दुसरी गोष्ट : आशयात कमकुवत

आजचा दिवस माझा साठी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णींना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांच्याकडून अपेक्षा वाढणं साहजिक आहे. आजचा दिवस माझाची थीम लहानशी होती. स्वतःच्या गुर्मीत असणाऱ्या मुख्यमंत्र्याकडून एका वृद्ध गायकाचा अपमान होतो त्याचे शल्य कमी करण्यासाठी ते एका रात्रीतून सरकारी यंत्रणा हलवून त्यांना सरकारने देऊ केलेला फ्लॅट मिळवून देतात. सरकारी यंत्रणा किती निर्ढावलेली आहे जर राज्याच्या मुख्यमंत्र्याने मनावर घेतले तर अधिकाराचा वापर करून कामं सुरळीत करू शकतात असा संदेश त्यात दिलेला होता. पटकथेने अतर्क्य गोष्टी न मांडता टप्याटप्याने मुख्यमंत्री काम कसे करतात हे चांगल्या पद्धतीने दाखवले होते. वास्तव आयुष्यात हे शक्य नाही तरी त्या पाठीमागचा विचार पोचवण्यासाठी कथानकाने ते काम चोखपणे पार पडले होते. तरीही सिनेमाने म्हणावा तसा प्रभाव पाडला नव्हता.

चंद्रकांत कुलकर्णींनी पुढील सिनेमासाठी एक भव्य विषय का निवडला हा एक प्रश्न इथे उपस्थित होतो. या सिनेमाचा केंद्रबिंदू असणारी दगडू ऊर्फ प्रसन्नकुमार शिंदे (तीन वेगवेगळ्या वयोगटातले विक्रम गोखले, संदीप मेहता व सिद्धांत चांदेकर उतरत्या क्रमाने) ही व्यक्तिरेखा माजी केंद्रीय गृहमंत्री व मुख्यमंत्री सुशीकुमार शिंदे यांच्या आयुष्यावर बेतलेली आहे हे कुणालाही चटकन लक्षात येईल. शिंदेंच्या राजकीय कारकिर्दीत अजमल कसाबची फाशी हा महत्त्वाचा अन् कठीण प्रसंग होता.  तो त्यांनी कसा निभावला हे आपण वाचले आणि टीव्हीवर पाहिले आहे. सिनेमाची सुरुवात प्रसन्नकुमार शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अजमल कसाब सदृश गुन्हेगाराला फाशी देण्याच्या निर्णयाने होते. फाशीची अंमलबजावणी करून शिंदे घरी येतात आणि घरातल्या एका खोलीत आठवण म्हणून ठेवलेल्या लहानपणापासूनच्या गोष्टी बघायला लागतात अन् जुन्या आठवणीत हरवून जातात. तिथनं सिनेमा थेट जातो सोलापुरात दगडूच्या लहानपणी. तिथून त्याच्या संघर्षाची कथा सांगायला सुरुवात करतो.

आपल्याकडे चरित्रपट म्हणून जे चित्रपट बनवले जातात त्यावर आत्तापर्यंत सर्व बाजूंनी चर्चा झाली आहे. तरीही परत असा चरित्रपट बनवण्यात आला आहे ज्यात पूर्वीच्याच चुका चित्रकर्त्यांनी अधोरेखित केल्या आहेत. या सिनेमाची सुरुवात शिंदेंच्या लहानपणापासून होते. त्यांनी काय व कसा संघर्ष केला हे तपशीलात दाखवले जाते पण त्यातील काय भाग निवडावा, काय सोडवा, प्रसंग कसे असावेत, पात्रांची भाषा कशी असावी, त्यांचा पेहराव कसा असावा, त्यांच्या अवकाशात कोणत्या गोष्टी असाव्यात याचा विचार मात्र केलेला दिसत नाही. शिंदे ज्या सोलापूर परिसरात लहानाचे मोठे झाले तिथली भाषा संवादात वापरावी याची काळजी पटकथाकारांनी घेतली नाही. 

पश्चिम महाराष्ट्रात जी भाषा बोलली जाते तशीच भाषा इथली पात्रं बोलतात. तीच गत प्रसंगांची, अभिनयाची. लहानपणीचे प्रसंग कृत्रिम, बटबटीत अन् नाटकी वाटतात. तसेच पुढील आयुष्यातले सुद्धा. कित्येक प्रसंगात आपण चित्रपट न बघता नाटक बघत आहोत असा भास होतो. व्यक्तिरेखा म्हणून एकही पात्र उभं राहत नाही. सिनेमात असा एकही प्रसंग नाही ज्यात शिंदेंची दोलायमान अवस्था दिसून येईल. सिनेमाचा वेग इतका आहे की एकही प्रसंग लक्षात राहत नाही. टीव्हीवरच्या जाहिरातीसारखी झटकन या ठिकाणाहून त्या ठिकाणी प्रसंग घडतात त्यामुळे अमुक एका ठिकाणी ते तसे का वागले याची कारणमीमांसा आपल्यापर्यंत पोचवली जात नाही. पाठीमागे कानठळ्या बसवणारं पार्श्वसंगीत वाजत असतं त्यामुळे तद्दन हिंदी व्यावसायिक सिनेमा बघतोय असं वाटत राहतं. कथानक सांगण्यापेक्षा प्रसंगांची मालिका सादर करावी तसे एकामागून एक प्रसंग दाखवले जातात. सिनेमाची समरस होणे दुरापास्त होते.

जागतिक सिनेमातले चरित्रपट बघितले तर त्यात त्या व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्याचा पट न मांडता शक्यतो त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना घेऊन त्यावर उत्तम अभ्यास करून ते सखोलपणे दाखवले जातात. आशयाकडे जास्त लक्ष पुरवलेलं असतं. आपल्याकडे सिनेमा उभा करायचा म्हणजे दृश्यचौकट उभी करायची याकडेच दिग्दर्शक आणि त्यांची टीम लक्ष देते असं दिसतं त्यामुळे आशयाकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं जातं. या सिनेमात सुद्धा फक्त दृश्य किती काळाबरहुकूम आहेत हेच बघण्यात आलं आहे. त्याचा फटका व्यक्तिरेखा कचकड्याच्या होण्याला झाला आहे. व्यक्तिरेखा कचकड्याच्या झाल्या की प्रेक्षक समरस होत नाही. प्रेक्षक समरस नाही झाला तर सिनेमाचा प्रभाव झपाट्याने कमी व्हायला लागतो. सर्वच कलाकारांचा उत्तम अभिनय हीच काय ती सिनेमाला धरून ठेवणारी गोष्ट. उरलेल्या विभागात पाठीमागच्या पानावरनं पुढे चालू असं या सिनेमाचं झालं आहे.

Comments