दहावी फ : वस्तुस्थितीपासून फारकत घेणारा सकारात्मक पलायनवादी

२००२ साली जेव्हा हा सिनेमा प्रदर्शित झाला होता तेव्हा मी नापास होण्याच्या तिसऱ्या वर्षात होतो (एकूण पाच वर्ष नापास होतो.). सिनेमा बघितला असता तर कदाचित त्यातील कथानकाला भारावून जाऊन रडलो सुद्धा असतो. नंतर जेव्हा बीएस्सी सोडून बीए केलं तेव्हा आपण किती भयानक अनुभवातून गेलो आहोत याची तीव्रतेने जाणीव झाली. तसेच आजूबाजूची परिस्थिती या चित्रपटात दाखवलेली आहे तशी खचितच नाही हे पण लक्षात आलं. एमए नंतर हे अनुभव लिहून नापास मुलांची सद्यस्थिती काय आहे हे मांडावं म्हणून लातूर पॅटर्न नावाची कादंबरी लिहिली. काल रात्री जेव्हा मी हा सिनेमा बघितला तेव्हा मी ज्या अनुभवातून गेलो त्याचं पडद्यावर दर्शन होईल अशी इच्छा होती पण सिनेमाने खूप म्हणजे खूपच निराशा केली. 

हा सिनेमा मला सकारात्मक पलायनवादी वाटला. यातील दाखवलेली गोष्ट प्रत्यक्षात घडू शकते हे मान्य पण दिग्दर्शक-कथा-पटकथाकारांचा दृष्टीकोन शिक्षण घेणं हे किती गरजेचं आहे या वर भर देणारा वाटला. उदा. पट्या नावाचं एक पात्र आहे जे की त्याच्या काकाकडे राहत असतो. तो शाळा झाली की काकाला त्याच्या व्यवसायात मदत करत असतो. हा व याच्या तुकडीतले इतर जण सहामाही परीक्षेत नापास होतात तेव्हा हा काका म्हणतो शाळेत शिकून नोकरीच करणार आहात ना! त्यापेक्षा शाळा सोडून धंद्याला लागा. गंमत म्हणजे ज्या आर्थिक थरातली मुलं यात दाखवली आहेत ती घराला हातभार लावण्यासाठी फावल्या वेळात चार पैसे कमवत असतात. उलट त्याचं म्हणणं खरं असतं पण पटकथाकार अन दिग्दर्शकद्वयीचा दृष्टीकोन हा खूपच मर्यादित असल्यामुळे ही मुलं काकाचं म्हणणं डावलून शाळा अन् गणेश देशमुख (अतूल कुलकर्णी) या सरांचं ऐकतात. तो मुलगा एकदाही माझा काका असं असं म्हणतो तेव्हा तुमचं म्हणणं चुकीचं आहे असं ठणकावून म्हणत नाही का कारण मेकॉलेप्रणीत शाळकरी शिक्षण न घेतलं तर तुम्ही जगू शकत नाही या गोष्टीवरचा ठाम विश्वास.

दुसरा मुद्दा नापास झालेली मुलं ही गरिबांचीच का असतात. मध्यमवर्गीय आणि श्रीमंतांची मुलं नापास होत नाहीत का? इंजिनियर, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, बँक मॅनेजर यासारख्या समाजातल्या सो कॉल्ड लब्ध प्रतिष्ठित वर्गातल्या लोकांची मुलं शाळा ते कॉलेज दरम्यान एकदाही नापास होत नाहीत? तसेच दहावी फ ह्या तुकडीत मार्कानुसार विद्यार्थी असतात तर त्यात श्रीमंत किंवा मध्यमवर्गीय घरातली मुलं का नसतात? सिनेमात हे कुठंच दिसून येत नाही. म्हणजे ही मुलं जन्मतःच हुशारीचं बाळकडू घेऊन येतात असं समजायचं का? नापास होणारी मुलं सर्व थरातील असतात हे ढळढळीत सामाजिक वास्तव ही मंडळी का दुर्लक्षित करतात.

