मिशन इम्पॉसिबल रोग नेशन : वेलकम टू आयएमएफ
वर्ष : १९९७/९८ स्थळ : लातूर थिएटर : यशोदा वेळ : १२ ते ३ सीट : बाल्कनीत उजव्या बाजूच्या एन्ट्रसच्या वरील बाजूस. मिशन इम्पॉसिबल नावाचा एक सिनेमा वरील थिएटरला आलाय. त्यात टॉम क्रूझ नावाचा चिकनाबांड नट आहे व तो अमेरिकेत धुमाकूळ घालतोय इतकी माहिती पेपरात वाचलेली. ज्युरासिक पार्कमुळे हॉलीवूडचे सिनेमे नाद खुळा असणारे आणि हिंदी सिनेमांपेक्षा वेगळे असतात हे तो पर्यंत पक्कं कळलेलं. हॉलीवूड सिनेमे लातुरात तेव्हा जवळ-जवळ दहा बारा महिन्यांनी यायचे. त्यामुळे हा सिनेमा इतका उशिरा येतोय म्हणजेच आपल्या छोटेखानी आयुष्यात वादळ आणणार. यथावकाश यशोदाच्या बाल्कनीत इथन हंटने त्याचे हावभाव आणि प्रभावी पुरुषी प्रतिमेने मेंदूचा भाग हळूहळू कुरतडायला सुरुवात केलेली. शेवटच्या लंडन-पॅरीस टीजीव्ही ट्रेनच्या मारामारीच्या सीनने आणि त्या इलेक्ट्रिफाईंग संगीताने तर इथन हंट जेम्स बॉंडसोबत आयुष्याच्या भाग होणार हे पक्कं झालं. आता पुढे हंटच्या कारनाम्यांचे साक्षीदार होणे हे घरचं कार्य झालं. २००० साली दुसरा भाग आला. तेव्हा लातुरात पायरेटेड सीडीज नाहीतर व्हीडीओ कॅसेट्स दुबईवरनं यायचे म्हणे. स्...