सनशाईन : मानवाची क्षुद्रता
सायन्स फिक्शन या सिनेमाच्या उप-प्रकारात
मानवाच्या अस्तित्वावर जर प्रश्नचिन्ह उभे राहिले तर त्यात काय होईल आणि मानवाने त्यावर
काय उपाय सुचवले या आधारे कधी थ्रिलरच्या अंगाने तर कधी त्याच्या खोलात जाऊन त्यावर
निश्चित भाष्य केलं जातं. मागच्या वर्षी आलेल्या इंटरस्टेलर सिनेमात जर भविष्यात खरंच
मानवाचं अस्तित्व धोक्यात आलं तर मानवाने काय उपाय शोधावे याची शक्यता गृहीत धरून मानवाचं
भविष्य कसं असेल याची चुणूक दाखवली होती. त्यामुळे त्यात विज्ञानाला पर्यायाने
वैज्ञानिक संकल्पनांना मुख्य स्थान होतं. त्याचे होणारे संभाव्य परिणाम एका
कुटुंबाच्या प्रातिनिधिक चित्रणाने दाखवण्यात आले. दुसरी बाब यात प्रकर्षाने
दिग्दर्शकाने बिंबवण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे मानवाची क्षुद्रता. या अनिमिष पसरलेल्या
जगात मानवाचं अस्तित्व ते काय! मानव हा मुळातच क्षुद्र आहे. त्याने त्याचा बडेजाव
न मांडता स्वतःच्या अस्तित्वाची पुनर्चीकित्सा करावी. असा उघड संदेश सिनेमा देतो.
अशा प्रकारचा संदेश वगैरे द्यायच्या भानगडीत न
पडता २००७ साली आलेला सनशाईन (दिग्दर्शक डॅनी बॉईल) सिनेमा आपल्या नजीकच्या
भविष्यात पृथ्वीच्या अस्तित्वाला कारणीभूत असणारा सूर्य जर त्याची उर्जा कमी होत
होत तो मृत पावत चालला तर काय होईल याची कथा मांडतो. २०५७ साली इकॅरस २ हे यान
सूर्याच्या दिशेने निघाले आहे. कारण सात वर्षांपूर्वी पाठवलेले इकॅरस १ हे यान
त्याचं काम करू शकलेले नसते. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा संदेश येत नाही. या
दोन्ही यानांचं काम असतं अमेरिकेतल्या मॅनहॅटन आकाराच्या न्यूक्लिअर बॉम्बनी
त्याच्यात ठिणगी पेटवून त्याला पुनः उत्सर्जित करण्याचं. तो मृत पावत चालला असला
कारणाने पृथ्वीवरील मानवाचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. पृथ्वीवर हिमयुग अवतरलंय. इकॅरस
२ वरील फिजिसिस्ट कापाच्या (सिलिअन मर्फी) निवेदनाने सिनेमाची सुरुवात होते. निवेदन
झाल्या झाल्या प्रेक्षकांना थेट यानात काय चाललं आहे ते दाखवलं जातं. यान
शुक्राच्या जवळ पोचले आहे. त्याला ओव्हरटेक करून लवकरच बुधाच्या कक्षेत ते प्रवेश
करेल. त्याचवेळी एक संदेश पकडण्याचं काम एक तंत्रज्ञ करतो. तो संदेश इकॅरस १ कडून
येत असतो. संदेशानुसार त्या यानाला ते काम पूर्णच करता न आल्याने त्यातील सर्व
मेम्बर्स मृत पावलेले आहेत. इकॅरस २ वर ठरवलं जातं संदेश सहावर्षांपूर्वी पाठवलेला
आहे त्यामुळे त्यांना तिथेच सोडून सूर्याच्या दिशेने मार्गक्रमणा करायची. पण
मधल्या काळात यानातला एक तंत्रज्ञ हे अशक्य आहे असा सूर लावायला सुरुवात करतो.
कारण बॉम्ब सूर्याच्या दिशेने गेल्यावर यानाने वापस फिरण्याचा काळ फक्त चार
मिनिटांचा असतो.
