मिशन इम्पॉसिबल रोग नेशन : वेलकम टू आयएमएफ

वर्ष : १९९७/९८
स्थळ : लातूर
थिएटर : यशोदा
वेळ : १२ ते ३
सीट : बाल्कनीत उजव्या बाजूच्या एन्ट्रसच्या वरील बाजूस.

मिशन इम्पॉसिबल नावाचा एक सिनेमा वरील थिएटरला आलाय. त्यात टॉम क्रूझ नावाचा चिकनाबांड नट आहे व तो अमेरिकेत धुमाकूळ घालतोय इतकी माहिती पेपरात वाचलेली. ज्युरासिक पार्कमुळे हॉलीवूडचे सिनेमे नाद खुळा असणारे आणि हिंदी सिनेमांपेक्षा वेगळे असतात हे तो पर्यंत पक्कं कळलेलं. हॉलीवूड सिनेमे लातुरात तेव्हा जवळ-जवळ दहा बारा महिन्यांनी यायचे. त्यामुळे हा सिनेमा इतका उशिरा येतोय म्हणजेच आपल्या छोटेखानी आयुष्यात वादळ आणणार. यथावकाश यशोदाच्या बाल्कनीत इथन हंटने त्याचे हावभाव आणि प्रभावी पुरुषी प्रतिमेने मेंदूचा भाग हळूहळू कुरतडायला सुरुवात केलेली. शेवटच्या लंडन-पॅरीस टीजीव्ही ट्रेनच्या मारामारीच्या सीनने आणि त्या इलेक्ट्रिफाईंग संगीताने तर इथन हंट जेम्स बॉंडसोबत आयुष्याच्या भाग होणार हे पक्कं झालं. आता पुढे हंटच्या कारनाम्यांचे साक्षीदार होणे हे घरचं कार्य झालं.

२००० साली दुसरा भाग आला. तेव्हा लातुरात पायरेटेड सीडीज नाहीतर व्हीडीओ कॅसेट्स दुबईवरनं यायचे म्हणे. स्पीड सिनेमाचा दुसरा भाग असाच प्रदर्शनाच्या आधी लातुरात सपना व्हीडीओ पार्लरवर बघितला होता. एका मित्राच्या कॉम्प्युटरवर त्याची लो क्वालिटी प्रिंट बघितली. त्याच्या तीन वर्षांपूर्वी जॉन वूच्या फेस ऑफबद्दल मटामध्ये मुकेश माचकरांच्या बिंब प्रतिबिंब लेखात वाचलं होतं त्यामुळे प्रचंड उत्सुकता होती. परत एकदा यशोदातच बघितला. जॉन वू काय चीज आहे ते अनुभवलं. सिनेमाचा अॅक्शनवर असणारा भर जो आजही कायम आहे याच्यापासून त्याची सुरुवात झाली. वूच्या स्लो मोशन आणि कायनेटिक अॅक्शन दाखवण्याची शैली मनात घर करून राहिली. खरंतर त्याच्या हार्ड टार्गेटमध्ये त्याची शैली वेगळी आहे हे जाणवलं होतं. इथनच्या स्पायगिरीला अॅक्शनचा तडका इतपत दुसरा भाग आवडला. आता पुढे काय वाढून ठेवलंय याची चिंता लागून राहिलेली.

तिसरा भाग आला २००६ साली. मधल्या सहा वर्षात हंट गायब होता. त्यावेळेपर्यंत लातुरात नदी नसल्यामुळे आणि त्यावर पूल नसला तरी त्या खालनं बरचसं पाणी गेलेलं होतं. सिनेमाची नशा चढायला लागलीय याची जाणीव विविध मासिकात आणि दिवाळी अंकातील लेखांद्वारे उमजायला लागली होती. तो पर्यंत बीए करून एमए इंग्रजीतच करायचं आणि ते पण ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या पुण्यातल्या फर्गसन कॉलेजात असं ठरलं. नशिबानीच फर्गसन कॉलेजात प्रवेश मिळाला. नवीन शहर, नवीन लोक, सगळं नवीन त्यामुळे लातूरसारख्या छोट्या शहरातनं आल्यामुळे जुळवून घ्यायलाच वर्ष लागलं. एमआयचा तिसरा भाग आला होता. अलकाला त्याचे शोज होते पण काही कारणामुळे बघायला जमला नाही. कधीतरी टीव्हीवर बघितला. नाही आवडला. हंट असा येडच्यापसारखा का करतोय ते कळलं नाही. कदाचित माझ्यात झालेले बदल सिनेमाचं आकलन करायला कमी पडत असावेत. पण नंतर सुद्धा बघताना तो पटला नाही.

साल २०११. एमए होऊन तीन वर्ष झालेले. पुढे काय या प्रश्नासोबतच व्यक्तिगत आयुष्यात खूपच उलथापालथ झालेली. त्यातच हंट चौथा भाग घेऊन अवतरलेला. तरीही बघितला. पुण्यात असल्यामुळे युनिव्हर्सिटी रोडवर असणाऱ्या ई-स्क्वेअरमध्ये. बुर्ज खलिफावर चढाई करणारा अचाट हंट तर बास पैसा वसूल. चारही सिनेमे बघताना न जाणवलेली पण नंतर लक्षात आलेली गोष्ट म्हणजे अतिशय वेगळी शैली असणारे चार दिग्दर्शकांनी या सिरीजला चार चांद लावलेत. प्रत्येकाने आपापल्या नजरेतनं इथनला पेश केलंय त्यामुळे त्यातील फ्रेशनेस चित्रपटागणिक वाढत जातेय. ब्रायन डी पामच्या प्रतिमा प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी कथानकाचा वापर करणारी पद्धत आणि ब्रॅड बर्डची लाईव्ह अॅक्शनमध्ये पेस ठेवून हंटची प्रतिमा मोठी करायची पद्धत यात पडलेला फरक लगेच जाणवला. कदाचित या पूर्वी इन्क्रेडिबल्स आणि द आयरन जायंटमध्ये काम केलेला परिणाम असावा अशी शंका आली. पण त्याने हंटच्या चाहतेपणावर ओरखडा उमटला नाही.

या वर्षी पाचवा भाग आला. हंटच्या कारानाम्यांमध्ये खूप काही भर घातलेली नसली तरी परत एकदा नवीन दिग्दर्शक. परत एकदा नवीन दृष्टीकोन. त्यामुळे या पुढेही हंट अजून बरंच काही घेऊन येणार हे नक्की. यावेळी लातूरच्या मल्टीप्लेक्समध्ये बघितला. एकोणीस वर्षांपूर्वी एका सिंगल थिएटरसोबत सुरु असलेला हा ऋणानुबंध मधल्या काळातल्या बदललेल्या आजूबाजूच्या परिस्थितीशी दमछाक करवत व जुळवून घेत चालूच आहे.

व्यावसायिक सिनेमाचं हेच गमक असावं का की ते खऱ्या आयुष्यात काय घडतं याच्याशी थोडसं एका हाताचं अंतर ठेवून मनोरंजन या गोष्टीवर बिनधास्त राहून आपलं काम करत असतात. 

Comments