प्रणव सखदेव, कविता दातीर आणि बालाजी सूर्यवंशी.
जे घडून गेलं
त्याचा खेद नाही
पुढयात काय वाढलंय
याची चिंता नाही
आत्ता आहे
पृथ्वीवर आहे
पृथ्वी फिरतेय
स्वतः भोवती
सूर्याभोवती…
प्रणवने लिहिलेल्या कवितासंग्रहातील एका कवितेच्या वरील काही ओळी. सर्व कविता
आजच्या काळाशी निगडीत लिहिलेल्या आहेत त्यामुळे वाचायला सोप्या. माझ्यासारख्या
कवितेच्या जवळ न फिरकणाऱ्या माणसाला तर यांच्यातलं फार काही कळत नाही. तसेच मराठीत
सध्या कवितेत कोणता प्रवाह आहे किंवा नवं काय आहे ते पण माहित नाही. शाळेत क्रमिक
पुस्तकात असणाऱ्या मराठी कविता ज्या आता आठवत पण नाहीत पण गाईडातून त्यांचे अर्थ
समजून घेऊन त्यातलीच उत्तरं पाठ करून उत्तरं सोडवण्यापुरत्या वाचलेल्या. पुढे शाळा
संपल्यावर अकरावीला सायन्स घेतलं, डॉक्टर होण्यासाठी. सायन्स घेतलं म्हटल्यावर
सायन्स फिक्शन वाचणे ओघाने आलेच असा प्रघात नसला तरी जयंत नारळीकर, निरंजन घाटे,
लक्ष्मण लोंढे यांच्या कथा-कादंबऱ्या आणि मोहन आपटे, बाळ फोंडके यांची वैज्ञानिक पुस्तके
वाचायचा छंद लागला.
डॉक्टरीला जाता आलं नाही कारण तेवढा अभ्यासच नव्हता. त्यामुळे मग कॉमर्स परत यु
टर्न मारून बीएस्सी करत करत दोन्ही ठिकाणी नापास होत होत शेवटी बीए केलं. बीएला
इंग्रजी विषय घेतला. परत एकदा कवितेचा संबंध आला इंग्रजी कवींच्या रूपाने आणि
अभ्यासक्रमात असल्या कारणाने न डावलता येण्यामुळे. त्यामुळे कविता आपली पाठ सोडणार
नाही हे जाणवलं. घरात एक आतेभाऊ इंग्रजी घेऊन एमए झालेला. त्याचे मित्र यायचे
तेव्हा त्यांच्यात चर्चा व्हायच्या पण त्यातलं कळायचं नाही. नंतर अभ्यासक्रमात
असलेल्या कवितांचं विश्लेषण प्राध्यापक करायचे तेव्हा थोडं थोडं कळायला लागलं.
पहिल्या प्रथम कळलं आपल्याला कवितेतलं बिलकुल म्हणजे बिलकुल कळत नाही. तरी पण ही
मंडळी काहीतरी वेगळं लिहून समोरच्याला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे कवी
सुद्धा शे-दोनशे वर्षांपूर्वी काहीतरी लिहून ठेवतात आणि आपल्याला ते अभ्यास करून
मार्क्स घ्यायचे असतात इतकंच लक्षात होतं. तरी पण मनात शंका होतीच. ही लोकं
लिहितात ते इतकी वर्ष टिकून आहे आणि आपल्यापर्यंत यायचा प्रवास त्यांनी केला आहे
हे सगळं अगम्यच आहे.
लातुरात तेव्हा बरीच काव्य संध्या किंवा काव्य संमेलनं असायची.
त्यांना चुकूनही जायचो नाही. कॉलेजात शिकतोय तेच खूप आहे हा अट्टाहास. याचा परिणाम
निदान लातूर परिसरात काय नवीन लिहिलं जातंय ते माहिती नसणे यावर झाला. तसेच कविता
न समजणारी चीज असते हे इंग्रजी कवींच्या कवितामुळे वाटायला लागलं. कवितांपासून
दूरच राहायला हवं असं वाटलं.
एमएला फर्गसनला अॅडमिशन घेतली. तिथे इंग्रजी भाषेत लिहिणारे भारतीय कवी.
त्यांची अढीच बसली मनात. आपण कविता आता शिवायची काय तिचा वास पण घ्यायचा नाही असं
ठरवलं. तेव्हाच माझा बीएपासूनचा मित्र बालाजी सूर्यवंशीने दगडांचे शव नावाचा
कवितासंग्रह लिहिला आहे आणि त्याचं प्रकाशन प्रसिद्ध कथा-कादंबरीकार राजन खान यांच्या
हस्ते होणार आहे म्हणून गेलो. विद्यापीठाचं नामदेव सभागृह खचाखच भरलेलं होतं. कवितेला
इतकी ओढ कधी बघितली नव्हती. त्यामुळे आवर्जून कवितासंग्रह घेतला. वाचून काढलं. छान
वाटलं यापेक्षा आपला एक मित्र मोठा कवी झाला निदान विद्यापीठाच्या परिसरात तरी
याचाच आनंद होता.
