दुनियादारी : रुपांतरीत मेलोड्रामा
चित्रपटाचा लेखक आणि दिग्दर्शक यांची कामगिरी जवळपास
तुल्यबळ असते. दिग्दर्शकाचा दर्जा थोडा वर जातो कारण चित्रपट प्रत्यक्ष उभा
करण्याची जबाबदारी ही त्याच्या खांद्यावर असते. छायाचित्रणापासून नेपथ्यापर्यंत
आणि अभिनयापासून संकलनापर्यंत ज्या गोष्टी विविध कलावंत/तंत्रज्ञांमध्ये
विभागलेल्या असतात त्यांच्याकडून एकसंध कामगिरी काढून घेणे हे त्याच्या हातात
असतं. मात्र ही कामगिरी काय प्रकारची असावी याची दृष्टी जर अचूक असायला हवी असेल
तर त्या दृष्टीमागे लेखक आणि दिग्दर्शक या दोघांचाही सहभाग लागतो. या दृष्टीत
एकसंधता यावी आणि तडजोड करावी लागू नये म्हणून काही वेळा दिग्दर्शक स्वतःच
संहिताही लिहू पाहतात. मात्र हे तात्पुरता मतभेद टाळणारं असलं तरी चित्रपटाच्या
दृष्टीने न्याय नाही. लेखक आणि दिग्दर्शक हे एकाच कथेसाठी काम करत असले तरी
त्यांची विचार करण्याची पद्धत बरीच वेगवेगळी असते. लेखकाच्या डोक्यात महत्त्व असतं
ते आशयाला तर दिग्दर्शक बहुधा सादरीकरणाचा विचार करत असतो. त्यामुळे जर
दिग्दर्शकाने एकट्याने पटकथा लिहिली तर तो जे सांगायचं आहे त्याला महत्त्व
देण्याऐवजी चित्रपटाच्या दृश्यात्मकतेवर अधिक भर देईल अशी शक्यता तयार होते. जर
लेखक आणि दिग्दर्शक हे स्वतंत्रपणे मात्र परस्परांबरोबर काम करण्याच्या तयारीने
चित्रपटात सहभागी झाले तर तयार होणारा चित्रपट नक्कीच अधिक यशस्वी होतो. -- गणेश मतकरी पटकथा आणि
प्रेक्षक १ मुक्त शब्द सप्टें. '१३
हा चित्रपट या परिच्छेदाचं उत्तम उदाहरण म्हणून बघता येईल. गंमत म्हणजे संजयनी एका
मुलाखतीत सांगितलं की त्यांनी याचे तेरा ड्राफ्ट्स लिहिलेले आहेत. चित्रपट बघताना
ते कुठंही दिसून येत नाही. तेरा ड्राफ्ट्स लिहिले असतील तर तुकड्या तुकड्यात
चित्रपट का आहे तसेच एका प्रसंगामधून दुसऱ्या प्रसंगात जाताना सफाईदारपणा का नाही हे खटकत राहतं.
कादंबरीत सुहास शिरवळकर त्यांच्या शब्दचित्र उभ्या करण्याच्या हातोटीने कॉलेज लाईफमधील
दुनियादारीचे धडे शिकवतात पण चित्रपटात ते कुठही दिसून येत नाही. अभिनेते थोराड चेहऱ्याचे अन् तिशी उलटलेले असल्यामुळे
आपण प्रौढांच्या कॉलेजातील गमतीजमती बघत आहोत असं वाटतं.
चित्रपट श्रेयस कॉलेजात
प्रवेश घेतो इथून न चालू होता शिरीन अन् प्रीतम त्याच्या वाढदिवसाला पुण्याला जातात ते पण आजी-आजोबा झालेल्या अवस्थेत
पासून चालू होतो. कादंबरीत तो नायक चाळीशीला आलेला असतो त्यामुळे ते समजून घेता
येतं पण चित्रपट उसनंनाट्य घेत कादंबरीचा आत्मा काढून टाकतो. दिग्दर्शक लेखक
झाल्यावर एखाद्या चांगल्या कलाकृतीचं मातेरं होऊ शकतं हे मला जास्त लागलं. यातून
एक गोष्ट अधोरेखित झाली ती म्हणजे मराठी सिनेमाला निष्णात पटकथाकारांची तातडीने
गरज आहे. मला तीन उदाहरणं आठवतात ज्यात दिग्दर्शकाने लेखक म्हणून चित्रपट उत्तम
लिहिलाय अन् तो यशस्वी पण झालाय.
पहिलं: सत्यजित रे (पथेर पांचाली)
दुसरं: राजकुमार हिरानी (थ्री इडियट्स)
तिसरं: राकेश ओमप्रकाश मेहरा (रंग दे बसंती)
एखाद्या कादंबरीचं रुपांतर कसं करावं याचं चांगलं उदाहरण म्हणजे पथेर पांचाली.
रेंनी फक्त जो भाग त्यांना आवडला तोच घेतला त्यामुळे चित्रपटात गोंधळ दिसून येत
नाही पण हा चित्रपट आपल्याला गोंधळात पाडतो. कादंबरीचा सगळा भाग घ्यायच्या नादात
पात्रं उभी राहत नाहीत. छोट्या-छोट्या प्रसंगातून कथेचा आकार चढत गेला पाहिजे
म्हणजे कळसाध्याय आला की आपण खुर्ची सावरून बसतो पण चित्रपट तामिळ मसाला
मुव्हीसारखा नाट्यमय मेलोड्रामा पेश करतो. शेवट तर पोट धरून हसावं इतका बाळबोध
आहे. मराठी सिनेमाने अगणित तमाशापट, विनोदपट दिलेत. आता मेलोड्रामापट
येण्याचा ट्रेंड सेटर म्हणून ह्या सिनेमाने प्रचंड प्रमाणात यशस्वी होऊन पहिलं
पाऊल टाकलं आहे. काळ लवकरच सोकावणार आहे. तयार असा. बाकी काय बोलू. कॉलेजात असताना वेड लावलं होतं कादंबरीने. लवकरच
कादंबरी खरेदी करून वाचणार आहे.




Comments