हायवे एक सेल्फी आरपार : आयुष्याचा कोलाज
प्रवास सर्वचजण
करतात. कधी स्वतःच्या वाहनाने, कधी खाजगी नाहीतर सरकारी बसने, कधी टॅक्सीत तर कधी
ट्रकने. हा प्रवास कोणत्या आर्थिक थरातले आहात तसेच कुठे जायचे आहे यावर अवलंबून
असतो. म्हणजे एखादी एनआरआय व्यक्ती ट्रकमध्ये लिफ्ट घेऊन प्रवास करणार नाही की
ज्याची आर्थिक परिस्थिती खूपच कमी आहे ज्याला सरकारी किंवा खाजगी बस परवडणार नाही
तो भाड्याने कार किंवा टॅक्सी नाही घेणार. तसच प्रवास आड बाजूच्या रस्त्याने न
करता एखाद्या हायवेवर किंवा एक्स्प्रेस हायवेवर होणार असेल तर प्रवास करणाऱ्यासोबत
असंख्य लोकं इतर गाड्यांमध्ये असतात. त्यावेळी जो व्यक्ती ज्या वाहनातून जात असेल
तो आजूबाजूच्या गाड्यात कोण लोकं आहेत याचा विचार करत नाही. तो त्यांच्या
आयुष्याला कुठेही छेदणार नाही किंवा ते त्याच्या आयुष्यात येऊन गोंधळ घालणार
नाहीत. तरीही प्रवासा दरम्यान कधीतरी एखादा प्रवासी दुसऱ्याचा विचार करत असेल का!
करतात का नाही हे सांगता नाही येत पण उमेश कुलकर्णी आणि गिरीश कुलकर्णी या
पटकथाकार-दिग्दर्शक जोडीने तसा विचार केलेला आहे.
हायवे सिनेमा चालू
होतो मुंबईतल्या नेहमीच्या सकाळी. पडद्यावर दिसतं असंख्य पात्र वेगवेगळ्या आर्थिक
थरातली कुठल्या ना कुठल्या कारमध्ये नाहीतर तत्सम वाहनात चढतायत. त्यांना कुठेतरी
जायचं आहे. यात दिसतं एक एनआरआय (गिरीश कुलकर्णी), एक उच्चभ्रू स्त्री (टिस्का
चोप्रा), एक सिरीअल्समध्ये काम करणारी अभिनेत्री (हुमा कुरेशी) आणि एका टॅक्सीत
चढणारे एक तरुणी (मुक्ता बर्वे) व तिची अक्का. या व्यतिरिक्त अजून बरीच लहान-मोठी
पात्र आहेत ज्यांची कामे जानेमाने अभिनेत्यांनी केली आहेत. त्यांचा प्रवास असंख्य
कटकटीने सुरु होतो. प्रत्येकाला पुण्याला जायचं असतं. त्यामुळे मुंबईतल्या
वेगवेगळ्या भागातून आलेली ही मंडळी वेस्टर्न एक्प्रेस हायवेवर येतात. ते एकमेकाला
ओळखत नाहीत. तरीही प्रेक्षकांना ती ओळखीची वाटतात कारण पटकथाकार गिरीश व दिग्दर्शक
उमेश यांच्या दृष्टीकोनामुळे. गिरीश-उमेश वेस्टर्न एक्प्रेस हायवेलाच नायक बनवतात
त्यामुळे त्या हायवेच्या सानिध्यात येणाऱ्या व्यक्ती ह्या त्या तेवढ्या
काळापुरत्या नायक-नायिका बनतात. त्यामुळे या प्रवाशांनी केलेला प्रवास हे सिनेमाचं
मुख्य सूत्र बनतं.
पहिल्या प्रथम
गिरीश-उमेशचं कौतुक करायला हवं ते असा विषय निवडल्याबद्दल. मराठीत किंवा इतर
भारतीय भाषात असा धाडसी विषय गेल्या काही वर्षात पडद्यावर आलाय असं बघण्यात नाही.
तसेच विषय निवडून त्यावर चांगली पटकथा लिहून ती पडद्यावर उभी करणे तर दुर्मिळच
ठरावं. मुळात सिनेमाला एक विशिष्ट कळसाध्याय असणारी कथा नाही. प्रवास हीच कथा. एका
बिझी रोडवर दिसणाऱ्या असंख्य गाड्या आणि त्यातली माणसं इतकाच ऐवज. असा ऐवज पारंपारिक
कथेत गुंफण्यापेक्षा त्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे बघण्याचा प्रयत्न. तरीही
नुसतं आयुष्यात डोकावण्यापेक्षा त्यांच्यात काही बदल घडतो का हे सुद्धा पटकथाकार-दिग्दर्शक
दाखवण्याचा प्रयत्न करतात.
प्रयत्न स्तुत्य असला
तरी खूप गोड खाल्लं की त्याचं अपचन होणार या न्यायाने असंख्य पात्र, त्यांची पार्श्वभूमी,
त्यांना दिलेला वेळ यामुळे प्रेक्षकांना नेमकं कुणावर लक्ष केंद्रित करायचं हे
लक्षात येत नाही. पारंपारिक कथेत एक नायक-एक नायिका किंवा त्यांचं कुटुंबीय असणार.
त्यांच्या सोबत प्रवास करत सिनेमा बघणे हे प्रेक्षकांना अपेक्षित. इथे कुणीही
मुख्य पात्र नाही. त्यांचा विशिष्ट उद्देश असणारी दिशा नाही. इथला पुण्याला जाण्याचा
उद्देश सोडला तर प्रवासा दरम्यात येणाऱ्या अनुभवातून त्यांनी काय घेतलं हे बघणं आहे.
हे पारंपारिक सिनेमाला छेदणारं असलं तरी पडद्यावर म्हणावं तितकं प्रभावीपणे आलेलं
नाही. पटकथाकार-दिग्दर्शकांनी सर्व थरातली माणसं यात यायला हवीत या अट्टहासापायी
बऱ्याच पात्रांवर अन्याय केल्यासारखं वाटतं. उदा. नागराज मंजुळेंची कथा. ती असायलाच
हवी का अशी शंका येते किंवा एक बाप व त्याचं मूक-बधीर पोरगं यांची शिवनेरीतली कथा.
मध्यंतरानंतर यातल्या बऱ्याच जणांबद्दल ठोस असं बघायला मिळत नाही त्यामुळे
प्रेक्षकांची निराशा होण्याची शक्यता आहे.
सरतेशेवटी या
सिनेमाचा प्रेक्षक कोण? चोखंदळ प्रेक्षकांसाठी हा सिनेमा म्हणजे नेहमीच्या सिनेमापेक्षा
वेगळा अनुभव ठरणार यात शंका नाही. उर्वरित प्रेक्षक याकडे कसा बघतो हे महत्वाचे
कारण हा खरा प्रेक्षक. यांना यातील गंमत पटली तर सिनेमा सर्वांपर्यंत पोचला म्हणायला
वाव आहे. जर नाही तर मराठीत वेगळं काही घडतच नाही असं म्हणण्याला अर्थ नाही.
त्यामुळे आपण कोणत्या बाजूला आहोत हे आपणच ठरवायचं.




Comments