वेलकम बॅक : निक्का टाइमपास
आल्फ्रेड हिचकॉक आणि अनीस
बज्मी यांच्यात एक गोष्ट समान आहे. हिचकॉक म्हणायचा पडद्यावर तुम्हाला काय
दाखवायचं आहे ते महत्वाचं. अनीस बज्मीला हे मनोमन मान्य आहे. त्यामुळेच हिचकॉकचं
म्हणणं शिरसावंद मानून तो सिनेमे बनवतो. अनीसची कारकीर्द बघितली तर नव्वदच्या
दशकात पटकथाकार म्हणून त्याने सुरुवात केली. डेव्हिड धवनचे राजा बाबू, शोला और
शबनम, स्वर्गसारख्या सिनेमांचे लेखन त्याच्या हातून घडले. नव्वदच्या दशकातला हिंदी
व्यावसायिक सिनेमा वैशिष्टपूर्ण असायचा. एका नायक-एक नायिका, त्यांचं प्रेम,
सुश्राव्य संगीतातली गाणी, कोरसयुक्त नाच, खास हिंदी सिनेमातच शोभतील असे संवाद,
त्यात खोडा घालणारा खलनायक, त्यासाठी शेवटी नायकाने तार्कीकतेला धाब्यावर बसवून
केलेली हाणामारी. असा सिद्धहस्त फॉर्म्युला आणि पॅटर्न असायचा. त्याचा परिणाम सिंगल थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस.
त्यामुळे त्याने लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले सिनेमे फार काही वेगळे होते
अशातला भाग नव्हता. नुकताच प्रदर्शित झालेला वेलकम बॅक याला अपवाद नाही हे प्रेक्षकांचं
किती मोठं भाग्य.
उदय शेट्टी (नाना पाटेकर)
आणि मजनू (अनिल कपूर) आता शरीफ झाले आहेत. त्यांचा दुबईतल्या बुर्ज खलिफामध्ये
हॉटेलचा बिझिनेस आहे. त्यांच्याजवळ भगवान का दिया हुआ सबकुछ है. कमी है तो उनके
पास बिवी नही है. बिवी मिळवण्यासाठी ते जीवाचा आटापिटा करत असतात. नझफगड की
महारानी/पुनम (डिंपल कपाडिया) आणि तिची राजकुमारी नंदिनी/बबिता (अंकिता श्रीवास्तव)
या दोघांना गटवायला दुबईत येतात. यथावकाश उदय-मजनू नंदिनीच्या प्रेमात पडतात.
लग्नाची बोलणी चालू असताना उदयचा बाप (नाना पाटेकर) प्रकट होतो. त्याच्या तिसऱ्या
बायकोची मुलगी रंजना (श्रुती हासन) उदयच्या पदरी टाकून तो अंतर्धान पावतो. आता
बहिण आहे म्हटल्यावर उदय-मजनूला भावाची जबाबदारी पार पाडायची आठवण होते. तिला
श्रीमान (परेश रावल) आणि श्रीमती घुंगरू (सुप्रिया कर्णिक)चा मुलगा अज्जू/अज्जुभाईला
(जॉन एब्राहम) द्यायची म्हणून ते त्यांच्याशी बोलणी चालू करतात पण त्यांच्यापुढे
वेगळंच वाढून ठेवलेलं असतं.
वर म्हटल्याप्रमाणे व्यावसायिक
हिंदी सिनेमाची स्वतःची अशी चित्रचौकटीतली तार्किकता आहे जिला अतार्किकपणे मांडण्याची
खोड आहे. अर्थात तार्किकता आहे/असते म्हणणं योग्य नाही. त्यांच्यात फार मोठा बदल
दिसून आलेला नाही. वर्षानुवर्षे त्याच पद्धतीचा अवलंब करूनही सिनेमा इन्व्हेस्ट
केलेल्या पैशांचा परतावा मिळतोय तोपर्यंत असाच राहिल अशी शक्यता हा सिनेमा बघताना
येते. त्यामुळेच बाहुबलीसारखे इतिहास-पुराण-सामाजिक-भौगोलिक संदर्भांना फाटा देऊन
बनवलेले सिनेमे प्रचंड प्रमाणात यशस्वी होतात. प्रेक्षक सुद्धा तिकिटाच्या रकमेत
किती प्रमाणात मनोरंजन झाला याचा सरळ हिशेब करून जे पुढ्यात येईल ते बघतात आणि
आपलं किती मनोरंजन झालं याची वांझोटी चर्चा चहाच्या कपांवर करतात. आपण जे बघतो ते
आपल्याला खरंच पटलंय का याचा साधा विचार त्यांच्या मनाला शिवत नाही. अशा
प्रेक्षकांना निर्बुद्ध तरी कसे म्हणायचे!
तरीही सिनेमाला तारतो तो
अभिनेत्यांचा अभिनय. नसिरुद्दीन शाह जितका प्रभावी अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यूं
आता है मध्ये वाटतो तितकाच त्रिदेव, मोहरा आणि यात वाटतो. नाना आणि परेश
यांच्याबद्दल काही बोलायला मुद्देच नसतात. ते सिनेमात आहेत हेच खूप मोठं असतं. तीच
बाब डिंपल कपाडियाबद्दल. ताल पूर्वीचा जाँबाजसारख्या सिनेमात अति लाउड अभिनय करून
सिनेकारकीर्द घडवणारा अनिल कपूर मात्र ताल नंतर भलताच समजंस आणि मॅच्युअर वाटायला
लागलाय. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या दिल धडकने दोमध्ये स्वकर्तृत्वाने
श्रीमंत झालेल्या आणि मग्रूर असणाऱ्या बापाचं पात्र अप्रतिम वठवलं होतं. नवोदित
अंकिता श्रीवास्तव सुद्धा उत्तम. जॉन एब्राहमचा आणि अभिनयाचा कधी संबंध नव्हता आणि
पुढे कदाचित असेल असं वाटत नाही. विकी डोनरमध्ये निर्मात्याची भूमिका उत्तम
वठवणाऱ्या या नटाने तीच भूमिका या पुढे चालू ठेवावी हे अपेक्षित. श्रुती हासनमध्ये
बापाचे क्रोमोसोम्स आहेतच पण निसर्गाने अभिनयाचे गुणसुत्र मात्र टाकायला विसरला
असं एकूण हिंदीतल्या तिच्या अभिनयात दिसून येतं. शायनी अहुजाने अशा सिनेमातनं ‘घर
वापसी’ का केली हा प्रश्न पडतो.
आपले अभिनेते समोर येईल
त्या प्रोजेक्टमध्ये जीव ओतून अभिनय करून सिनेमा तारून नेतात हेच या सिनेमाने परत
एकदा अधोरेखित केले आहे.




Comments