तिसरा मुद्दा भाषेचा. सिनेमात जी खालच्या थरातली मुलं दाखवलेली आहेत ती एकदाही मा****, भैं**, ल**, बु**, आय** किंवा माय**अश्या शिव्या देतच नाहीत. फक्त एके ठिकाणी गांडू ही शिवी येते ते पण ते पात्र इतक्या लवकर म्हणून जातं की आपल्याला ते परत ऐकण्यासाठी पाठीमागे जावं लागतं. मला सिनेमात एकदा तरी ती मुलं मुख्याध्यापकाला किंवा देशमुख सरांना मा**** म्हणतील अशी अपेक्षा होती कारण ही आर्थिक थरातली मुलं अशा शिव्या दिवसातून सतराशे साठ वेळा देतात. त्यांच्यावर झालेला अन्याय त्या भाषेतूनच येणं अपेक्षित होतं. सिनेमा जर सामाजिक विषयाला हात घालत असेल आणि समाजातल्या एका विशिष्ट थरातल्या लोकांना नायक बनवत असेल तर त्यांची भाषा त्यांच्या लहेज्यासहीत यायला नको. हे दिग्दर्शकद्वय गंभीर आणि प्रामाणिक प्रयत्नांसाठी पहिल्यापासून कौतुकास पात्र ठरलेले आहेत तर इतक्या महत्त्वाचा विषय मांडताना पात्रांची भाषा कशी असावी याची काळजी का घेऊ शकलेल नाहीत.

चौथा मुद्दा तादात्म्य पावण्याचा. मला सिनेमा बघताना मी कुठे यात आहे हे बघायचं होतं. सिनेमात अनावश्यकपणे येणारी गाणी, गणेश देशमुख या सराचा दाखवलेला भूतकाळ आणि नाटकी अन् कवितेसारखे लिहिलेले संवाद जे या मुलांच्या आयुष्याचा रखरखीतपणा कुठेही दाखवत नाहीत. त्यामुळे या घटकांनी मला तादात्म्य होण्यापासून एक हात दूर ठेवलं. सर्व पात्र ही एकतर सज्जन आणि गुलछबू वाटली. मुळात पटकथाकाराची मुल्यदृष्टीच सदोष असल्यामुळे लिखाणात वास्तवतेतून फारकत घेणारे पात्र उभे करण्यात आले आहेत.

पाचवा मुद्दा यातील वास्तववादी शक्यतेचा. यातील सिद्या, पट्यासारखी पात्र शाळेच्या परीक्षेत नापास होऊन पास होणारी दाखवली असतील. आपण असे गृहीत धरू की ती पुढे कॉलेजात जातील. तिथनं पुढे इंजिनियर-डॉक्टर-वकील वगैरे होतील तर ही मुलं परत तिथे नापास होणार नाहीत कशावरून? त्यावेळी पटकथाकार-दिग्दर्शक त्यांच्यावर दहावी फ भाग २, , ४ बनवणार का? परत त्यात सकारात्मक संदेश वगैरे देणार का? कारण लातूर पॅटर्न जेव्हा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होतं तेव्हा ज्येष्ठ वैज्ञानिक वसंत गोवारीकर म्हणाले होते ही मेरीटमध्ये आलेली मुलं इंग्रजी बोलू शकत नाहीत किंवा इंजिनियरिंग-मेडिकलला नापास होतात, त्याचं काय? म्हणजे दहावी-बारावीत खूप मार्क्स घेणं किंवा नापास होऊन पास होणं हीच आयुष्याची इतिकर्तव्यता!!! हे माझ्या आकलना पलीकडचं आहे. तसेच डिग्री घेऊन काही तरी मिळवणं महत्वाचं की शाळेची प्रयोगशाळा दुरुस्त करून दिली म्हणून आपल्या मुलांना अभिमानाने सांगणं महत्वाचं!!! डिग्री घेतल्या नंतर आपण एकतर नोकरी करतो किंवा व्यवसाय तरी कारण घराच्या जबाबदाऱ्या घेणं फर्स्ट प्रायोरिटी असते मग मी शाळेत किंवा कॉलेजात नापास होऊन पास झालो या गोष्टीला किती किंमत द्यायची. कारण आपल्या इथे तुम्ही किती शिकलात या पेक्षा किती पैसे कमावता याला आपल्या भूतकाळापेक्षा जास्त महत्व असते.

काल रात्री सिनेमा संपल्यावर खूप उशिरापर्यंत मी जागाच होतो कारण या सारखे असंख्य प्रश्न माझ्या डोक्यात थैमान घालत होते. या सिनेमाने माझी झोप उडवली कारण याने माझ्यासमोर एकही प्रश्न मांडला नाही. मला विचार करायला भाग पाडले नाही. अशा सकारात्मक पलायनवादी सिनेमाचा मी तीव्रतेने निषेध करतो.

[हा सिनेमा एका संदर्भासाठी बघितला होता त्यामुळे यात परीक्षणापेक्षा व्यक्तिगत प्रतिक्रियेला जास्त महत्व आलं आहे. साधारण दोनेक वर्षांपूर्वी लिहिलेला लेख आहे. यात बदल केलेले नाहीत.]

Comments