या नंतर कवितेचा संबंध आला माझी एक मैत्रीण असणारी कविता दातीरच्या कविताच्या
कविता या कवितासंग्रहामुळे. तिने आग्रहानं तिच्या शहरात नाशिकला
कवितासंग्रहाच्या प्रकाशनाला बोलवलं. जायला जमलं नाही. तरी तिच्या कविता वाचल्या.
त्यांच्यात आणि प्रणवच्या कवितेत एक सारखेपणा जाणवला तो म्हणजे आजच्या काळाशी
असणारं त्यांचं तादात्म्य. हे तादात्म्य फक्त काळाबरोबर न राहता त्या पाठीमागच्या
अर्थाला बाहेर काढण्यासाठीचा अभिव्यक्तीचा प्रकार वाटला.
खासकरून शहरी मानसिकतेला
जोडलेल्या आणि त्याच्या अर्थछटा समजून घ्यायला यांना आवडतं. आवडतं म्हणजे अभिनेता
आवडतो अशा पद्धतीने नाही तर एका अंतरावर थांबून निरीक्षण करणे या अर्थाने. त्यावर
भाष्य असलं तरी ते भाष्य आपण एलिअन आहोत या मानसिकतेतून येत नाही तर आपण
सुद्धा यात कुठे तरी आहोत ही भावना यातनं त्यांना बाहेर काढत नाही. त्यांच्या
भावविश्वाला बांधून ठेवणारं हे आहे तरी ते आपलं नाही अशी काहीतरी संभ्रमित अवस्था
असावी असं जाणवलं. त्यामुळे शब्दांचा आणि तुटक वाक्यांचा वापर गद्याच्या अंगाने
जाणारा. कविताच्या कवितेत आजूबाजूच्या वातावरणाचा घेतलेला आढावा आहे तसा एक
दहशतवादी जर त्या गावच्या प्रेमात पडला ज्या गावात त्याला बॉम्बस्फोट करायचा आहे
तर काय होईल या शक्यतेचा विचार आहे.
प्रणवच्या कवितांमध्ये अशा शक्यतांकडे न पाहता आजूबाजूची परिस्थिती कशी
चित्रविचित्र भासणारी आहे याच्या गमतीदार नोंदी आहेत. त्यामुळे वाचणाऱ्याला वाटतं
किती कुत्सित माणूस आहे. पण हा कुत्सितपणा कुतुहूलमिश्रीत नजरेतनं आला आहे.
त्यामुळे तो कुत्सितपणा न राहता वाचकाने आपल्या आजूबाजूचा भवताल बदललेला आहे त्याची
नोंद घ्या या विनंतीचा आहे. भवताल समजून घेतलात की त्यातील गंमत तुमची
तुम्हालाच कळेल अशी त्याची धारणा असावी किंवा आपल्याला हा भवताल काही एक प्रमाणात
समजला आहे तो यांनी पण अनुभवावा या अर्थाने त्यांची रचना केली असावी.
बालाजीच्या कवितेत एकूण मनात उमटलेल्या भावना शब्दरुपाने मांडाव्यात असा
प्रयत्न दिसतो. गांधीजींवरची कविता याचं उत्तम उदाहरण ठरावी. वरील दोघांपेक्षा तो
वेगळा वाटतो ते त्याच्या पार्श्वभूमीमुळे. बालाजीचं आयुष्य खेडेगावात गेलेलं.
त्यामुळे खेडेगावातला माणूस आणि शहरी माणूस यांच्या संवेदना यात कमालीचा फरक असतो.
शहरी वातावरणात राहणाऱ्यांना कदाचित ते समजणं अवघड व्हावं. त्याच्या कविता या
परिस्थितीच्या काळजीतून आलेल्या त्यामुळे त्यात बदल घडावा ही अपेक्षा जास्त. हा
दृष्टीकोन त्याला वेगळा ठरवतो. वरील दोघांमध्ये बदलापेक्षा आहे ती गोष्ट समजून
घ्यावी हे जास्त. त्यातनं काही निघालं तर ते बदलला कारणीभूत ठरेल अशी
कळकळ.
सरतेशेवटी आजच्या काळाचे हे तिघे प्रतिनिधी भवतालाला समजून घेऊन त्यात काही
बदल होईल का या अपेक्षेने जगाकडे दृष्टी लावून असलेले. त्यांच्या पुढील कलाकृतीत
या पुढची पायरी गाठून आपल्याला नवीन अनुभव देतील अशी आशा करूयात.
विरचित पायऱ्यांचा गेम आणि इतर कविता
प्रणव सखदेव
अमलताश बुक्स, पुणे
कविताच्या कविता
कविता दातीर
अक्षर मानव प्रकाशन, पुणे
दगडांचे शव
बालाजी सूर्यवंशी
अक्षर मानव प्रकाशन, पुणे



Comments
तुमचा blog सध्या च वाचनात आला
काही review वाचले तर काही वाचयचे आहेत
So far जेवढे वाचले ते नक्कीच चांगले आहे.
तुमचा blog सध्या च वाचनात आला
काही review वाचले तर काही वाचयचे आहेत
So far जेवढे वाचले ते नक्कीच चांगले आहे.