ट्रान्सपोर्टर रिफ्यूइल्ड : परत एकदा फ्रँक मार्टिन

२००२ साली जेसन स्टेथमचा ट्रान्सपोर्टर आला तेव्हा कुणालाही कल्पना नव्हती तो खूप मोठा हिट ठरेल. द हायर ही बीएमडब्ल्यू कंपनीने त्यांच्या कार्सच्या प्रोमोशनसाठी छोट्या सिनेमांची मालिका निर्मिती केली होती. ती जगातल्या त्या वेळेतल्या सर्वात चांगल्या दिग्दर्शकांना घेऊन उदा. जॉन वू, गाय रिची इ. हायरची कल्पना अशी होती एक ड्रायव्हर असतो त्याला वेगवेगळी असायनमेंट्स दिली जातात. त्याला ती पार पाडणे गरजेचे असते. क्लाइव ओवेनने दुसऱ्या सिरीजमध्ये ड्रायव्हरची भूमिका केली होती. ती मालिका किती प्रभावी होती हे जॉन वूने दिग्दर्शित केलेल्या द हॉस्टेज बघून येईल. ल्युक बेसनने वरील मालिका बघून आठ दिवसात ट्रान्सपोर्टरची पटकथा लिहिली. जेसन स्टेथमला फ्रँक मार्टिनसाठी लुईस लॅटिएर आणि कोरी युएनच्या हाती सोपवलं. नंतर काय घडलं हे सांगणे न लागे. पहिला भाग प्रचंड यशस्वी झाल्यामुळे दुसरा आणि तिसरा भाग काढून त्याची स्वतंत्र मालिकाच बनवण्यात आली. तसेच एक टीव्ही सिरीजसुद्धा बनवली गेली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रान्सपोर्टर रिफ्यूइल्डमध्ये फ्रँक मार्टिनला रिबूट करून मालिकेची यशस्विता खेचून आणण्याचा प्रयत्न आहे.

फ्रँक मार्टिन (एड स्क्रेईन) हा ट्रान्सपोर्टर नावाने ओळखला जातो. त्याचे तीन नियम आहेत जे तोडणे त्याला आणि त्याच्या क्लायंट्ससाठी घातक आहे. वडिलांची निवृत्ती एन्जॉय करत असतानाच त्याला एक काम मिळते. एके ठिकाणाहून एक पॅकेज उचलायचे आहे. अॅना (लोन चॅबानोल) ही तरुणी त्याला काम देते पण त्यासाठी त्याच्या वडिलांचं अपहरण करून. फ्रँक वडिलांच्या जीवासाठी नाईलाजाने काम स्वीकारतो. अॅनासोबत अजून तीन तरुणी असतात पण त्यांची कामे ही म्हणावी तशी छोटी नसतात. पहिल्यांदा त्या एक बँक लुटतात. नंतर एका पबमध्ये फ्रँकच्या साथीने तिथल्या लोकांना बेशुद्ध पाडून एक छोटी डायरी चोरतात ज्यात त्यांच्या बॉसचे काळे कारनामे असतात. काम झाल्यानंतर फ्रँक वडिलांना त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी सोडून जात असतानाच एक फोन येतो. त्याच्या वडिलांचं कुणीतरी परत अपहरण केलं असतं पण यावेळी फ्रँक मात्र भयंकर चिडतो.

दिग्दर्शक कॅमिली डेलामेरवर पहिल्या चित्रत्रयीचा खूप प्रभाव आहे हे दिसून येतच पण पटकथाकार-निर्माता ल्युक बेसन स्वतःच्या निर्मितीच्या प्रेमात आहे हे जास्त खटकतं. त्यामुळे नाविन्य नसलेली कथा-पटकथा पूर्वपुण्याईच्या जोरावर प्रेक्षकांना रिजवण्यासाठी पेश करता येईल असा होरा एकूण निर्मितीत दिसून येतो. पहिल्या ट्रान्सपोर्टरमध्ये ल्युक बेसनने पटकथा रचताना जेसनचं पात्र जवळजवळ अमानवी वाटेल अशा पद्धतीने लिहिलं होतं. त्याच्यावर वर उल्लेखलेल्या ड्रायव्हरचा प्रभाव आहेच आहे सोबत जेम्स बाँड आणि द गुड, द बॅड अँड द अग्लीतल्या ब्लाँडीचा (द मॅन विथ नो नेम) सुद्धा प्रभाव आहे. फ्रँकचं व्यक्तिमत्व थंड आणि शांत आहे. त्याला त्याच्या भूतकाळातील गोष्टींचा पगडा वर्तमानात पडायला नको आहे. त्यासाठी तो हे ट्रान्सपोर्टींगचं काम करतो. त्याला आपण ज्यांच्यासाठी काम केलं ते कोण आहेत आणि त्यांच्यामुळे समाजात काय होतंय याच्याशी देणेघेणं नाही. आपण स्वतःला आणि क्लायंटला घालून दिलेले नियम मोडायचे नाहीत, काम अत्यंत प्रोफेशनली संपवायचं, घरी जायचं, रात्रीच्या जेवणाचा आस्वाद घ्यायचा आणि झोपून जायचं असा त्याचा दिनक्रम असतो. त्यामुळे प्रेक्षकांना तो एकदम हवाहवासा वाटू लागतो. 

जेसनच्या अभिनयाने तर त्याला त्रिमिती आकार देऊन एक जिवंत माणूस बनवले होते. तसेच लुईस लॅटिएर आणि कोरी युएन यांनी अप्रतिम कॅमेरावर्क, उत्तम कोरिओग्राफ केलेल्या फाईट सीन्स आणि स्टंट वर्कने त्याला आजच्या काळातला अप्रतिम अॅक्शन सिनेमा बनवला होता. जेसन स्वतः मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये ट्रेंड असल्यामुळे आणि सिनेमातले सर्व मारामारीचे सीन्स त्याने स्वतःच केले असलामुळे त्यांना जिवंतपणा आला होता. 

एड स्क्रेईनच्या फ्रँकमध्ये पोरसवदेपणा आहे. तसेच कथेत त्याच्या कुटुंबाला केंद्रस्थानी ठेवल्यामुळे त्याच्यातील अमानवीपणा कमी झाला आहे. कॅमिली डेलामेरच्या दिग्दर्शनात सफाईदारपणा नाही. पटकथा सरळसोपी असल्यामुळे त्यांना फार काही चमत्कार दाखवायला जागा नाही. खासकरून चित्रत्रयीमधील फाईट सीन्सच्या तुलनेत तर येथील फाईट्स खूपच प्राथमिक स्वरूपाच्या आहेत. कदाचित पुढील भागात सुधारणा होईल.

एकुणात एका चांगल्या चित्रत्रयीचं रीबूट तितकं प्रभावी नाही असंच म्हणावं लागेल. 

Comments