क्वीन : आशयात श्रीमंत आणि धग : अपुऱ्या पटकथेचा बळी

आपण आयुष्य जगताना एका विशिष्ट वर्तुळात जगतो. आपल्या परिघात जेवढं येईल ते जसंच्यातसं स्वीकारतो. या सिनेमातल्या राणीचं आयुष्य तसंच आहे. ती तिच्या आयुष्यात आलेल्या एका युवकाला मनोमन आपला मानते व ऐन लग्नाच्या आदल्या दिवशी तो नकार देतो. मग ती काय करेल??? तर ती स्वतःला एका खोलीत बंद करून घेते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठते तोपर्यंत घरचे परेशान झालेले. ती त्यांना म्हणते मला माझा हनीमून साजरा करायचाय, एकट्याने!!! घरचे तिची मानसिकता बघून तिला जा म्हणतात. ती तिथेच जाते जिथे तिच्या नवऱ्याने हनीमूनसाठी तिला न्यायचं ठरवलेलं असतं, पॅरिसला. पुढे काय होतं ते पडद्यावर बघा.


एक अशक्य वाटणारी घटना उत्तम पटकथेद्वारे कशी सांगितली जाते याचं या वर्षीचं उत्तम उदाहरण. या सिनेमात दोन गोष्टी मस्त जुळून आलेल्या आहेत त्या म्हणजे कंगनाचा गोळीबंद अभिनय आणि पटकथाकारांनी भारतीय मनोवृत्तीची पकडलेली अचूक नस. सिनेमा जितका गंभीर आहे तितकाच विनोदी आहे. पण इथला विनोद चिक्कार हसवतो पण त्या पाठीमागची एका भारतीय स्त्रीची होणारी कुचंबणा तितक्याच समर्पकपणे सोबतच्या प्रसंगात दाखवतो. जे बऱ्याचदा अंतर्मुख करतो. आपण भारतीय जगात कुठेही गेलो तरी आपली दांभिकता व ढोंगीपणा सोडत नाहीत.

मागे मी एका मैत्रिणीला म्हणालो होतो आपली मानसिकता ही टॉमस हार्डीच्या व्हिक्टोरिअन लोकांसारखी आहे. सिनेमा शेवटपर्यंत ही गोष्ट कोणतंही भाष्य न करता दाखवतो. सिनेमा कुठेही रेंगाळत नाही, कंटाळवाणा होत नाही. इथे कंगना पात्र उभी करतीय असं वाटतच नाही. ती राणीची देहबोली छान आत्मसात करून स्वतःला मोकळं करते व पात्राला त्रिमिती आकार देते. पटकथाकार व ती तिच्या वावरण्यामधून ती राणीला फार्सिकल होण्यापासून वाचवतात. आवर्जून बघावा असा सिनेमा. सोडू नका.
-------------------------------------------------------------------------------------------------------------

तीन राष्ट्रीय पुरस्कार विजेता धग खूप गंभीर सिनेमा आहे. एका मृतिकाकर्म करणाऱ्या कुटुंबाची कथा यात सांगितली जाते. सिनेमा पात्रांची ओळखबिळख करून देण्याच्या भानगडीत न पडता थेट विषयाला हात घालतो पण पुढे वास्तववादाची कास धरताना उसन्या नाट्याचा आधार घेतो. पटकथेची वीण घट्ट नसल्यामुळे व अपुऱ्या पात्ररेखनामुळे फक्त अभिनेत्यांच्या अभिनयामुळे सुसह्य होतो. तसेच पात्र ही ग्रामीण भागातली दाखवायची असतील तर त्यांची भाषा लहेज्यासहित येणं गरजेचं आहे. इथे भाषा जरी ग्रामीण भागातली असली तरी तिला सफाईदारपणा नाही. संवाद काही ठिकाणी घडवलेले वाटतात खासकरून म्हाताऱ्या आज्जीच्या तोंडी तर शहरी वळणाची भाषा आहे. 

मी जी प्रिंट बघितली ती खराब होती का काय माहित नाही पण सिनेमात बरीच पात्रं स्वच्छपणे दिसत नव्हते. दृश्य स्पष्ट नव्हते. बऱ्याचदा पात्रांचे चेहरेसुद्धा दिसत नव्हते. तरीही पहिल्याच सिनेमात शिवाजी लोटन पाटीलनी एक गंभीर व अवघड विषय हाताळला याचे अभिनंदन करायला हवे. उषा जाधव व हंसराज जगतापचा अप्रतिम अभिनय ही सिनेमाची उजवी बाजू. उपेंद्र लिमयेंसारख्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्यापुढे दोघेही बुजत नाहीत तर पात्रांना जिवंत करतात. गंभीर असला तरी आवर्जून बघा.

Comments