शॉट : नितळ प्रेम की....

शॉर्ट फिल्म ही त्याच्या चौकटीत परिपूर्ण असणे गरजेचे असते, ते का? एकतर त्याला वेळेची मर्यादा असते. अशी फिल्म फार तर चाळीस मिनिटांची असावी लागते त्यापेक्षा जास्त असेल तर ती फिचर फिल्म धरली जाते. याचा फायदा असा दिग्दर्शकाला थोड्या वेळात महत्वाचं आणि नेमकं दाखवून प्रेक्षकांना गुंतवून ठेवता येतं. हीच गोष्ट दिग्दर्शकासाठी उलटा परिणाम साधणारी असते. वेळेचं आणि आशयाचं भान सुटलं तर दिग्दर्शकाला आपण काय दाखवतोय हे लक्षात न येता परिणाम अप्रभावी ठरण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे या माध्यमाच्या मर्यादा आणि बलस्थानं लक्षात न घेता जर फिल्म बनवली तर आपसूकच ती दिग्दर्शकाच्या सृजनशीलतेवर मर्यादा आणू शकते. चांगल्या शॉर्ट फिल्म्स ह्या मर्यादित वेळेचा अनादर न करता उत्तम प्रकारे आशय मांडू शकतात. स्टीवन स्पीलबर्गची अॅम्ब्लीन आणि फिल व ओली या दिग्दर्शकद्वायींची द ब्लॅक होल या शॉर्ट फिल्म्स अशा प्रकारच्या फिल्म्स कशा असाव्यात याचा वस्तुपाठ ठराव्यात. दोन्हीत संवाद नाहीत पण ती मर्यादा प्रेक्षकांना विषय समजण्याच्या आड येत नाही. जर एखाद्या शॉर्ट फिल्ममध्ये संवाद असतील ते किती प्रभावी असू शकते हे शॉट ही ज्येष्ठ चित्रपट समीक्षक गणेश मतकरी लिखित आणि दिग्दर्शित शॉर्ट फिल्म बघून लक्षात येईल.

चित्रपट बनवताना प्रसंग चित्रित केले जातात. चित्रित करण्याआधी त्यातील कलाकारांना प्रसंगानुरूप मेक अप करायचा असतो. त्यांचा मेक अप होईपर्यंत दिग्दर्शक जो प्रसंग चित्रित करायचा आहे त्याची तयारी करत असतो म्हणजेच तो शॉट. त्या तयारी दरम्यान ते कलाकार काहीतरी बोलत/चर्चा करत असतीलच की. इथे श्रुती (मुक्ता बर्वे) आणि तिची सहकलाकार (सुप्रिया विनोद. तिचं नाव काय असतं हे शेवटपर्यंत सांगण्यात येत नाही. पण ती श्रुतीपेक्षा वयाने मोठी, ज्येष्ठ अभिनेत्री आणि सेटल्ड असते.) शेवटची तयारी म्हणून तो सीन वाचून घ्यायचं म्हणतात. सीन असतो दोन स्त्रियांनी किस करायचा. श्रुतीच्या म्हणण्यानुसार तो मराठीतला पहिलाच असा सीन असतो. तिची सहकलाकार हा सीन करायचा नाही असं म्हणते. श्रुतीला आश्चर्य वाटतं की स्क्रिप्टमध्ये स्पष्ट लिहिलेलं असताना ती ऐनवेळी का नको म्हणतेय याचं. ती सहकलाकार म्हणते तिला कुणा संघटनेच्या माणसाचा फोन येतो की असं केलंत तर तुमच्या तोंडाला काळं फासलं जाईल म्हणून. श्रुती तिला खुळचट ठरवून सीन करायचाच असं ठरवते.

गणेश मतकरी यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच प्रयत्न. पहिलाच प्रयत्न म्हणणे चुकीचे ठरावे इतका सफाईदार. तरीही त्यांच्यातला लेखक त्यांच्यावर कुरघोडी करतोय का अशी शंका यावी कारण त्यांनी निवडलेला विषय. आपल्या इथे सेन्सॉर बोर्डनामक संस्था आहे जी चित्रपटासारख्या कला माध्यमावर काही प्रमाणात का होईना अंकुश ठेवावा या उद्देशाने तिचं काम करत असते. पण गेल्या काही वर्षांपासून सेन्सॉर बाहेर समाजाने काय बघावे आणि काय बघू नये याची यादी देणाऱ्या काही अशासकीय संस्था/व्यक्ती पुढे आलेल्या आहेत ज्या कलाकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्यासाठी (अति) उत्सुक आहेत. त्यांच्या कृतींमुळे कलाकृतीचा निखळ आस्वाद घेणे दुरापास्त झाले आहे. गणेश अशाच एका कल्पित प्रसंगाला आपल्या छोटेखानी चित्रपटाचा मुख्य विषय बनवतात. त्यांच्यातला लेखक दिसतो तो या विषयाच्या निवडीमध्ये आणि त्याच्या संभाव्य परिणामाच्या शक्यतेमध्ये. कोणताही कलाकार इथे अभिनेता या अर्थाने काम करत असताना दुहेरी जीवन जगत असला पाहिजे म्हणजे तो करत असलेलं पात्र आणि त्याचं खरं आयुष्य. खऱ्या आयुष्यात तो काय करतो किंवा काय करत नाही हे त्याचं खाजगी आयुष्य असतं. पण जेव्हा काल्पनिक पात्राचं जगणं हे खऱ्या आयुष्यात समोर उभं राहिलं तर ती व्यक्ती म्हणून त्याकडे कशी बघेल. इथे गणेश कलाकृतीच्या बाहेर कलाकाराने वठवलेल्या पात्रांचा परिणाम आणि त्याच्या व्यक्तिगत भावविश्वावर होणारा परिणाम झाला तर काय होईल याची चाचपणी करायचा प्रयत्न करतात. हे एकाच वेळी दोन पातळ्यांवर घडतं जे की प्रेक्षकांसमोर थेट मांडलं जातं त्यामुळे त्याला प्रश्न पडतो आता पुढे काय? हे आता पुढे काय हेच या शॉर्ट फिल्मचं मर्म आहे.

क्वेन्टीन टॅरेंटिनो एका मुलाखतीत म्हणतो चित्रपट बनवण्यासाठी तुम्हाला अशी मंडळी हवीत जी तुमचं व्हिजन योग्यपणे पडद्यावर आणण्यासाठी प्रयत्न करतील. तुमचं काम त्यांच्याकडून नेमकेपणाने तुम्हाला हवं ते काढून घेण्याचं. इथे सिनेमॅटोग्राफर अमोल गोळे, संकलक सागर वंजारी, कलाकार मुक्ता बर्वे आणि सुप्रिया विनोद व इतर तांत्रिक मंडळी गणेशच व्हिजन प्रेक्षकांसमोर येण्यासाठी चोख काम करतात. त्यामुळे दिसणारा परिणाम अप्रतिम असा आहे. 

Comments