यंगिस्तान : सरप्राईज पॅकेज

स्टार असणारा अभिनेता नसेल तरी ज्याने आजपर्यंत दखल घेण्याइतपत सुद्धा अभिनय केलेला नसेल आणि ज्यात आजच्या काळातले तीन महत्त्वाचे अनुभवी, समजूतदार अभिनेते असतील तर त्या सिनेमाकडून काय अपेक्षा ठेवायच्यामला हा प्रश्न सिनेमाला जाताना पडला होता. दुसरं कारण सिनेमात असणारा राजकारण हा विषय. राजकारण, राजकीय नेत्यांवर आधारित सिनेमे आपल्या इथे तितकेसे प्रभावी नाहीत. त्यामुळे हा सिनेमा बघताना मी साशंक होतो. पण सिनेमाने कुठेही निराशा केली नाही उलट एक छान कथा चांगल्या पटकथेद्वारे एक पटणारा सिनेमा म्हणून समोर येते. 

अभिमन्यू कौल (जॅकी भगनानी) हा जपानमध्ये एका कॉम्प्युटर गेम्स बनवणाऱ्या कंपनीत कामाला असतो. त्याची एक लिव्ह-ईन रिलेशनशिपमधली मैत्रीण पण असते. महिन्याला सहा लाख रुपये पगार असणारा हा अठ्ठावीस वर्षाचा तरुण त्याच्या वयाला साजेसं स्वच्छंदी आयुष्य जगात असतो अन् एका दुर्दैवी घटनेमुळे त्याचं आयुष्य बदलून जातं. त्याचे वडील मृत्यूशय्येवर असतात. त्याच्याकडून एक वचन घेऊन प्राण त्यागतात. तो भारतात येतो. अखिल भारतीय क्रांती पार्टीच्या शिफारशीवर भारताचा पंतप्रधान होतो. त्याचे वडील पंतप्रधान असतात त्यामुळे त्याला त्यांचा वारसा चालवायला चान्स मिळतो. पार्टीचे अनुभवी अन् ज्येष्ठ लोक सहा महिने मुख्य निवडणुकीसाठी राहिलेले असल्यामुळे हे तरुण पोरगं असे काय कामं करणार म्हणून त्याला स्वतःच्या स्वार्थासाठी पंतप्रधान करतात. मग सुरुवातीला गोंधळलेला हा तरुण आपले दात दाखवायला लागतो तेव्हा त्यांची पाचावर धारण बसते. ही पाचावर धारण कशी बसते, तो तरुण कशी मिळालेल्या संधीचा फायदा उठवतो ते पडद्यावरच पाहणे योग्य.

या सिनेमाची चांगली गोष्ट म्हणजे ज्येष्ठ चित्रपट समीक्षक गणेश मतकरी त्यांच्या परीक्षणात नेहमी एक गोष्टीचा उल्लेख करत असतात तो म्हणजे प्रत्येक सिनेमा हा स्वतःची चित्रचौकट घेऊन येत असतो आणि त्याची स्वतःची एका तार्किकता असते तो ही तार्किकता कशी वापरतो हे बघणं महत्वाचं असतं. याचा दुसरा अर्थ असा भयपट, चरित्रपट किंवा वास्तववादी सिनेमाची तार्किकता ही त्याच्या कथानकावर अवलंबून असते तुम्ही ती चौकट किंवा तार्किकता इतरांना लावू शकत नाहीत. त्यामुळे त्याचं मूल्यमापन त्या-त्या चौकटीतच व्हायला पाहिजे. हा सिनेमा त्यांच्या या सिद्धांताचं उत्तम उदाहरण आहे. या सिनेमात कच्चे दुवे बरेच आहेत पण पटकथाकारांनी आणि दिग्दर्शकाने त्यांच्या सहित त्यांना काय दाखवायचे आहे यावर लक्ष केंद्रित करून सिनेमा फुलवला आहे.

यात काही रहस्य आहेत जे टप्याटप्यावर अभिमन्यूच्या कृतीची कारणमीमांसा म्हणून येतात. मला सरप्राईज काय वाटलं तर त्याचं आल्फ्रेड हिचकॉकच्या मॅकगफिन या संकल्पनेचा कथानकात वापर. अभिमन्यू लिव्ह-ईन रिलेशनमध्ये असतो ही गोष्ट जेव्हा लोकांना कळते तेव्हा गहजब होतो पण एकूण सिनेमात या गोष्टीचं महत्त्व अतिशय नगण्य आहे. मला माहित नाही पटकथाकार आणि दिग्दर्शक यांनी जाणूनबुजून हे केलं आहे का पण आपल्यासाठी ते महत्त्वाचे राहत नाही. ती गोष्ट प्लॉट डिव्हाइस म्हणून सुद्धा येत नाही.

खूप वर्षांपूर्वी मुघल-ए-आझममध्ये के. असिफ यांनी सलीमच्या तोंडी गाणी न देण्याला एक कारणमीमांसा दिली होती ती अशी की तो एका राजाचा पुत्र आहे आणि एका राज्याचा भावी सुलतान, तो गाणी कशी काय म्हणू शकतो. हीच तार्किकता पुढे १९६६ मध्ये आलेल्या आम्रपालीमध्ये लेख टंडन यांनी सुनील दत्ताच्या तोंडी तो एका राज्याचा राजा असल्यामुळे गाणी न देण्याचा निर्णय राबवला होता. हे काळाचं भान अलीकडे जोधा-अकबरमध्ये आशुतोष गोवारीकरांनी मस्तपैकी धाब्यावर बसवलं होतं. त्यात अकबर एका गाण्यात चक्क डान्स करतो. या सिनेमात मात्र जपानमध्ये पबमध्ये धुमाकूळ घालणारा स्वच्छंदी युवक जेव्हा एका देशाचा पंतप्रधान होतो तेव्हा आग्र्यात ताजमहल पाहायला गेल्यावर आपल्या मैत्रिणीसोबत धिंगामस्ती करतो तेव्हा गाणं म्हणत नाही. पाठीमागे मात्र गाणं वाजत असतं. यासाठी आपण दिग्दर्शकाला धन्यवाद द्यायला हवं.

जाता जाता सिनेमात जॅकी भगनानी सोडला तर सर्वांचे काम छान आहेत. एकुणात एक चांगला राजकीय सिनेमा.

Comments