त्या चार मिनिटात यान बॉम्बस्फोटाच्या तसेच सूर्याच्या दाहक किरणांच्या
झोतात येऊन नष्ट होऊन जाईल. त्यामुळे हे मिशन असेच अर्धवट सोडून वापस फिरणे योग्य राहिल.
काही तंत्रज्ञांचं म्हणणं पडतं आपण इथे मानवाचे प्रतिनिधी म्हणून आलो आहोत न की
कुणा देशाचे नागरिक. त्यामुळे आपले हेवेदावे बाजूला ठेवून आपण हे काम करावं असं
ठरतं पण एक तंत्रज्ञ नॅव्हिगेटर ट्रे (बेनेडिक्ट वॉंग) सोलार विंड्सपासून यानाचे
शिल्ड्स वाचवण्यासाठी रिअलाईन करायचे विसरतो. त्याच्या परिणाम स्वरूप शिल्ड्स खराब
होतात. त्यांना दुरुस्त करण्यासाठी यानाचा कप्तान कानेडा (हिरोयुकी सनाडा) आणि
कापा स्पेसवॉक करतात. दुरुस्तीसाठी कमी वेळ असतो त्यामुळे कानेडा सूर्याच्या
अतितीव्र किरणाच्या सानिध्यात येऊन मरतो. तसेच यानाच्या ऑक्सिजन टँक्सची आणि इतर
गोष्टींची नासधूस झालेली असते. यानात पुढे काय असा प्रश्न उभा राहतो. इकॅरस १ शी
संपर्क साधून तिथे इकॅरस २ साठी पुरेशी रसद असेल का म्हणून ते त्याच्याशी डॉकींग
करतात. तिथे एक नवीनच संकट उभं राहतं.
कथानक इतक्या डिटेलमध्ये द्यायचं कारण सिनेमा
प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांना आणि समीक्षकांना एक प्रश्न पडला तो म्हणजे डॅनी
बॉईलनी सिनेमाच्या या टप्प्यापर्यंत मानवाच्या अस्तित्वाची चर्चा आणि त्यानं कमावलेलं
तत्वज्ञान यांची सांगड प्रातिनिधिक स्वरुपात वेगवेगळ्या वंशांच्या व दृष्टीकोनाच्या
व्यक्तींच्या तोंडून इतकी उत्तमपणे मांडली की पुढे येणाऱ्या घटनांमुळे या आधीच्या
चर्चेला काही अर्थ आहे का हा नवीन उप-प्रश्न तयार होतो.
प्रश्न निर्माण होण्याचं
कारण पिनबाकर हे पात्र. या पात्राचं वागणं काय सूचित करतं हा तो प्रश्न. इथे
पिनबाकर अशा माणसांचं प्रतिनिधीत्व करतो ज्यांना मानवाच्या क्षुद्रतेवर विश्वास
आहे. निसर्गा पुढे मानव काहीच नाही त्यामुळे त्याचं अस्तित्व संपवण्याचं काम देवच
करतोय. पिनबाकरच्या पात्रामुळे सकारात्मक वाटणारा सिनेमा एकदम नकारात्मक होतो. ही
नकारात्मकता सिनेमाची नकारात्मकता न राहता एकूण मानवाची नकारात्मकता होते. आदिम
गोष्टींपैकी एक असणारी ही गोष्ट यानाच्या मिशनवरच प्रश्नचिन्ह उभे करते. त्यामुळे
थ्रिलरचं आवरण घेतलेला सिनेमा प्रेक्षकाला बऱ्याच गोष्टींवर विचार करायला भाग पाडतो.
वर उल्लेखलेल्या इंटरस्टेलरमध्ये डॉ. मान ही
व्यक्तिरेखा बरीचशी पिनबाकरसारखी आहे. तरी एकूण सिनेमाच्या त्याहीपुढे विचार
करण्याच्या मानसिकतेमुळे तो मानवी स्वभावाची एक बाजू म्हणून राहतो. एकुणात डॅनी बॉईलनी
आतापर्यंत वेगवेगळ्या जॉनरामध्ये काम केलेले आहे. त्यापैकी सायन्स फिक्शन प्रकारातला
हा सिनेमा उत्तम सिनेमांच्या पंक्तीत जाऊन बसतो.



Comments