेवणं, नायक हा नायक असावा ही अमिताभ बच्चनपासून चालत आलेली परंपरा तोडणारे बुद्दू, काहीही करू न शकणारे, आवारागर्दी करत जन्मदात्यापासून ते लोकांपर्यंत टोप्या घालत, हिरोइन्सशी लग्न होईल या खात्रीने दिवा स्वप्नात रमणारे दोन तरुण नायक, मुख्य नायिकेने वडिलांकडे मुनीम असणाऱ्या नोकराच्या मुलीला आपल्या जागी ठेवून स्वतःकडे दुय्यमत्व घेतलेलं, संवादात ठेवलेला बाळबोधपणा, सर्वच पात्र कॅरीकेचर वाटावीत अशी केलेली रचना अशा काही कारणाने प्रचलित सिनेमाला धक्का दिला. यथावकाश सिनेमाने एका आठवड्याच्या आत थिएटर सोडलं. संतोषीचा बाज गंभीर सिनेमा बनवायचा त्यामुळे सर्वांनीच एक फ्लॉप सिनेमा अशी नोंद करून ठेवलेला.

त्यानंतर बदलत्या काळानुसार सिनेमा बघण्याची सोय टीव्हीवर विविध मुव्ही चॅनल्सद्वारे झाली तशी अंदाजबद्दलचा प्रेक्षकांचा अंदाज चुकायला लागला. नव्वदच्या दशकात विनोदी चित्रपट म्हणजे डेव्हिड धवन हे समीकरण इतकं पक्कं झालं की पुढे हरमेश मल्होत्राचा दुल्हे राजा आला तर तो कित्येकांना डेव्हिड धवनचा वाटला. त्यामुळे काळाच्या पुढे असणाऱ्या या सिनेमाने नंतर कल्ट स्टेटसचा मान मिळवला. सोशल नेटवर्किंगचा प्रसार जसा वाढला तसा याच्या प्रसिद्धीत वाढ व्हायला लागली.

तरीही काळ कुणासाठीही थांबत नसतो. जो काळाची पावले ओळखून मार्गक्रमणा करतो तो टिकतो, बाकीचे स्पर्धेच्या बाहेर फेकले जातात. फटा पोस्टर निकला हिरो हा असाच काळाची पावले न ओळखलेला सिनेमा आहे. 

एका छोट्या गावातला मुलगा विश्वास राव (शाहीद कपूर) मुंबईत हिरो बनायला येतो. एका गुन्हयात चुकून गुंतला जातो. त्यामुळे त्याची हिरो बनण्याची ख्वाईश पूर्ण होत नाही. कथा छान आहे. पण पटकथेकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने फाफटपसारा वाढलाय अन् कथा भरकटत गेलीय. गरज नसताना कथा नायकाच्या लहानपणापासून सुरु होते त्यामुळे मध्यंतरापर्यंत कथा उगाचच खेचली जाते. मुख्य भाग मध्यंतरानंतर सुरु होते अन् लगेच सिनेमा संपतो.

सिनेमात दिग्दर्शक विनोदाला बाळबोध पातळीवर का पेश करतोय ते कळत नाही. विनोद हा गांभीर्याने करायचा असतो. अंदाजमध्ये विनोदाकडे गांभीर्याने बघणारा हा दिग्दर्शक परत एकदा त्याकडे बाळबोध पद्धतीने बघतो हे सहन होत नाही. मधल्या काळात काळ खूप बदललाय याची जाणीव त्याला नसावी का. आपण त्या काळात न राहता वर्तमानकाळात राहतोय याचा विसर पटकथा लिहिताना पडल्याचं स्पष्ट जाणवतं.

तसेच गेल्या अठरा-वीस वर्षांच्या काळात आपण बनवलेला पडेल चित्रपट समाजमान्य होऊन आजही चर्चिला जातो ही भावना डोक्यात फिट्ट बसली आहे का. त्याच पद्धतीने जर आजचा सिनेमा बनवला तर ती जादू परत चालेल असा काही होरा असावा का. अंदाजचे स्पष्ट-अस्पष्ट संदर्भ पटकथेत वापरणे याने प्रेक्षक खेचला जाईल असं काही गणित असावं का. असे प्रश्न उपस्थित होतात कारण दिग्दर्शक आपणच बनवलेल्या कलाकृतीच्या प्रेमात पडलेला असणे, पर्यायाने स्वतःच्या प्रेमात असणे इथे मोठीच अडसर म्हणून उभे राहते. त्यामुळे सिनेमा म्हणून काही उभा राहत नाही.

कलाकाराने स्वतःच्या प्रेमात पडणे यासारखं दु:ख नाही. कालाय तस्मे नमः म्हणायचं की पूर्वपुण्याईवर भिस्त ठेवून काळाकडे पाठ फिरवून स्वतःत मश्गुल असणारा मनस्वी कलाकार म्हणायचं असं काहीसं हे असावं का.

Comments