हिरो : मागील पानावरून पुढे
२००० साली हिंदी
व्यावसायिक सिनेमातल्या तीन अभिनेत्यांच्या पुत्रांनी सिनेश्रुष्टीत झोकदार
एन्ट्री केली. पैकी दोन स्टार पुत्र होते तर एक नुसताच अभिनेत्याचा मुलगा. पहिले
होते राज कपूरची नात आणि रणधीर-बबिताची मुलगी करीना कपूर, अभिताभ बच्चनचा मुलगा
अभिषेक बच्चन. त्यामुळे त्यांच्या सिनेमाश्रुष्टीतल्या प्रवेशाकडे सर्वांचे डोळे
लागलेले. सिनेमा रिफ्युजी. तिसरा अभिनेता होता राकेश रोशन नावाच्या अभिनेत्याचा
हृतिक रोशन मुलगा. चिकनाचुपडा, उंचापुरा, बॉडी बिल्डींग करून मस्त शरीरयष्टीचा. सिनेमा
कहो ना प्यार है. राकेशच्या नावावर यशस्वी सिनेमे देणारा दिग्दर्शक असा लौकिक, तर
जेपी दत्तांच्या सोबत साक्षात सिनेमातले स्टारपुत्र.
राकेशचा नेहमी
यशस्वी होणारा फॉर्म्युला कथेत होता तर जेपींनी वाळवंटाच्या पार्श्वभूमीवर प्रेम फुलवण्याचा
चंग बांधलेला. कहो ना... प्रचंड यशस्वी झाला. रिफ्युजी सुश्राव्य गाणी असून सुद्धा
पडला. मल्टीप्लेक्स कल्चर अजून फोफावलेलं नव्हतं. त्या पूर्वी नव्वदच्या दशकातल्या
सिनेमाची रचना, शैली, नायक-नायिका-खलनायक हे ठरलेले होतं. प्रेक्षकांना हवं ते
मिळालं. सोबत एक गोष्ट घडली जी हिंदी व्यावसायिक सिनेमासाठी काही प्रमाणात
फायद्याची ठरली. अभिनेत्याला उत्कृष्ट शरीरयष्टी असणे गरजेचे आहे. हृतिकच्या या
बाजूची चर्चा त्याच्या अभिनयापेक्षा जास्त झाली. त्यामुळे एक पायंडा पडला अभिनय
कमी प्रमाणात येत असला तरी चालेल पण उत्तम आणि आकर्षक शरीर असणे इज अ मस्ट. सुरज
पांचोली हा आदित्य पांचोलीचा मुलगा हिरोमधून अशीच काहींसी एन्ट्री मारायचा प्रयत्न
करतोय.
सुरज (सुरज पांचोली)
हा गुंडा आहे. तो पाशाचा (आदित्य पांचोली) हस्तक आणि मुह बोला मुलगा आहे. त्याने
एका डिस्कोथेकमध्ये राधा माथुरचे (अथिया शेट्टी) प्राण वाचवलेले आहेत. राधा
मुंबईचे आयजी श्रीकांत माथुरची (तिगमांशू धुलिया) मुलगी आहे. माथुर पाशाला एका
केसमध्ये कडी से कडी सजा देण्यासाठी चिंतातूर आहेत. पाशा यातनं बाहेर पाडण्यासाठी
सुरजकडून राधाचं अपहरण करवतो. त्या दरम्यानच्या काळात राधा आणि सुरजजवळ येतात. पण
राधाला सुरजबद्दलची पर्दे के पीछे की सच्चाई मालूम होते. ती त्याला समजावून वापस मुंबईला
घेऊन येते. तो सरेंडर करतो. दोन वर्ष सजा काट के तो एक नयी जिंदगी की शुरुआत करतो.
और कहानी में ट्वीस्ट आता है.
सिनेमा १९८३ साली
आलेल्या सुभाष घई दिग्दर्शित हिरोचा शुद्ध रिमेक आहे. शुद्ध यासाठी यातील गाणी
सोडली तर मूळ कथानकाला जवळ जवळ सर्व पात्रांच्या नावासहित जसेच्या तसे ठेवले आहे.
आजच्या काळानुसार कथानकाला वेग देऊन शेवटाकडे कसे नेता येईल हे लेखक-दिग्दर्शक
निखील अडवाणी आणि पटकथाकार उमेश बिस्त यांनी पाहिलं आहे. शक्यतो सुरजची प्रतिमा
कशी प्रस्थापित होईल यावर सर्वांचं लक्ष केंद्रित असल्यामुळे त्याला अभिनय करायला
खूप वाव ठेवलेला नाही. या उलट राकेश रोशनने पहिल्याच सिनेमात दुहेरी भूमिका देऊन
हृतिकला खूप छान पद्धतीने सादर केलं होतं. त्याला सुश्राव्य संगीताची जोड होती.
इथे गाणी तितकी प्रभावी नाहीत जी मूळ चित्रपटाची जान होते.
वर उल्लेखलेला
शरीरयष्टीचा मुद्दा इथे जास्त प्रमाणात अधोरेखित होतो. सिक्स पॅक अॅब्ज, कमावलेले बायसेप्स,
भरदार छाती, ब्युटीफुल थाईज असं शरीर असणं आता मस्ट आहे. पण अभिनय बेतासबात असला
तरी चालतो. हा ट्रेंड हृतिकपासून सुरु झाला. (अभिनय वगळता) त्याचेच पाईक असणारे
असंख्य नट सध्या सिनेमात येत आहेत. मागच्या वर्षी आलेल्या हिरोपंतीमध्ये टायगर
श्रॉफने अशाच पद्धतीने उत्तम शरीर असणारा नट म्हणून एन्ट्री घेतलेली आहे. त्या आधी
उदय चोप्रा, वरुण धवन वगैरे नट सुद्धा याच पावलावर पाऊल टाकून पुढे आलेले आहेत. याचा
परिणाम असा झालाय की शरीर उत्तम कमावण्याच्या नादात अभिनय सुद्धा करायचा असतो हे
ही मंडळी विसरली आहेत. अशाने अभिनयाची कारकीर्द बहरत नाही. अथिया शेट्टीचा अभिनय
सुद्धा यथातथाच. सुनील शेट्टीची मुलगी इतकीच तिची ओळख रहावी लागणार नसेल तर इथून
पुढे तिने अभिनयात सुधारण करणे गरजेचे आहे.
मागील पानावरून पुढे
असणाऱ्या या सिनेमात उत्तम कोरिओग्राफ केलेल्या पण जेसन स्टॅथम, जॅकी चॅनच्या सिनेमातल्या
फाईट सीन्सची कॉपी असणारे सीन्सच फक्त लक्षात राहतात.




Comments