कट्टी बट्टी : ऑफ बीट सादरीकरण

हृषिदांच्या बावर्चीमध्ये एक छान संवाद आहे. असरानी राजेश खन्नाला एका सिनेमात आपल्याला असं असं गाणं घ्यायचं आहे तर ते कसं असेल ते सांगत असतो. सांगताना तो म्हणतो, “ये गाना हिरो नही बल्की गाडीवान गाता है. यहाँ हमारी फिल्म ऑफ़ बीट हो जाती है.” ऑफ बीट सिनेमा असं संबोधून संवादलेखक गुलजार-दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी जोडीने समांतर सिनेमाला मारलेली नर्मविनोदी कोपरखळी त्यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देऊन गेली. पुढे हृषीदांचेच सिनेमे मिडल ऑफ द रोड हे नवं नामाभिधान घेऊन चर्चिले गेले. निखील अडवाणींचा या ऑफ बीट सिनेमा संकल्पनेवर बराच जीव असावा. कारण एका आठवड्याच्या फरकाने त्यांनी निःसंशय वेगळा सिनेमा दिला आहे.

एका रुममध्ये घरगुती कॅमेऱ्याच्या साहाय्याने एक तरुणी एका तरुणाला चित्रित करत आहे. श्रेयनामावलीसोबत असणारं हे पाँईंट ऑफ व्ह्यू चित्रीकरण थेट त्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावते. प्रेक्षक सरसावून बसतात. पुढच्याच प्रसंगात तो तरुण मॅडी/माधव काबरा (इमरान खान) हॉस्पिटलमध्ये दाखील होतो का तर त्याने बिअरच्या ऐवजी फिनाईल प्यायलेलं असतं. ती तरुणी पायल [तिला आडनाव का नसतं याचं स्पष्टीकरण दिलं जात नाही.] (कंगना राणावत) त्याच्यासोबत लिव ईनमध्ये असते पण तिने अचानक त्याला सोडून दिलेलं असतं म्हणून त्याने फिनाईल पिलं असा सर्वांचा कयास असतो. पण त्याच्या दृष्टीकोनातून फक्त बाटली बदललेली असते. तो तिला विसरू शकत नाही पण ती त्याला विसरून दिल्लीत सेटल होण्यासाठी गेलेली असते. तरीही माधवला तिच्या आठवणी काही झोपू देत नाहीत. एक वेळी तो तिला परत भेटून तिची समजूत काढायची म्हणून दिल्लीत जातो अन् दोन दिवसांवर तिचं लग्न असल्याचं त्याला कळतं.

दिग्दर्शक निखील अडवाणीवर यशराज व करण जोहरच्या प्रेम संकल्पनेचा खूप प्रभाव आहे. मागील आठवड्यात प्रदर्शित झालेल्या हिरोतून ते दिसून आलंच होतं. तरीही दिल्ली सफारी, डी डे किंवा पतियाला हाउसमधून हिंदी व्यावसायिक सिनेमाच्या भाषेत वेगळे प्रयत्न त्यांनी केले होते. पण यातून ते आपल्या कम्फर्ट झोनमध्ये परत आले आहेत. पटकथाकार अंशुल बन्सलसोबत त्यांनी सादरीकरणावर भर देणारा सिनेमा बनवला आहे. पटकथा प्लॉटवर भर देणारी झाली आहे. त्यातील आशय असंख्य सिनेमात आल्यामुळे दिसणारा परिणाम नेत्रसुखद आहे. आशयाच्या बाबतीत तो तोकडा पडतो ते भूतकाळाला वर्तमानकाळाशी जोडून कथानक पुढेमागे करून काहीतरी वेगळं दाखवल्याचा आभास निर्माण केल्यामुळे.

सिनेमाचा संपूर्ण रोख माधवच्या दृष्टीकोनाचा असल्यामुळे तो मांडत असलेले मुद्दे प्रभावी वाटतात पण पायलच्या दृष्टीकोनाला महत्वच दिलं नसल्यामुळे तिनं केलेला युक्तिवाद तार्कीकतेवर उतरत नाही. ती आक्रस्ताळी भूमिका घेतेय असं प्रेक्षकांना वाटत राहतं. तसेच एक रहस्य या पुढेमागे होणाऱ्या कथानकाला उगाचच प्रेक्षकांची उत्कंठा वाढवायला जोडलं जातं. तेही रहस्य न राहता धक्का म्हणून येतं तेव्हा नेमकं वेगळा ऑफ बीट सिनेमा म्हणजे तो हाच असा प्रश्न प्रेक्षकांसमोर पिंगा घालायला लागतो.

हिंदी सिनेमाचे धक्का, रहस्य आणि संदेह याबद्दल बरेच गैरसमज दिसतात. ज्याला ते रहस्य म्हणतात तो प्रत्यक्षात धक्का असतो. तसेच रहस्य उलगडण्यासाठी नेहमी बाळबोध कारणांचा का वापर केला जातो हे न कळण्यासारखं. त्यामुळे संदेह कधीही इथे वापरला जात नाही. प्रेक्षकांना धक्का देऊन सुखवायचं म्हणून त्यालाच रहस्य म्हणून पेश केलं जातं.

सुरुवातीला ऑफ बीट सिनेमा असा उल्लेख आला आहे. त्यावेळी अमिताभ युगामुळे करमणूकीला महत्व असणाऱ्या सिनेमांच्या गर्दीत आशयावर भर असणारे हे सिनेमे पुढे मिडल ऑफ द रोड किंवा ऑफ बीट समजले गेले. त्यांचा रोख हा आशयाला केंद्रस्थानी ठेवून सादरीकरणाला दुय्यम स्थान देणारा होता. आजही ते प्रभावी वाटतात. आज स्टाईल ओव्हर सबस्टन्सला केंद्रस्थानी ठेवल्यामुळे आशयाला दुय्यमत्व आलंय. त्यामुळे सादरीकरणात कुठलाही प्रयोग न करता प्रभावी वाटणारा मिडल ऑफ द रोड सिनेमा कट्टी बट्टीला रन ऑफ द मिल ठरवतो.

Comments